विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 March 2021

मल्हारराव होळकरांची "दुर्लक्षित" ऐतिहासिक वास्तू, काठापूरचा वाघवाडा.

 

सातबा-याच्या काटेरी कचाट्यात अडकलेली









मल्हारराव होळकरांची "दुर्लक्षित" ऐतिहासिक वास्तू, काठापूरचा वाघवाडा.
संदीप राक्षे✍🏻
सुंदर कलाकृती पाहूनी
आज मी धन्य झालो
दगडाच्या काळजाचे
गाव मी पाहूनी आलो..
तीन चार दिवसापूर्वी फेसबुकला काठापूर ता. आंबेगाव जि पुणे येथील मल्हारराव होळकर यांनी बांधलेला वाघ वाडा ही पोस्ट व फोटो पाहिले, त्या पोस्ट मधील ऐतिहासिक वास्तूंचे फोटो पाहिले अन तीच वास्तू पहाण्याचा मोहच जडला, तीव्र इच्छा झाली. दिवस, रात्र, ध्यानी, मनी तीच वास्तु आठवू लागली. नजरेसमोर वारंवार दिसू लागली. आता ती वास्तू साक्षात पाहिल्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हते. इकडे सारखा भटकतो म्हणून प्रत्येक जण मला लेक्चर देत होता. आता महिना दोन महिने तरी कुठे फिरायचे नाही, असा निर्धार केला होता. पण आठ दिवसही नीट गेले नाही. माझा निर्धार मीच मागे घेतला, अन सोबत मारूती तायनाथ यांना आळंदीतून घेऊन आंबेगावचा रस्ता धरला. शेल पिंपळगाव मार्गे कन्हेरसर, पाबळ, खडकवाडीहून आम्ही काठापूरला पोहचलो. आंबेगाव तालुका शेती उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असणारा तालुका, त्यामुळे इथले सर्व शेतकरी बंधू भरपूर श्रीमंत, कॅनलचे पाणी आणि घोडनदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पाटाला पाणीच पाणी दिसत होते. हिरव्यागार शेतीमुळे वातावरण प्रफुल्लित दिसत होते. काठापूरच्या वेशीत पोहचलो भव्य अशा कमानींने आमचे स्वागत केले. दगडातील भव्य प्रवेशद्वार त्याला लाकडी दरवाजे परंतु प्रवेशद्वाराचा मधला भाग पडून गेल्याने दोन बाजूला विभक्त अशी कमान पाहून आम्ही मारूती मंदिराजवळ आलो तिथे गाडी लावली. अन पायी पायी भुईकोट गडाकडे निघालो. वाड्याच्या जवळ आलो तर प्रवेशद्वारात आक्राळ विक्राळ सुबाभळीने संपूर्ण प्रवेशद्वार अडवलेले, एका बुरूंजाच्या कडेकडेने येड्या बाभळीच्या फांदया चुकवत चुकवत कसा तरी वाड्यात प्रवेश मिळवला, वाडाच्या आतले दृष्य पाहून तर खालीच बसलो, संपूर्ण वाड्यात येड्या बाभळी व टणटणीची झुडप थोडी सुद्धा जमीन दिसत नव्हती. बुट असूनही काटे टोचत होते. हळुहळू पाय टाकीत वाड्याच्या मध्यभागी आलो. काही ठिकाणी अरुंद असे खंदक होते त्यातून डोकावल्यावर तळघर व त्यांचे नक्षीकाम दिसत होते. छोटी छोटी भुयार दिसत होती तळघरात जाण्याचा मार्ग दिसायचा, नक्कीच अद्भुत असे काहीतरी खाली पण असणार याची खात्री होती. वरचे वातावरण पाहूनच पुढे जाण्याचे धाडस होईना. मनात सारखा एकच प्रश्न उद्भवत होता. इतकी अद्भुत ऐतिहासिक वास्तू अन तिची ही दूरवस्था कशामुळे झाली असेल. गाव इतके जवळ असूनही वाड्यात जायला रस्ता सुद्धा नाही. गावातले चिटपाखरू पण या वाड्यात फिरकत नसावे याची जाणीव हे सारं दृष्य पाहून झाली. चारीबाजूनी भव्य बुरूंज ते सुस्थितीत होते. वाड्याच्या प्रवेशद्वारावरील घडीव दगडांचे काम व्यवस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानीपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ हे मरण पावले त्यानंतर हा वाडा मल्हारराव होळकर यांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणुन प्रसिद्ध झाला. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष सांगणारा हा वाडा आज ख-या अर्थाने धारातीर्थ पडला आहे. अखेरचा श्वास घेत आहे. आज अशा वास्तू खूप दुर्मिळ आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही हे खरच दुर्दैव आहे. वाड्याची ती दयनीय अवस्था पाहून दु:खद अंतःकरणाने वाड्याच्या बाहेर पडलो. काही अंतरावर एक समाधी मंदिर आहे ते पाहिले तेथून आम्ही विष्णू व रुक्मिणी अशी दोन वेगवेगळी मंदिर आहेत तिथे आलो. ती दोन्ही मंदिर अशीच झाड झुडपांनी वेढलेली नजरेस पडली. समोरच्या बाजूला जाई पर्यंत आम्ही मंदिराकडे लक्ष दिले नाही. मंदिराच्या समोर आलो अन मंदिर पाहून अवाकचं झालो. पृथ्वीवरही स्वर्गातली मंदीर आहेत याची जाणीव झाली. नेत्रदीपक अशी कलाकुसर पाहीली अन माझा माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना, मंदिराच्या पाय-या चढून प्रवेशद्वारात आलो, अन क्षणभर डोक्याला हात लावून खालीच बसलो. किती सुंदर मंदिर किती अप्रतिम कलाकुसर, तरी पण या मंदिरांच्याकडे त्या वास्तुकडे येथील स्थानिकांचे इतके दूर्लक्ष, या ऐतिहासिक वास्तुंची इतकी भयानक विटंबना पाहून डोळे पाणावले, तिथेच मुटक मारून त्या दगडावरील कोरीव कलाकुसरीकडे पहात शांत बसलो. भावनांना आवर घातला, पुन्हा उठलो त्या प्रत्येक नक्षीकामांवर कोळ्यांच्या जाळ्यांनी वेढा घातला होता. शक्य तेवढ्या जाळ्या काढल्या. पाषाणावरील कोरीव काम लाकडांवर कोरल्या सारखे दिसत होते. अनेक फुलांची नक्षीकाम त्या मंदिरावर कोरले होते, मंदिराच्या चारी बाजूंनी कोरलेले खांब मंदिराचे सौंदर्य वाढवित होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भग्न अवस्थेत काही मुर्ती पडल्या होत्या. दोन्ही मंदिरात मुख्य मुर्ती नव्हत्या, रुक्मिणी मातेच्या मंदिरात अलिकडच्या काळात दत्त महाराजांची मुर्ती बसवलेली दिसत होती. मंदिराच्या कळसावरील काही भाग जीर्ण झाल्याने काही पडलेला आहे. साक्षात विश्वकर्माने ही मंदिर साकारली असावीत याचा वेळोवेळी प्रत्यय ही मंदिर पहाताना येत होता. मंदिर पहात असताना तेथून काही गावकरी चालले होते त्यांना थोडे हटकवले अन मंदिराच्या विषयी विचारले पण प्रत्येकाने तिरस्कार भावनेने उत्तर दिले. आमच्या काहीच लक्षात येईना. याच वास्तु दुसरीकडे असत्या तर जागतिक ऐतिहासिक स्थळ म्हणून जगप्रसिद्ध झाले असते. इथल्या स्थानिकांची या स्थळांबद्दल ही प्रतिक्रिया म्हणजे कुठेतरी सातबा-यात ही ऐतिहासिक वास्तु अडकल्याचे लक्षात येते. एखादयाच्या नावावर हा सातबारा असणार आणि तो या वास्तुवर हक्क सांगत असणार. जोपर्यंत या वास्तू जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत हा मालक वाट पहाणार एकदा जमीनदोस्त झाल्या की फुकायला मोकळा, नक्कीच ही मानसिकता असणार, नाहीतर इतक्या भव्य वास्तु दुर्लक्षित राहूच शकत नाही. खरतर स्थानिक पुढारी व युवा कार्यकर्त्यांनी या पवित्र वास्तु जतन करायला हव्यात, यासाठी सरकार दरबारी आंदोलन करायला हव, अशा दुर्लक्षित वास्तुंच्या मालकी हक्क सांगणा-यांना कुठेतरी फुटकळ जागा देऊन या ऐतिहासिक वास्तू सोडवायला हव्यात. याच परिसरात एक श्रीमंत साखर कारखाना आहे, त्यांनी ही ऐतिहासिक वास्तु दत्तक घेऊन जागतिक ऐतिहासिक व पर्यटन स्थळ निर्माण करायला पाहिजे. घोडनदीच्या किनाऱ्यावरील ही ऐतिहासिक वास्तू पर्यटनास चालना देणारी आहे. त्याच बरोबर हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारा ठरायला हवा. आज अब्जो रूपये घालविले तरी अशा वास्तू तयार होणार नाहीत. आज आपण पहातो करौडो रू खर्च करून सिमेंटची मंदीर आपण उभी करीत आहोत. दगडावरची कलाकुसर करणारा आज कोणीच मायका लाल या पृथ्वीतलावर जिवंत नाही. म्हणून या वास्तुतरी जिवंत ठेवायला हव्यात. माझी कळकळीची विनंती आहे आंबेगावकरांना आपल्या भागातील हे वैभव, हा ऐतिहासिक ठेवा वाचवा त्याचे जतन करा...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...