विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 24 April 2021

संभाजी कावजी कोंढाळकर.

   संभाजी कावजी कोंढाळकर.

 

शिवरायांनी केलेली मदत जावळीचा चंद्रराव यशवंतराव मोरे विसरला होता.त्याने स्वराज्यावर स्वाऱ्या केल्या आणि महाराजांना ''येता जावळी जाता गोवळी'' असे उद्धटपणाचे पत्र पाठवले. मोऱ्यांच्या अशा वागण्याचा महाराजांना खूप राग आला आणि महाराजांनी जावळी घेण्याचा निश्चय केला.या मोहिमेसाठी महाराजांनी काही सरदारांची निवड केली.त्यातच एक इतिहासाचा पानावर कधीच नसलेला यौद्धा संभाजी कावजी कोंढाळकर. 

                     जावळीच्या जंगलात महाराजांचे सरदार फौजेसह आत घुसले.त्या जंगलात घुसने म्हणजे साक्षात यमाला आव्हान देणे होते.मोऱ्यांकडे हणमंतराव मोरे म्हणून एक सरदार होता.कसलेल्या आणि पिळदार शरीराचा आणि हत्ती एवढ्या ताकदीचा. चंद्ररावाचा तो नातलग होता.महाराजांनी जवळीवर हल्ला केला.एक भयंकर कालवा उठला कापकाप सुरु झाली.जावळीच्या खोऱ्यात नुसत्या किंकाळ्या नि आरोळ्या ऐकू येत होत्या महाराजांच्या माणसांनी जावळी कोंडली.
                    मोऱ्यावर चौफेर हल्ला झाला.मोरे मंडळी हिमतीने लढत होती.समोर हणमंतराव मोरे होता तो काही मागे हटत नव्हता. संभाजी कावजीने त्याला पाहिले. दोघात जबरदस्त हाणामारी झाली.अन संभाजीने हणमंतरावाला ठार केले.मोऱ्यांच्या बलाढ्य सरदार पडला त्यांची दाणादाण उडाली.जावळी मोऱ्यांच्या हातून निसटली. दि. १५ जानेवारी १६५६ जावळीवर स्वराज्याचा भगवा फडकला.

                    संभाजी कावजी कोंढाळकर ताजा दमाचा मर्दगडी होता.भल्यामोठ्या उंचीचा आणि १० हत्ती एवढ्या ताकदीचा.एका कथेनुसार तो जेवायला बसल्यावर संपूर्ण बोकड खात असे.यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज लावता येईल.महाराज एकदा जेध्याकडे भेटीला गेले असता त्यांना हे रत्न दिसले आणि त्यांच्या मनात भरले त्यांनी जेध्याना १ हजाराची मनसब देऊन संभाजी कावजीला आपल्या सैन्यात घेतले. 
                      गुरुवार दि.१० नोव्हेंबर १६५९ प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या भेटीचा दिवस होता.अफजल खानासारख्या ताकदवर सरदारशी मुकाबला करायचा तर त्याच्या सारख्याच ताकदीचा माणूस आपल्याकडे पाहिजे.तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो फक्त संभाजी कावजी कोंढाळकरच होता. म्हणून महाराजांनी अंगरक्षकांमध्ये त्याला सुद्धा घेतले होते. 
                       भेट झाली.खानाने दगाबाजीचा डाव केला.महाराजांनी त्याला प्रत्युत्तर दिले.खानाच्या पोटात महाराजांनी वाघनखांचा मारा केला.खानाचे आतडे बाहेर आले.ते पोटाला दाबून तो शामियानाच्या बाहेर पडला. बाहेर त्याचे भोई पालखी घेऊन तयार होते.त्याला पालखीत घालून ते पुढे चालू लागले. इतक्यात संभाजी कावजीने ते पहिले तो पुढे आला तलवारीच्या एका वारात त्याने भोयांचे पाय कापले. खान पालखीतून खाली पडला संभाजीने खानाच्या मानेवर एकच असा जोरदार वार केला कि खानाचे मुंडके धडावेगळे झाले,ते घेऊन तो महाराजांपाशी आला.प्रतापगडाचा रणसंग्राम असा पूर्ण झाला.

                         महाराजांचा हा पराक्रम जसा वाढत होता तसेच संभाजी कावजी कोंढाळकर हे नाव सुद्धा मोठं होत होते.संभाजीचा पराक्रम शाहिस्तखानाच्या कानी पडला आणि त्यानी त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.महाराजांना हि गोष्ट कळली महाराजांनी संभाजीची कानउघडणी केली.त्यामुळे रागावून तो शाहिस्तखानाकडे  नोकरीला गेला. महाराज संभाजीवर खूप संतापले होते.त्यांनी प्रतापराव गुजरास त्यास कैद करण्यास पाठवले. दोघात जबरदस्त युद्ध झाले आणि शेवटी दि.२४ एप्रिल १६६० रोजी प्रतापरावाने संभाजीस ठार केले.

                         नाण्याच्या अश्या दोन बाजू पाहायला मिळाल्या.महापराक्रमी आणि शक्तिमान असा संभाजी कावजी रागावून शत्रूला मिळतो आणि शेवटी आपल्याच माणसाकडून ठार होतो. महाराजांनाही याचे खूप दुःख झाले. 
(संदर्भ:- राजाशिवछत्रपती पृ.क्र.२३२,२३३ 
९१कलमी बखर, सभासदाची बखर )

- रोहित सरोदे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...