कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या तालुक्याच्या गावी निपाणकर देसाई यांची भव्य गढी म्हणजे एक मजबूत भुईकोट आहे. सिधोजीराव निंबाळकर या घराण्याचे मूळ पुरूष होय. गढी आजही मजबूत स्थितीत उभी आहे. गढीचे भव्य प्रवेशद्वार, बुरूज, तटबंदी पहायला मिळते. गढीत आतमध्ये खूप मोठी आणि वेगळ्याच धाटणीची बारव पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर वाड्याच्या प्रवेशद्वारावर पाषाणात खूप छान असे कोरीव काम केलेले प्रवेशद्वार पहायला मिळते. जवळच दगडी कारंजेसुद्धा आहे. तेथूनच प्रवेश केल्यावर आतमध्ये मोठा चौक आहे आणि तीन मजली भव्य वाडा आहे. सागवानी भव्य बांधकाम, काष्टशिल्प पहायला मिळते. आतमध्ये देवघर आहे आणि अनेक पुरातन वस्तू पहायला मिळतात. वरच्या मजल्यावर दिवाणखाना आहे आणि तेथे जुन्या काळात बनवलेली नक्षीकाम पहायला मिळतात. बाहेर टेहळणीसाठी जागा बनवलेली आहे जिथून पूर्ण निपाणीवर नजर ठेवता येवू शकते.
आप्पा देसाई निपाणकर - याचें मूळ नांव सिधोजीराव निंबाळकर हे प्रथम दौलतराव शिंद्याच्या पदरी नोकरीस होते. इ.स. १८०० सालीं दौतलराव शिंद्यांनी आप्पा देसाईच्या हाताखालीं आपल्या पलटणी देऊन त्यांना परशुरामभाऊ पटवर्धनाची जहागीर काजीब करण्याकरितां रवाना केलें. देसायाच्या सैन्यापैकीं पायदळाच्या पलटणी परत फिरल्या पण देसायाच्या फौजेनें पटवर्धनाच्या मुलुखांत बरीच लुटालूट केली. १८०३ सालीं जनरल वेलस्ली हा म्हैसूरच्या उत्तर सरहद्दीवरून बाजीरावास मसनदीवर बसविण्याकरितां पुण्याकडे येत असतांना आप्पा देसाई हे कृष्णा नदीच्या तीरीं त्यास येऊन मिळाले. बाजीरावाच्या पदरीं बापू गोखले वगळल्यास आप्पा देसाई हे एकटेच उत्तम सेनानायक होते. इ.स. १८०८ सालीं आप्पा देसायानीं विश्वासराव घाटग्यानां मदत करून त्याच्या ताब्यांत असलेल्या चिकोडी व मनोळी या जिल्ह्यांचें कोल्हापूरकरांपासून रक्षण केलें. परंतु पुढें बाजीरावाकडून त्यांना फूस मिळाल्यामुळें त्यानीं हे दोन्हीहि जिल्हे आपल्याच कजबांत घेतले. याच सुमारास कोल्हापूरच्या सैन्यानें सांवतांच्या वाडीस वेढा दिल्यामुळें खेम सांवताची बायको लक्ष्मीबाई हिनें विश्वासराव घाटगे व आप्पा देसाई यांनां आपल्या मदतीस बोलाविलें. स्वतः बाजीरावाचीच या गोष्टीस गुप्तपणें संमति मिळाल्यानें आप्पा देसायानीं ती तात्काळ कबूल केली. ते लक्ष्मीबाईच्या मदतीस गेले व वाडीचा वेढा उठवून त्यांनी घाटावरील कोल्हापूरकरांच्या मुलुखावर स्वारी केली. आप्पा देसाई आता सांवतवाडी संस्थानावरहि आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूं लागले. आप्पा देसाईयाच्या कारकुनाच्या चिथावणीवरून खेम सांवताच्या मुलाचा गळा दाबून प्राण घेण्यांत आला; परंतु या खुनामुळें आप्पा देसायाचा मुळींच फायदा झाला नाहीं. कारण पुंड सांवत नांवांच्या सांवताच्या घराण्यांतील वारसदार इसमानें आप्पा देसायाचें बहुतेक सैन्य घाटांवर कोल्हापूरकरांशीं लढण्यांत गुंतलेलें आहे ही संधि साधून आपल्या मुलुखांत असलेलें त्याचें सर्व सैन्य देशाबाहेर हांकून लावलें व संस्थानचा कारभार आपल्या हातीं घेतला. बाजीरावाच्या कपटीपणामुळें इ.स. १८१३ च्या सुमारास आप्पा देसायांना विनाकारण आपल्या चतुर्थांश जहागिरीस मुकावें लागलें.
बाजीरावाच्या गुप्त उत्तेजनामुळें त्यानी कोल्हापूरकरांचा कांहीं मुलूख सोडण्याचें नाकबूल केल्यावरून इंग्रजांनीं त्याच्यांकडून त्यांची चतुर्थांश जहागीर बाजीरावास देवविली.
तथापि यापुढेंहि कांहीं वर्षे आप्पा देसाई हे बाजीरावच्याच पक्षास चिकटून होते. ता.१ जानेवारी १८१८ रोजीं कोरेगांवची लढाई झालीं, तींत हा पेशव्याच्याच बाजूनें लढले होते. आप्पा देसाई हे बाजीरावाचा एक नाणावलेले सेनापति होते तरी बाजीरावाचें राज्य इंग्रजांनी घेतल्यावर त्यांनी आप्पा देसायांची जहागीर खालसा केली नाहीं कारण एक तर आप्पा देसाई हे पेशव्यांना बऱ्याच उशीरा मिळाले होते. शिवाय ते इंग्रजांविरुद्ध नेटानें असे कधींच लढले नव्हते आणि एके प्रसंगीं तर त्यानीं इंग्रजांकडील कैद्यांस दयाळूपणानें वागविले होतें. पेशव्याशीं युद्ध चाललें असतांच त्यांचा इंग्रजांशी पत्रव्यवहार सुरू होता. परंतु त्यांनी पेशव्याचा पक्ष बऱ्याच उशीरां सोडल्यामुळें त्यांना त्यांच्या जहागिरीपैकीं चिकोडी व मनोळी हा भाग कोल्हापूरकरांस परत करण्यांत आला व शिवाय निजामाच्या राज्यांतीलहि त्याचें बरेंच उत्पन्न बुडालें. बाकीची त्यांची जहागीर त्यांची त्यांना परत देण्यांत आली व निजामाच्या राज्यांतील उत्पन्न बुडल्यामुळें झालेल्या नुकसानीचीहि अंशतः भरपाई करून दिली गेली.
टीम - पुढची मोहीम
साभार - विजय कातळे दादा
No comments:
Post a Comment