विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

चौधरपाडा : शिलाहार कालीन पुरातन शिलालेख

 


चौधरपाडा : शिलाहार कालीन पुरातन शिलालेख
समाज एकसंध राहण्यासाठी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अनेक पुरावशेष कोरलेले पहायला मिळतात . हिंदू-जैन-बुध्द धर्माशी संबंधित शिल्पकला, वीरगळ, गध्देगाळ, शिलालेख, शस्त्रास्त्रे, विविध राजवंशाची नाणी, लघुचित्रे, सिंधूसंस्कृतीशी निगडीत पुरावशेष, प्रसिध्द चित्रकारांची चित्रे इ. अनेक पूर्वेस यात बघायला मिळतात.
सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकुट, अभीर इ. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या राजवंशांपैकी अजून एक महत्त्वाचा राजवंश म्हणजे शिलाहार. उपलब्ध शिलालेखांवरून महाराष्ट्रात आणि कर्नाटकात शिलाहारांच्या दहा शाखांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य केले असे दिसून येते. त्यापैकी उत्तर कोकणचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कोल्हापूरचे शिलाहार ह्या तीन प्रमुख शाखा होत्या.हेमाडपंती कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.
उत्तर कोकणच्या शिलाहारांचे ठाणे आणि रायगड प्रांतावर राज्य होते आणि त्यांची राजधानी श्रीस्थानक (आताचे ठाणे) होती. ठाणे, कल्याण शहरांच्या आसपास शिलाहारांचा इतिहास उलगडून सांगणारी अनेक दानपत्रे, मंदिरे पहायला मिळतात. भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
इस ८०० ते १२६५ अशा साडे चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत शिलाहार राजघराण्याने उत्तर कोकण प्रांतावर राज्य केले. या राजघराण्याचा इतिहास समजण्याकरिता या राजांनी दिलेली ताम्रपट आणि शिलालेख स्वरूपातील दानपत्रे अतिशय मूल्यवान आहेत. शिलाहार राजे शिवभक् होते. त्यांनी अप्रतिम भूमिज शैलीतील( पूर्व हेमाडपंती शैली) अनेक शिव मंदिरे बांधली. कल्याण परिसरातच खिडकाळी, लोनाड मधील रामेश्वर/लोणादित्य आणि बापगाव येथील सुम्पेश्वर हि मंदिरे शिलाहार राजांच्या काळातील. विहार येथील अनंतदेव यांची गध्देगळ, भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
बापगाव येथे माळरानात अनेक वर्षे एक प्राचीन शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडलेला होता. शिलाहार राजा दुसरा केशिदेव याने कोरविलेला हा शिलालेख आता नष्ट झालेल्या सुम्पेश्वर मंदिराबद्दल काही माहिती देतो. इतिहासात इस १८८२ मध्ये ही शीला सापडल्याची नोंद आहे. त्यावरील लेखाचे वाचन पं. भगवानलाल इंद्राजी यांनी केले होते. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. या लेखात २२ ओळी आहेत.
सिद्धम ।
अर्थ : (सिध्दी असो)
ॐनमो विनायकाय ॥
अर्थ : (विनायकास नमस्कार असो)
नमामि भुवनोत्पत्तिस्थितीसंहारकारीणं(णम्) ॥
अर्थ : (विश्वाची उत्पत्ती, संंधारण व लय यास कारणीभूत असलेला व)
श्रीमत्षुंपेश्वरंभक्तजनसर्वार्त्तिहारीणं ॥१ ॥
अर्थ : (भक्तजनांचे दुःख हरण करणा-या श्रीमत् षुपेंश्वरास नमन असो)
श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्ज्जीमूतकेतो: कुलेविख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय (य:) श्रीकेशिपृथ्वीपति: ।
अर्थ : (श्रीविद्याधर वंशाचा भूषणभूत जीमूतकेतूच्या कुळात प्रसिद्ध असलेल्या राजा अपरार्काचा पुत्र पृथ्वीपती केशीदेव)
यस्यापारपवित्रपौरुषनिधेरालोक्य राज्यस्थितिं श्रीरामादिमहिभुजां भगवती धत्तेधरा न स्मृतिं ॥२॥
अर्थ : (ज्याचे पावित्र्य अपार व अवर्णनीय आहे, व ज्याच्या पौरूषत्वाचा संचय अवलोकन करण्यासारखा आहे व ज्याच्या राज्याची समृद्धी श्रीराम आदी पराक्रमी राजांची पृथ्वीदेवतेला स्मरण करून देणारे आहे.
स(श)क संवत् ११६१ विकारीसंवत्सरांतर्गत माघ वदि १४ चतुर्द्द्श्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणीअद्येह समस्तराजावलीसमलंकृत महाराजाधिराजकोकणचक्रवर्त्ति श्रीकेशिदेवकल्याणविजयराज्ये तथैतत्प्रसात्समस्तराज्यमंडलचिंताभारं समुद्वहति ।
अर्थ : (शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी संपूर्ण राजमंडळाने सुशोभित असलेला महाराजाधिराज कोकणचक्रवर्ती श्रीकेशीदेव ज्यांचे राज्य पराक्रमी व कल्याणदायी आहे, अत्यंत प्रसन्न होऊन जो चिंता वहातो)
महामात्ये श्रीझंपडप्रभु महासांधिविग्र(हि)क राजदेवे पंडित श्रीकरणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखे(षु) सत्सु एतस्मिन्काले प्रवर्तमाने
सतिब्रह्मपुरीग्रामदानसा(शा)सनं समधिलिक्ष(ख्य)ते यथा ॥
अर्थ : (महामंत्री श्रीझंडप्रभू महासंधीविग्रहक रामदेव पंडित व कोषाध्यक्ष अनंतप्रभू हे ज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्या ब्रम्हपूरी या गावात हे आज्ञापत्र या काळात लिहिले गेले ते असे)
श्रीषोंपेश्वरदेव पूजनसदाव्यासक्तसर्वा(न्तरः) ।
अर्थ : (श्री षूपेंश्वर देवाच्या पूजाअर्चेत सतत रममाण असलेला)
सत्पात्रद्विज सोमनायकव (ब)टोःसंतानयो(भो)ग्यस्थितिं (तिम्)।
अर्थ : (योग्य सत्पात्र ब्राम्हण सोमनायक यास त्याच्या मुलाबाळांच्या देखभालीसाठी)
श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं।
अर्थ : (पुरातन काळात शिवाच्या वास्तव्यास योग्य असलेल्या मनोधारिणी ब्रम्हपूरी)
वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ॥३॥
अर्थ : (जेथे शूर केशीदेव पृथ्वीपती विस्मयकारक गोष्टी करण्यात अग्रेसर असे.)
बटुकनामानि कथ्यंन्ते। सोमनायक: सुर्य्यनायक: । गोविंदनायक: । नाऊ नायक:। इति चत्वारो बटुका: ॥
अर्थ : सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक व नावनायक अशी या चार भटांची नावे सांगितली आहेत.)
निर्व्वाहाय पुरारिपूजकबटुश्रेणी द्विजानां सदावो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे/ज)सपल्लीपुरा दत्ता श्रीशिवरात्रि पर्व्वणी विभोषोंपेश्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चंद्रार्क्कतारावधि॥४॥
अर्थ : (त्या शिवाची पूजा करणा-या बटूक थोर श्रेणी ब्राम्हण बापगावातील त्याच्या निर्वाहासाठी सर्वसीमांतर्गत मांजसपल्ली (वाडी) श्रीकेशीनरेश्वर षुंपेश्वरासमोर यावत् चंद्र दिवाकरौ स्वच्छ चांदण्या रात्री शिवरात्री दान दिला.
(राज्य)स्य मंत्रीणान्यैर्व्वा कर्तव्यं धर्म्मपालनं । धर्मध्वंशे … नरकस्थितिं ॥५॥
अर्थ : (राजमंत्र्यांना या राजपत्राचे पालन करणे हे धर्मपालन करण्यासारखे आहे असे मानले पाहिजे तसे न केल्यास ती नरकस्थिती ठरेल)
तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनिभि: । सुवर्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या(वदाभूत) संप्लवं ॥६॥
अर्थ : एखादे सोन्याचे नाणे, एक गाय, पृथ्वीवरील भूमीचे दान केले असता ते जो परत हरण करतो किंवा ते घेण्याची इच्छा करतो त्याला निरंतर नरक प्राप्त होतो असे मुनी आचार्यांनी सांगून ठेवले आहे.
मंगलं महाश्री । (शुभं भ) वतु ॥ ले(ख)कपाठयोः ॥
अर्थ : श्रेष्ठांचे (वडीलधा-यांचे) कल्याण असो, सर्व शुभ होवो, लेखक व वाचक यांचे ही शुभ होवो.
याच्या वाचनांती काही गोष्टी ठळकपणे निदर्शनास येतात
१. हा शिलालेख म्हणजे राजाज्ञा होती.
२. राजा केशीदेव याने ब्राम्हणांना भूदान केल्याचा उल्लेख आहे.
३. शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी दानपत्र दिले.
४. या आज्ञेचा अथवा नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी नरकप्राप्ती शापवाणीचा धाक घालण्यात आला आहे.
५. ब्रम्हपूरी, बापगाव या गावांचा उल्लेख
६. सूंपेश्वर मंदिर या प्राचीन मंदिराचा उल्लेख
७. राजा केशीदेव याचे वंश व कूळ व पित्याचे नाव
८. राजा केशीदेव याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे
९. सदर शिलालेख संस्कृत भाषेत असून, लिपी नागरी आहे
१०. या शिलालेखात ६ श्लोक व २२ ओळी आहेत
याचा नेमका अर्थ स्थानिक ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळे या शिळेला स्पर्श झाल्यास गावावर संकट येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. गावकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. इतिहासकार, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग, पोलिस, लोणाडचे सरपंच, पोलिस आणि स्थानिक नेते यांनी संयुंक्तपणे अनेक वर्षे काम करून जनजागृती घडवून आणली. आणि २०१४ रोजी महाशिवरात्रीला सुमेश्वर/सुम्पेश्वर मंदिराजवळ शिलालेखाची साग्रसंगीत पूजा करून लोकांना दिसेलअसा लोखंडी जाळीआड सुरक्षित स्थापना केली.
सुमेश्वर मंदिरातील शिवलिंग व शिवपार्वतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...