विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

'सिऊबाराजे सील करा अंगाला..'


 

'सिऊबाराजे सील करा अंगाला..'

प्रतापगडच्या युद्धाच्या प्रसंगी अफझलखानाला जेंव्हा शिवाजी महाराज भेटायला जात होते त्या प्रसंगी महाराजांनी जी काळजी घेतली त्यात 'सिऊबाराजे सील करा अंगाला' असे वाक्य आहे.
सील करा अंगाला म्हणजे अंगात चिलखत घाला.
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
शत्रूस प्रत्यक्ष भेटीस जाण्याअगोदर प्रत्येक वेळी महाराज कवायत करत असत असा स्पष्ट पुरावा आपल्याकडे आहे.
गळाभेट घेतल्यावर खान दगा करेल ह्याची महाराजांस हेरखात्याकडून गुप्त माहिती मिळालेली असल्यामुळे महाराजांनी प्रतापगडावर खानास भेटण्याच्या अगोदरच प्रत्यक्ष भेटीची रंगीत तालीम १०० टक्के करून पाहिली असेल.
महाराजांनी प्रतापगडावर खानासारख्या उंचीच्या धिप्पाड मनुष्यासमोर गळा भेटीचे प्रात्यक्षिक करून पाहिले असेल.
ह्या गळा भेटीत महाराजांनी सर्व शक्यतांचा अभ्यास केला असेल.
खानाने पाठीवर वार केला किंवा पोटाच्या बाजूस आतून कुशीवर वार केला किंवा गळा दाबला, किंवा मानेवर वार केला, तर आपण कसा पवित्रा बदलावा आणि आपल्या हातातील शस्रे कशी चालवावीत ह्याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास महाराजांनी केला असावा.
त्यामुळे महाराजांनी 'अंगात चिलखत घालताना' कुठल्या प्रकारचे घालावे ह्याचाही खल झालाच असेल.
महाराजांच्या पदरी असलेल्या आणि प्रतापगडच्या लढाईत उपस्थित असलेल्या परमानंद नेवासकर ह्यांच्या शिवभारतात महाराजांच्या गळाभेटीच्या प्रसंगाचे अत्यंत सूक्ष्म वर्णन आहे.
(हा लेख लिहिण्या अगोदर असे प्रत्यक्षिक मी आमच्या घरातही करून पाहिले आहे. तुम्हीही करून पहा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान भेटीचा प्रसंग किती भयानक होता ह्याची जाणीव होईल.)
**
खान उंच आणि धिप्पाड देहाचा. खानाच्या एकूण वर्णनावरून असे निदर्शनास येते कि खान हा लठ्ठ आणि मोठं पोट सुटलेल्या प्रकारातील मनुष्य होता. त्याची जमेची एकच बाजू होती ती म्हणजे तो उंच होता.
ह्या उलट महाराज अंगाने मजबूत, काटक आणि उंचीने खानापेक्षा बऱ्यापैकी कमी होते. गळाभेट घेतेवेळी महाराजांचे शीर खानाच्या छातीला लागले. ह्यावरून उंचीचा फरक आपल्या लक्षात येईल.
**
आलिंगन देण्याच्या प्रसंगी...
खानाने एकदम महाराजांना मिठी मारली आणि खानाने महाराजांची मान आपल्या डाव्या काखेत पकडून दाबली.
ह्या क्षणी महाराजांची मान खानाच्या पाठीमागे होती. त्यामुळे खान त्याच्या पुढील बाजूने काय करत आहे हे महाराजांना कळायला काहीही मार्ग नव्हता.
पापणी लवते न लवते तोच खानाने आपली कट्यार उजव्या हाताने कमरेतून काढून उजव्या हातानेच सर्र्कन महाराजांच्या डाव्या कुशीवर चालविली. टर्र्कन महाराजांचा अंगरखा फाटला. खानाची कट्यार खरखरली. महाराजांनी आत चिलखत घातलेले होते.
तरीही महाराजांनी आपल्या ज्ञानेंद्रियांनी क्षणात खानाचा दगा ओळखून त्याच क्षणी अत्यंत चपळाईने बिचव्याचे तीक्ष्ण पाते खसकन खानाच्या पोटात खुपसले आणि खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला.
खानाने अंगात चिलखत घातलेले नव्हते. त्यामुळे महाराजांचा वार कारगर झाला.
गच्च भरलेले गव्हाचे पोते जसे धारदार सुऱ्याने टर्र्कन फाडावे तसे खानाचे भरगच्च पोट महाराजांनी टर्र्कन फाडले. खानाचा सर्व कोथळाच बाहेर येऊन त्याची सर्व आतडी बाहेर पडून खाली लोंबू लागली....रक्ताचा पाट वाहिला...
**
आता अफझलखानापासून बचाव होण्यासाठी महाराजांनी जे चिलखत अंगात घातले ते कसे असावे?
ते कसे असावे ह्याची आज आपण समीक्षा करणार आहोत.
महाराजांनी अफझलखान प्रसंगी नेमके कुठले चिलखत अंगात घातले ह्याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नाही.
आपण फक्त अंदाज बंधू शकतो.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
चिलखतात भिन्न प्रकार आहेत.
पूर्ण जाळीदार,
जाळीदार आणि त्यास लोखंडी पत्रे लावलेले,
आणी पूर्ण लोखंडी
असे चिलखतात मुख्यतः प्रकार असतात. चिलखतात इतरही काही प्रकार असतात.
पूर्ण लोखंडी चिलखतास आतून जाड कापडी अस्तर असते.
अफझलखानाने चालविलेली कट्यार महाराजांच्या डाव्या कुशीवर नुसतीच खरखरली. वार कारगर झाला नाही असे वाक्य आहे.
खुपसणे आणि वार करणे ह्यात अंतर आहे.
स्व-संरक्षणासाठी जवळून होणाऱ्या झटापटीच्या प्रसंगी मुख्यतः कट्यार वापरली जाते.
कट्यार खुपसावी लागते. नीट खुपसता यावी ह्यासाठी आकाराने कट्यार आखूड असते. कट्यारीचा आकार इंग्रजी V शब्दाप्रमाणे असतो. त्या V आकारामुळे कट्यार फार वेगाने समोर आलेल्या आवरणांस भेदून शरीराचा वेध घेते.
V आकारामुळे कट्यार शरीरात घुसताना छेद विस्तारत शरीरात प्रवेश करते.
कट्यार फार टोकदार असते आणी कट्यारीचे पाते श्यक्यतो कठीण प्रकाराचे असते. शिवाय कट्यार शत्रूच्या पोटात खुपसल्यानंतर रक्त बाहेर यावे म्हणून कट्यारीस नाळीही असतात.
कट्यारीच्या विरुद्ध पाहिले तर तलवार लांब असते. तलवारीला टोक जरी असले तरी ते बचावात्मक चढाई करताना शत्रूच्या शरीरात खुपसण्यासाठी जरी वापरले जात असले; तरी तलवारीने वार अधिक कारगर होतो. कारण तलवार लांब आणी धारदार असते.
मराठ्यांच्या धोप तलवारी ह्या लवचिक प्रकारातील असल्यामुळे टोकदार जरी असल्या तरी टोक घुसविताना तलवारीचे पाते वाकण्याचा संभव अधिक असतो. अश्या प्रसंगी खुपसणे आणी वार करणे असे दोन्ही प्रकार तलवार चालविताना वापरले जातात.
कट्यार आखूड असल्यामुळे तलवारीसारखी वार करण्यास वापरली जात नाही तर विशेषकरून खुपसण्यासाठी वापरली जाते.
कट्यारीचे टोक हे अंकुचीदार असते. जाळीदार चिलखतावर जर वार केला तर जाळीच्या छिद्रांमध्ये कट्यारीचे टोक V आकारामुळे अडकेल. खरखरणार नाही. फार तर दोन तीन छिद्रे घसरेल पण खरखरणार नाही. ते अडकेलच.
मात्र तलवारीचा वार अश्या जाळीदार चिलखतावर केला तर हे जाळीदार चिलखत चांगल्या प्रकारे रक्षण करू शकेल. कारण ह्या जाळीदार चिलखताचे एका खाली एक पदर असतात.
आता लेखातील क्रमांक १ आणि २ लोखंडी चिलखत पहा. लोखंडी चिलखत हे सपाट असते. त्यात कट्यारीचे टोक अडकेल असा त्यास अडथळा नसतो. त्यामुळे कट्यारीने वार केला तर तो खरखरत घसरेल. अडकणार नाही.
ह्याचा अर्थ असा होतो कि; महाराजांनी अफझलखान प्रसंगी जे चिलखत अंगात घातले होते ते लेखात दाखविलेल्या क्रमांक १ आणि २ चिलखताप्रमाणे असावे. कारण असे चिलखत त्या काळी वापरत असत.
**
टीप: घरात आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्ती बरोबर खानाच्या भेटीचे प्रात्यक्षिक करून बघा.
जो उंच तो खान. आणि जे उंचीने तुमच्या छाती पर्यंत येतील ते छत्रपती शिवाजी महाराज.
तुम्ही जर खान असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळाभेटीवेळी तुमचा डावा हात अचानक वर करून महाराजांची मान तुमच्या डाव्या कुशीत धरायची आहे.
महत्वाचे: हलक्या हाताने धरा. नाहीतर अनर्थ होईल. आपण प्रात्यक्षिक करत आहोत हे लक्षात असुद्या.
आणि तुमच्या उजव्या हाताने कल्पनेने कट्यार काढून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या कुशीवर चालवून पहा.
ह्याच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वार खानाच्या पोटावर केले त्याचे प्रात्यक्षिक घरातील छोट्या शिवाजी महाराजांस करायला सांगा.
सगळ्यात महत्वाचे: प्रात्यक्षिक करताना कोणीही गमतीनेसुद्धा कुठल्याही प्रकारचे धार असलेले किंवा धार नसलेले शस्र वापरू नये. हे फक्त प्रात्यक्षिक आहे हे ध्यानात ठेवा.
हा प्रसंग अनुभवल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळाभेटीच्या शौर्याची महती कळेल.
तुमचा गळाभेटीचा अनुभव शेअर करायला विसरू नका.
**
चित्र लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
चित्र लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...