विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

बाळाजी विश्वनाथ पेशवा

 




बाळाजी विश्वनाथ पेशवा
 2 एप्रिल, मराठी राज्याचे वैभव व दरारा वाढविणार्या पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा स्मरणदिन. याच दिवशी म्हणजे 2 एप्रिल 1720 साली बालाजी विश्वनाथ यांचे पुण्याजवळ सासवड येथे निधन झाले. आपल्या मुत्सदीपणाने त्यांनी कानहोजी अंगरे सारख्या व्यक्तिमत्वास ही आपलेसे करून घेतले. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे कार्य आपल्याला छ्त्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीपासून जाणवत असले तरी त्या पूर्वी देखील बाळाजी विश्वनाथ मराठी राज्यात अन पुणे प्रांतात जबाबदार व्यक्तिमत्व होते हे पुढील पत्रावरून सिद्ध होते. या पत्रात उल्लेख असलेली मंदिरे ही तर त्यांच्या वास्तुशास्त्र आणि प्रचिंनत्वाबद्दल प्रसिद्ध आहेतच. त्यामुळं इथे विस्तारभयास्तव मंदिरांबाबत जास्त काही लिहीत नाही. मात्र पत्रात सध्याच्या “पांडेश्वर” गावचा नावाचा “पांडवे” असा नाम उल्लेख हे विशेष.
आजच्या दिवशी बाळाजी विश्वनाथ यांचे स्मृतीस अर्पण.
बालाजी विश्वनाथ सरसुभेदार यांस पत्र की, श्री पांडेश्वर व भुलेश्वर ही दोन्ही जागृत देवस्थाने आहेत. त्याचे सनदा बरहुकूम चालवणे.
मूळ पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे, पत्र इ.स. 1699-1700 चे आहे.
श्री सकलगुणमंडित अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री बाळाजी विश्वनाथ, सरसुभेदार व कारकून, प्रांत पुणे यासी प्रती श्रीकराचार्य पंडितराव, आशीर्वाद राज्याभिषेक शके 25 प्रमाथीनाम संवस्तरे आषाढ बहुल चतुर्दशी मंदवासरे देवस्थानानी वास्तव देहाय
श्रीपांडवेश्वर मुक्काम मौजे पांडवे तर्फ करेपठार येथे अभिषेकी ब्रम्हणास व देवास मोईन पुरातन आहे. त्याची सनद अलाहिदा सादर आहे. त्याप्रमाने त्याप्रमाणे पाववीत जाणे.
श्री भुलेश्वर मुक्काम मौजे माळशिरस, परगणे सुपे, येथे देवासी व अभिषेकी ब्रम्हणास मोईन पुरातन आहे. त्याची सनद अलाहिदा सादर आहे त्याप्रमाणे पाववीत जाणे.
दोन्ही देवस्थाने जागृत. येथे देवांसी व अभिषेकी ब्राम्हणास काही पावत नाही ऊर्जा चालत नाही, म्हणोन विदित झाले. त्यावरून हे पत्र सादर केले आहे. तरी तुम्ही उभयंता देवस्थानांचे पेशजी सनदा आहेत त्याप्रमाणे पाववणे आणि देवाची पूजा चाले ते गोष्टी करणे. जाणिजे छ 27 मोहरम सुरसन मया व अलफ. हे आशीर्वाद.
सोबत जोडेले फोटो – 1) पांडेश्वर मंदिर, 2) भुलेश्वर मंदिर व 3) पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची सासवड येथील समाधी.
किरण आ. खराडे
पुणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...