दक्षिण काशी ओळखल्या जाणाऱ्या वाईला वाईचे घाट आणि मंदिरांमुळे #वाई_temple_City म्हणून ओळखले जाते हे आपणास सर्वांनाच माहितच आहे.वाईला लाभलेला ऐतिहासिक वारसा, येथील ऐतिहासिक वास्तूच्या स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नजराणा,वाईची संस्कृती अशा अनेक गोष्टीचा कित्येकांना भुरळ लागली आहे.मध्यंतरीच्या काळात चित्रपट निर्माते/दिग्दर्शकांना पण वाईचा ओढा लागला होता म्हणून येथे अनेक चित्रपटांची शुटिंग होऊन वाईला #फिल्म_सिटी म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे.कृष्णामाईच्या काठावर अशा अनेक घाटांची निर्मिती झाली त्यातील हा एक मेणवलीचा घाट...
हा घाट तुम्ही कित्येक मराठी,हिंदी,तमिळ,तेलुगू चित्रपटात बघितला असेल.या वाईच्या पुरातन वैभवामुळे कित्येकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.घाटाबरोबर आजची सफर होती नाना फडणवीस यांचा वाड्याची..
इतिहासाची पाने उघडली तर तत्कालीन छत्रपतींचे सरदार भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री(सातारा)यांनी इ.स.१७६८ मध्ये वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम म्हणून दिला.तिथे नानांनी मेणवली हे टुमदार गाव वसविले आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर(मेणेश्वर)आणि वाडा हे भित्तिचित्रांनी अलंकृत केले. सतराव्या शतकात बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांविरूद्ध मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतील एक म्हणजे 'वसईची मोहीम'. या मोहीमेतून आप्पांनी विविध घंटा हस्तगत केल्या. या घंटांची नंतर महाराष्ट्रातील विविध मंदिरात स्थापना करण्यात आली. यापैकी सातारमध्ये अशा पाच ते सहा घंटा असून, यामधील सर्वात मोठी घंटा मेणवली स्थित मेणेश्वर मंदिरासमोर आहे. तब्बल ७५० किलो वजनाची ही घंटा असून आजही सुस्थितीत आहे.
नाना फडणवीस यांनी बांधलेला दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना(नगारखाना)आहे.आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.वरती त्याला चार रहाटगाडगी होती.या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे वाड्यात सायफन पद्धतीने सर्वत्र नेले होते. या खापरी नळांचे काही अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.उघड्या सोप्याच्या बाजूस उजव्या बाजूने गेले असता माजघर वं त्याला लागून देवघर आहे.भिंतीतील पहिल्या जिन्यावरून वर गेले असता सहाखणी दिवाणखाना लागतो.त्याच्या लाकडी कमानी आणि छत अनुक्रमे नक्षीदार व कलाकुसरयुक्त समांतर समभुज चौकोनी पदकांच्या रचनांनी युक्त आहे. तिथे झुंबरे,हंड्या यासाठी आकडे ठेवलेले आहेत.दिवाणखान्याला लागून नाना फडणीसांचे शयनगृह होते.त्यात नानांचा भव्य पलंग ठेवलेला आहे.पहिल्या चौकात सुमारे एक मीटर उंचीवर चारी बाजूंनी खोल्या बांधलेल्या असून अशीच रचना उर्वरित तीन चौकात आहेत.६x६ मीटर चौरस क्षेत्रफळांचे उघडे चौक असून त्यांतील पाण्याचा निचरा होण्याची जलनिस्सारण योजना आधुनिक अभियांत्रिकीला आव्हान देणारी आहे. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे वं त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली,तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत,अशा उत्तम सुरेख भिंतीवर शक्य झाले आहे.वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
या वाड्यातील जिऊबाईची खोली ही उत्तरेकडील भागात असून तिथली भित्तिचित्रे सुस्थितीत आहेत; कारण नाना फडणीसांच्या या शेवटच्या पत्नीने ब्रिटिशांनी जप्त केलेले उत्पन्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि सुदैवाने तिला दीर्घ आयुष्यही लाभते.तिने आपल्या जीवनातील दीर्घकाळ मेणवलीतीलया वाड्यात व्यतीत केला.ऐवढेच नव्हे तर नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू,कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती .त्यांचे जतन,संरक्षण जिऊबाईंनी केले.एवढेच नव्हे तर ती नीटनेटकी लावून ठेवली.त्यामुळे रावबहादूर द.ब.पारसनीस किंवा इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना हा अमोल ऐतिहासिक ठेवा पाहावयास मिळाला.रावबहादूर द.ब.पारसनीसांनी तर मेणवली दप्तरातील हजारो कागद हस्तगत करून ते रुमाल सातारच्या पारसनीस म्युझियमध्ये सुव्यस्थित ठेवले.पुढे इ.स.१९३८ मध्ये ब्रिटिश शासनाने ते त्यांच्या वारसांकडून विकत घेऊन पुण्याच्या डेक्कन कॅालेजमध्ये संशोधकांना उपलब्ध होतील,अशी व्यवस्था केली.सदर वाड्यात नाना फडणीसांचे केव्हा आणि किती दिवस वास्तव्य होते,या विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही;तथापि नाना फडणीस इ.स.१७९१ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांबरोबर वाईस आले असता त्यांचा मुक्काम मेणवली येथे असल्याची नोंद आहे.तसेच दुसरा बाजीरांव(कार -१७९५-१८१८)याने नाना फडणिसांना बडतर्फ केल्यानंतर ते वाड्यात काही महिने मुक्कामास होते.याशिवाय पहिल्या माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत(कार १७६१-१७७३)त्यांनी वाड्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा सपत्नीक मुक्काम येथे अनेक दिवस होते.
नाना फडणवीस यांच्या वंशजांनी वाडा सर्वांना पाहण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० वा. पर्यंत खुला केलेला आहे.प्रत्येकी ३० रू प्रवेश शुल्क आकारला जातो.मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढायला परवानगी आहे पण त्यासाठी ३० रूपये आकारले जाते.(कॅमेरा मधून फोटो काढण्यास मनाई आहे).वाड्याला भेट देणार्या पर्यटकांना वाड्याची संपूर्ण माहिती गाईड द्वारे दिली जाते.सर्व बघून झाल्यावर आपला अनुभव लिहून द्यावा लागतो.तसेच आपण घेतलेल्या तिकीटावर मोडी लिपीत आपले नाव लिहून दिले जाते.सौ वैशाली फडवीस(०२२-२४४९३११६ /पुणे)यांचा कडून मोडी लिपीतील दस्तावेजांचे मराठी हिंदी इंग्रजी भाषांतर करून मिळते.वाईच्या महागणपती मंदिरासोबत, नाना फडणवीस वाडा/मेणवली घाट,भोगावचे श्री महादेव मंदिर तसेच श्री नृसिंह मंदिर धोम एका दिवसात पाहून होतात.
शैलेश ज्ञानदेव तुपे
No comments:
Post a Comment