#श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धावडशी गावी ते कोकणातून येऊन स्थायिक झाले. श्रीब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती शाहू महाराजांचे परम दैवत! त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. त्या मंदिराची रचना आणि बांधकाम सुरेख व रेखीव आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या शिरोभागी श्रीब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा सतरा ओळींचा शिलालेख आहे. मंदिर उत्तराभिमुख असून, त्याचे प्रशस्त असे तीन गाभारे आहेत आणि पुढे, भव्य असा सभामंडप आहे. मुख्य मंदिर घडीव अशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले आहे. दगडांच्या सांध्यामध्ये शिशाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर दोन गगनचुंबी शिखरे आहेत. त्यावर दोन उंच कळस आहेत. मंदिरावर सर्व बाजूंनी रेखीव पद्धतीने दशावतार कोरलेले असून, शिखरावर ठिकठिकाणी वेलपत्री नक्षिकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत. त्या चित्रांवरील भावमुद्रा, वेचक प्रसंग व उत्कृष्ट रंगसंगती यांत शिल्पकारांचे व कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या पुढील शिखरावर चौकोनी आकाराचे आकर्षक मनोरे आहेत. त्यांच्या रचनेतील विविधता, कल्पकता व प्रमाणबद्धता -त्यांतील हस्तलाघव उल्लेखनीय आहे. मंदिराचा आधुनिक काळात जीर्णोद्धार करण्यात आला. त्यायोगे मंदिराच्या शोभेत भर पडली आहे.
स्वामींचे उपास्य दैवत - श्री परशुराम तथा भार्गवराम. त्यांची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री भार्गवरामाच्या दोन्ही बाजूंस त्यांचे बंधू काळ व काम यांच्या साडेतीन फूट उंचीच्या पितळेच्या सुबक मूर्ती आहेत. त्या मूर्तींना उत्सवमूर्ती असे संबोधतात. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे. श्री भार्गवरामांजवळ दोन टांगत्या समया असून, समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. परिमल, अखंड नंदादीप आणि पूजोपचार यांमुळे गाभारा शांत, निर्मळ, सुगंधी व शुचिर्भूत भासतो. मुख्य गाभारा प्रशस्त असून, त्याच्या प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पाकृती दगडात कोरलेल्या आहेत. उजेडासाठी दोन्ही बाजूंला दगडात कोरलेल्या जाळ्या आहेत.
गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला उत्तराभिमुखी, पेशव्यांनी बसवलेली शेंदरी रंगाची सर्वांगसुंदर अशी गणेश मूर्ती आहे. डाव्या बाजूला उत्तराभिमुखी अष्टभुजादेवीची चित्तवेधक मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी दगडात कोरलेले मोठे कासव आहे. ते धावडशीकरांचे न्यायपीठ आहे. खरेखोटे करण्यासाठी त्या कासवावर उभे राहून श्री स्वामींची शपथ घेण्याची प्रथा आहे. गुन्हेगार अशी शपथ घ्यायला धजावत नाही. दालनाच्या दक्षिण बाजूस औंध संस्थानाचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी भेट दिलेला संगमरवरी दगडातील कलात्मक शिल्प असलेला अडीच फूट उंचीचा आकर्षक पुतळा आहे. दालनाच्या वरभागी आरतीच्या वेळी वाजवले जाणारे दोन मोठे नगारे व मधुर नाद उत्पन्न करणाऱ्या घंटा आहेत. श्रींची आरती भक्तगणांना मंत्रमुग्ध करते तर सुरेल सनईचौघडा साक्षात नादब्रह्माचा आनंद देतो.
मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे. लाकडे गलथे आणि महिरपी यांनी सभामंडपास शोभा आलेली आहे. मंडपास कडीपाट असल्याने सभामंडप शांत व शीतल बनलेला आहे. उजेडासाठी ठिकठिकाणी जाळ्या व मोठमोठे दरवाजे आहेत. सभामंडपातच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. शेजारी छत्रपती शाहू महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची मनोवेधक सुंदर चित्रे आहेत. तसेच, सभामंडपात अनेक संत सत्पुरुषांच्या तसबिरी लावल्या आहेत. सभामंडप हंड्या व झुंबरे यांनी सुशोभित आहे.
मंडपाच्या पूर्व बाजूंस तळघरवजा दगडी भुयार असून, त्यात शिवलिंग व नंदी अशी दोन दैवते आहेत. शेजारीच, कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून, भुयारात अतिशय थंड वाटते. सर्वत्र दगडी फरशी आहे. भुयाराची खोली एवढी आहे, की शेजारी खोल असलेल्या तळ्यातील पाणी जलकुंडात येते व त्यानेच शिवलिंगास स्नान घडते. ते भुयार म्हणजे स्वामींची स्नानसंध्या! ध्यानधारणा व पूजाअर्चा यांनी मंगलमय बनलेले पवित्र असे ते शिवमंदिर होय. भुयारात उजेड येण्यासाठी पूर्व बाजूंस मोठी जाळी असून, त्यातून तळ्यातील निळ्याभोर पाण्याचे दर्शन होते. भुयारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
भार्गव मंदिराचे सर्व आवार दगडी फरशीयुक्त असून, शेजारी पुष्पवाटिका, वृंदावने व सुबक दगडी बांधकामातील सुंदर अशी चार तळी आहेत. त्यांपैकी शिवमंदिरास लागून तीर्थाचे तळे आहे. तळ्यातील सुंदर निळेभोर पाणी व सुरेख, रेखीव तळ्याचे दगडी बांधकाम मनाला आनंद देते. तळ्यास लागून पूर्व बाजूस प्रशस्त उमाउद्यान आहे. तेथे विविधोपयोगी अशी सुंदर वास्तू उभी आहे. त्यास लागून ग्रामदैवत श्री वाघजाई देवीचे श्रीस्वामींनी बांधलेले नमुनेदार मंदिर आहे.
मंदिराच्या परिसरात जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांची व देवस्थानाची कचेरी आहे. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. कचेरीस लागून मोठे स्वयंपाकगृह असून, हजारोंच्या पंक्ती उठतील अशी मोठमोठी भांडीकुंडी व सर्व सोयी आहेत. समोर भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा व सुसज्ज असे अतिथिगृह आहे. त्याच धर्मशाळेत उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. गावभोजन, विविध कार्यक्रम, सभासंमेलने यांसाठीही धर्मशाळेचा उपयोग होत असे. स्वामींचे स्मारक व पुण्यस्मरण म्हणून त्या वास्तूत ‘श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल’ सुरू करण्यात आले आहे. जणू काही तो परिसर विद्येचे माहेरघर बनू पाहत आहे.
श्रीब्रह्मेंद्रस्वामी म्हणजे धावडशीकरांचे आराध्य दैवत. श्रावण शुद्ध नवमी ही स्वामींची पुण्यतिथी. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध नवमी असा नऊ दिवस स्वामींचा मोठा उत्सव साजरा होत असतो. कथाकीर्तने व टाळमृदुंग यांनी परिसर दुमदुमून जातो. गाव आनंदाने व उत्साहाने फुलून जातो. बाहेरून खूप लोक उत्सवासाठी येत असतात. गुळांमपोळी (गुळांबा पोळी) हे त्या भोजनातील वैशिष्ट्य आहे.
धावडशी हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पाठीशी नयनरम्य मेरुलिंगाची पर्वतराजी, उदात्त असे भव्य भार्गवमंदिर आणि शांत, प्रसन्न, पवित्र असे वातावरण. श्रींचे दर्शन व प्रसाद यांमुळे तेथे येणारा प्रत्येक भाविक भरून पावतो. त्याचे मन आनंदाने फुलून जाते. तेथे सत्पुरुषांच्या व लोकोत्तर देवेश्वरांच्या मठातील अद्भुत आध्यात्मिक प्रचंड शक्तीचा साक्षात्कार होतो आणि स्वामी या तीर्थक्षेत्रात विशेष रुपाने वास करत असल्याचा प्रत्यय येतो.
स्वामी असती भगवंत | तयासी असे दंडवत ||
घेईल दर्शन जो जो | तोचि एक भाग्यवंत ||
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे महाराष्ट्रायतील जनतेच्या विस्मृतीत गेलेले संत. पण त्यांचे कार्य आणि त्यांचे निस्सीम भक्त यांनी त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे.
वीर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय.
No comments:
Post a Comment