विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 3 February 2021

सरदार धुळोजीराव सूळ

 

"मोरोचीत आढळले सरदार धुळोजीराव सूळ यांचे मध्यकालीन समाधीस्मारक" - पुण्यनगरी- सोलापूर (दि. १ फेब्रुवारी २०२१)
मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळाच्या सदस्यांनी माळशिरस तालुक्यात नुकत्याच केलेल्या अभ्यासदौऱ्यात मोरोची गावात ऐतिहसिक स्मारक आढळले आहे. त्याबाबत माहिती देताना सुमित लोखंडे म्हणाले कि, "हे स्मारक चारखांबी आणि सतीस्मारक कट्टा या ऐतिहासिक वास्तू निदर्शनास आल्या आहेत सदर ऐतिहासिक वास्तु हि सुळ घराण्याच्या परंपरागत जमिनीचा भाग असुन त्याचा मालकि हक्क हणुमंतराव सुळ पाटिल यांच्याकडे आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि नुकतेच उपजिल्हाधिकारी म्हणुन निवड झालेले हरेश सुळ यान्नी दिलेल्या माहितीनुसार गावकरी मंडळी त्या समाधीस्मारकाला धुळोबांचं देऊळ म्हणून संबोधतात, त्यावरून सदर वास्तू म्हणजे मराठेशाहीतील सरदार धुळोजीराव यांचे संभाव्य समाधीस्मारक असल्याचे आपण म्हणु शकतो. मोरोची गावचा उल्लेख सरदार सूळ आणि सरदार महारणवार या घराण्यांच्या संबंधाने कागदपत्रात आढळतो. इ. स. १६९३ साली छत्रपतींच्या सुप्रसिद्ध जिंजी येथील वास्तव्याच्या प्रसंगी ज्या सरदारांनी मोगली फौजांना खडे चारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्यात



सरदार धुळोजीराव सूळ यांचेही योगदान आहे. माण प्रांताच्या दहिगाव कर्यातीतील मौजे मोरूची या गावचे वतनदार धुळोजीराव सूळ पाटील आपल्या पथकासह फतेहजंगबहाद्दर महारणवर यांच्या हाताखाली राहून स्वराज्याची सेवा चाकरी करत असत. धुळोजीराव सुळाखेरीज सूळ घराण्यातील आणखी दोन पुरुष हुजरातीच्या घोडदळातील सरदार होते. यशवंत सूळ व सखोजी सूळ अशी त्यांची नावे कागदपत्रात आढळतात. महार्णवर सरदार घराण्याच्या सरंजामात नीरेच्या खोऱ्यातील मोरूची, पिंपरे, सुपे, रुई या गावांशी व तेथील महार्णवर भाऊबंदांशी अगर सूळ नामक सोयरे मंडळींशी असलेला संबंधही ऐतिहासिक कागदपत्रातून प्रकट होतो."
"सरंजामी मरहट्टे" या संदर्भग्रंथाचे लेखक संतोष पिंगळे यांनी सांगितले कि, "मोरोचीमधील समाधी स्मारकाची स्थापत्यशैली हि मराठेशाहीच्या कालखंडातील असून वीर पुरुषासोबत त्यांच्या धर्मपत्नी देखील सती गेल्याचे आढळून येते. कारण, चारखांबी समाधी हि पूर्णपणे पाषाण आणि चुन्याच्या बांधकामाची असून त्याला गावकरी धुळोबांचं देऊळ म्हणतात तर त्याच्या शेजारी असणारे चौकोनी कट्टे ज्यावर पाऊले असून त्याला भिवाया म्हटले जाते. लोकांनी याकडे धार्मिकतेच्या भावनेने पाहिल्यामुळे सदर समाधीस्मारके देऊळ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. परंतु प्रथमदर्शनीच ती वास्तू मराठेशाहीच्या कालखंडातील समाधीस्मारक असल्याचे निदर्शनास येते. निश्चितच ते सरदार धुळोजीराव सूळ यांचे स्मारक असण्याची शक्यता आहे. कारण जिंजीपासून सुरवात झालेल्या महार्णवर यांच्या सरंजामी सत्तेचे सूळ हे वाटेकरी व साक्षीदार राहिलेले आहेत. सरदार धुळोजीराव सूळ हा या घराण्यातील आतापर्यंत इतिहासाला ज्ञात होणार पहिला पराक्रमी पुरुष या पुरुषाने फतेहजंगबहाद्दर महार्णवर घराण्याला बरीच साथ दिली.
फतेहजंगबहाद्दर महार्णवर यांनी सूळ यांना वाटून दिलेले मोकासे असे होते.
प्रांत बीड पैकी
१) तालुके मानूर - २८ गावे
२) तालुके तालखेड - १४ गावे
३) सरकार मेहकर, परगणे रिसवड - ११ गावे
४) सरकार मेहकर, तालुके मलकापूर - १६ गावे
५) सुभा कडेवळीत, प्रांत पेडगाव, मौजे पाटोदे गरुडाचे
६) प्रांत माण, कर्यात दहिगाव, मौजे मोरूची
अशी एकूण ७१ गावे नेमून दिलेली होती. ज्यांच्या उत्पन्नातून सरदार धुळोजीराव सूळ आपल्या पथकांचा खर्च चालवीत असे. राजश्री सुभानजी महार्णवर फतेहजंगबहाद्दर व धुळोजीराव सूळ यांचा एकत्रित सरंजाम ८१, ९२५/- रुपये उत्पन्नाचा होता असे अस्सल कागदपत्रातून स्पष्ट होते. "
"मोरूची हे ऐतिहासिक गाव असून धुळोजीरावांच्या समाधीस्मारकाचे संवर्धन होणे आणि त्यांच्या ऐतिहासिक शौर्याचा माहिती फलक लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे." असे मत मरहट्टी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महारनवर यांनी व्यक्त केले.
* साभार-
दै पुण्यनगरी
दै तरुण भारत
दै पुढारी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...