विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 6 April 2021

पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे

 पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे

 डभईच्या युद्धात १ एप्रिल १७३१ मध्ये पेशव्यांच्या पदरी गेलेल्या भावसिंगराव ठोकेने सेनापती त्रिंबकरावांवर बारगिरास सांगून गोळी झाडली. यामुळे त्रिंबकरावांचा मृत्यू झाला, *असे संदर्भ सेनापती दाभाडे दफ्तर, डॉ. एस. ए. बाहेकर व पुष्पा दाभाडे यांच्या उमाबाईंवरील पुस्तकात मिळतात.* त्रिंबकरांवांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. या प्रकरणात बाजीराव पेशव्यांना माफी द्यावी म्हणून छत्रपती शाहू महाराज स्वत: त्यांना घेऊन तळेगावास गेले. छत्रपती स्वत: आल्याने उमाबाईंना पेशव्यांना माफ करावे लागले. त्यानंतर छत्रपती शाहूंनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.

गुजरातचा बहुतेक भाग जरी मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवित पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला. मात्र अहमदाबादमधील मोगलाचे ठाणे अजूनही कायम होते.
१७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. यावेळी मोगलांचा जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्यांनी मुगल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी इतिहासात नोंद मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबात्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढेही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. जात उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला.

१६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले. मात्र दरम्यान, उमाबाईंनी पेशव्यांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. पेशवाईतील राजकारणाच्या रंगात उमाबाईंची पकडही यादरम्यान पहायला मिळते. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. 


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...