धुळे (धुळे शहर) आणि मराठा साम्राज्य
तापी व पांझरा किनारी वसलेल्या धुळे व प्रकाशा वसाहतीच्या अलीकडील सर्वेक्षणात अश्मयुगीन मानवाच्या आस्तित्वा विषयी प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रामुख्याने प्रकाशा येथील उत्खननामध्ये आढ्ळून आलेल्या इ.स. पुर्व ४ थ्या व ३ ऱ्या शतकातील काच व मातीच्या वस्तूवरून ते अशोक मौर्य या सम्राटाच्या कालखंडातील असल्याचे सिद्ध होते.
पितळ खोरा येथील लेण्यांमधील शिलालेखांवरील उल्लेखांवरून सातवाहन वंशाची राजधानी पैठणशी या प्रदेशाचे करार असल्याने सिद्ध होते. इ.स. ३१६-३६७ दरम्यान खान्देशावर स्वामिदास मुलुंड व रुद्रदास यांची सत्ता असल्याने पुरावे महाराज रुद्रदास यांच्या दस्तऐवजांवरून व काही तोकड्या व अविश्वसनीय सामग्रीवरून समजते. पाचव्या शतकाच्या मध्य्मामध्ये दक्षिणेकडे वातापी (बादामी) आणि खान्देश या प्रदेशांवर चालुक्य राजा पुलकेशी १ याने आपले साम्राज्य सेन्द्रकांच्या मदतीनी स्थापित केले. मेहुणबारे जि.जळगाव येथे शके ६२४ (A.D ७०२) तांम्रपंत्रानुसार शेवटच्या सेन्द्रक राजा विरदेव यांच्याकडून राष्ट्रकुटांच्या अधिपत्या खाली आले. राष्ट्रकुल राज्यांच्या उतरत्या काळात बऱ्याच लहान सहान संस्थानी यादवांशी मिळून धुळे प्रांतावर राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु १३ व्या शतकाच्या शेवटी यादवांनी आपली सत्ता येथे स्थापन केली. १२९४ अल्लाउद्दिन खिलजी ने खान्देशावर आक्रमण करून यादवांची सत्ता संपवली. इ.स १३१८ मध्ये हिंदू देवगिरी साम्राज्याचा अंत झाला. इ.स १३७० पर्यंत खान्देश खिलजीच्या अधिपत्याखाली राहिला. याच वर्षी थाळनेर व करवंदी सुबा सुलतान फिरोज तुघलक याने मलिक रझा फारुकीला बहाल केले.त्याच दरम्यान “देवपूर” व “जुने धुळे ” या ठिकाणी दोन गढयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, त्यापैकी देवपूरची गढी सन १८७२ च्या पांझरा नदीला आलेल्या भीषण पुरात वाहून गेली. इ.स.१६२९ पर्यंत अकबर बादशाहाने खान्देश विशेष करून ‘धुळे ’ वर आपल अधिपत्य स्थापित केले.
इ.स १७२३ मध्ये मुघल सरदार निझाम उल हक याने मुघल राजवटी विरुद्ध बंड केले. त्याचा मृत्यू १७९८ ला झाला. १७५२ मध्ये मराठ्यांनी निझामाचा बाल्की येथे पराभव केला तेव्हा त्याचा मुलगा ‘सलामत जंग’ हा निझाम होता. बाल्कीच्या तहा अंतर्गत खान्देशचा पूर्ण प्रदेश मराठा साम्राज्याचा अधिपत्याखाली आला जो पुढे १८१८ पर्यंत राहिला. सन १८०३ च्या दुष्काळात खान्देश प्रांताचे रुपांतर वाळवंटात झाले. पुढील काही वर्षात बालाजी बळवंत या विठ्ठल नरसिह विंचूरकर यांच्या विश्वस्थ्याने ‘धुळे ’ परत बसविले. त्या बदल्यात विंचूरकरानी त्यांना विशेष अधिकारासह जमीन इनाम म्हणून दिल्या. सोबतच देवपूर गढीची डागडुजी करून जुने धुळे येथे ‘गणेशपेठ’ बसविली. पुढे बाळाजी बळवंत यांच्या वर सोनगीर व लळिंग या जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ती त्यांनी इ.स. १८१८ पर्यंत ब्रिटीश राजवट लागू होई पर्यंत निभावली. १८१९ साली ‘कॅप्टन ब्रीज्ज’ याने ‘धुळे ‘ चे केंद्रीय स्थान व हिंदुस्थानला जोडणारा दुवा म्हणून ‘धुळे’ आपले मुख्यालय म्हणून स्थापन केले. शहर नदी नाल्यांनी वेढलेले व लहान होते व ३ भागात विभागलेले होते. जुने धुळे, देवपूर आणि मोगलाई. नवे धुळे व पेठ ज्याला पूर्वी ब्रीज्ची पेठ म्हणून ओळखले जात होते, यांची निर्मिती कॅप्टन ब्रीज्ज याने केली. शहर अनेक समांतर गल्ल्यानी बनलेले होते. मुंबई आग्रा रोड हा तिसरा काटकोन रस्ता अस्तित्वात होता.
बुऱ्हानपूर हून व्यापारी तसेच मुंबई व सुरत हून हुशार कारागीर, सुतार व लोहारांना शहरात वसविण्यात आले आणि तीन कार्यालये बांधण्यात आली. धुळे शहर परत एकदा समृद्धी च्या मार्गावर अग्रेषित झाले.
इ.स १९०६ साली प्रशासकीय सुविधेसाठी खान्देशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन विभाग करण्यात आले. पश्चिम खान्देशमध्ये धुळे सहित नंदुरबार, नवापुर, पिंपळनेर, शहादा, शिरपूर, शिंदखेडा व तळोदा तालुके समाविष्ठ करण्यात आले.
१८८७ साली पिंपळनेर तालुक्याचे मुख्यालय साक्री येथे हलवून त्याचे नाव साक्री तालुका ठेवण्यात आले. १९५० साली अक्कलकुवा हा नवीन तालुका अस्तित्वात आला.१५ ऑगस्ट १९०० धुळे-चाळीसगाव रेल्वे सुरु झाली.
१९६० साली धुळे जुने बॉम्बे राज्यातून वेगळा होऊन महाराष्ट्राचा भाग बनले. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. धुळे जिल्ह्यात आता धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर हे चार तालुके आहेत. तसेच १ मे २०१६ रोजी धुळे शहर, पिंपळनेर व दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालयांची स्थापना करण्यात आली.
No comments:
Post a Comment