लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
सेनापती खंडेराव दाभाडे व उमाबाई दाभाडे यांना तीन पुत्र होते. यशवंतराव, त्रिंबकराव व बाबुराव. त्र्यंबकराव अत्यंत शूर व कर्तबगार असून आपल्या वडिलांच्या कारकीर्दीतच ते गुजरातच्या मोहिमा वर जावू लागले. गुजरात भागाच्या चौथाई वसुलीचा मोकासा छत्रपती शाहू महाराजांनी खंडेराव यांना दिला होता. खंडेराव सेनापतिपदी असतानाच त्र्यंबकराव यांच्या शौर्यामुळे सेनाखासखेलपद त्र्यंबक रावांना देण्यात आले. १७२९ मध्ये खंडेराव यांच्या मृत्यूनंतर सेनापती पदाची सूत्रे त्रिंबकराव दाभाडे यांना मिळाली. त्रिंबकरावांनी हाताखालचे सरदार घेऊन गुजरात प्रांतावर अंमल बसवायला सुरुवात केली. प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराजांनी गुजरात प्रांत त्र्यंबकराव दाभाडे यांच्या कडे दिल्यामुळे पेशव्यांना काहीच हालचाल करता येत नव्हती. गुजरात मध्ये आपला शिरकाव करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी थेट मोगलांकडून चौथाई व सरदेशमुखीचा हक्क, वसुलीची परवानगी मिळवली.
त्रिंबकराव दाभाडे व बाजीराव पेशवे यांच्यात या कारणासाठीच संघर्ष पेटला. एकुणच गुजरात प्रांतात अस्थिर वातावरण निर्माण झाले.गुजरात प्रांतात पेशव्यांनी केलेल्या दांडगाईला त्रिंबकराव दाभाडे यांनी आक्षेप घेतला. खुद्द शाहू महाराजांनी गुजरात प्रांत दाभाडे कडे दिला होता. तर मग त्या प्रांतात पेशव्यांनी चौथाई वसूल करण्याचे काहीच कारण नव्हते. १७२६ च्या मार्च महिन्यात सरबुलंदखानाने पेशव्यांच्या दबावाला बळी पडून गुजरातची चौथाई पेशव्यांना देण्याचे कबूल केले. दाभाडे यांनी गुजरातेत पेशव्यांनी केलेल्या दांडगाईला आक्षेप घेतला. खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी गुजरात प्रांत दाभाडे यांच्याकडे तर माळवा प्रांत पेशव्यांकडे अशी वाटणी केली होती. मग पेशव्यांनी गुजरात मध्ये चौथाई वसूल करण्याचे काहीच कारण नव्हते. परस्पर पेशव्यांनी गुजरातची वाटणी करण्याचा घाट घातला होता. बाजीराव पेशव्यांनी गुजरात मधील काही परगणे आम्हास द्यावे व माळव्यातील आम्ही मिळवलेले परगणे तुम्हास देतो असे म्हणणे मांडले. यावर दाभाडे यांनी उत्तर दिले कि " शाहू महाराजांनी तुम्हास माळव्याची मोहीम व आम्हास गुजरातची मोहीम सांगितली आहे. तुमचा कारभार तुम्ही करा, आमचा कारभार आम्ही करू. आपण आमच्यात वाटणी मागू नये. यातच पेशवे आणि दाभाडे यांच्यातील वितुष्टांचे बीज पेरले गेले.
मुलुखगिरीचे प्रांत प्रत्येक सरदाराला वाटून दिले होते ही व्यवस्था खुद्द छत्रपती शाहू महाराजांनीच केली होती. पेशव्यांना वाटत होते कि ,मी मुख्यप्रधान आहे माझ्याच आज्ञेत सर्वांनी राहावे लागेल. ही पेशव्यांची भूमिका सेनापती दाभाडे, सेनासरखेल आंग्रे ,सेनाधुरंदर रघुजी भोसले ,आणि फत्तेसिंह भोसले यांना मान्य नव्हती. म्हणूनच वारंवार सर्वांचे पेशव्यांबरोबर झगडे होऊ लागले. गुजरात संबंधीचा हा नवा करार दाभाडे यांच्या हक्काला बाधा आणणारा होता. छत्रपतींच्या हुकुमाची अवहेलना करणाराही होता. गुजरात मधील आपल्या प्रांताचे हक्कावरील अतिक्रमण सेनापती दाभाडे यांना कदापिही सहन होणारे नव्हते. यामुळे पेशवे व दाभाडे यांच्यात खुपच वितुष्ट आले.या वितुष्टाला बाजीराव पेशव्यांची सत्तालालसा जबाबदार होती .यातूनच मराठा सरदार व पेशवे यांच्यात वैमनस्य निर्माण झाले.
सेनापती त्रिंबकराव दाभाडे यांना बाजीराव पेशव्यांचे म्हणणे अजिबात मान्य नव्हते. त्यांनी हा सर्व तंटा छत्रपती शाहूमहाराजांच्या कानावर घातला. छ.शाहू महाराजांनी सर्व मामला ऐकून निकाल दिला की, दोघांनीही आपापल्या मुलखावर अंमल करावा. एकमेकांच्या मुलखात अतिक्रमण करून भांडणे करणे इष्ट नाही .ही छत्रपती शाहूंची आज्ञा होताच बाजीराव पेशवे निरुत्तर झाले व आपल्या प्रांतात निघून गेले.
पुढे डबई येथे बाजीराव पेशवे आपला अंमल बसवू लागले. हे वर्तमान कळताच त्रिंबकराव दाभाडे यांच्या तळ पायाची आग मस्तकात गेली .माझ्या भागात आपले घोडे पुढे ढकलण्याचे कारण काय ? छत्रपतींचा आदेश धुडकावून आपण कुरापत का काढता ? दाभाडे अत्यंत चिडले व त्यांनी पेशव्यांना हिसका दाखवायचे ठरवले. खरेतर वयाने व कर्तुत्वाने वडील असणाऱ्या खंडेराव दाभाडे यांच्या काळात बाजीराव पेशवे यांनी कधीही गुजरात प्रांतात लक्ष घातले नव्हते. परंतु सन १७३१ साली बाजीराव पेशवे माळव्यातून आपली फौज घेऊन गुजरातमधील डबोई येथे दाखल झाले. त्रिंबकराव दाभाडे ही डबोई पासून वीस कोसावर आपल्या दोन बंधूंना ठेवून साठ हजार फौजेनिशी गुजरात मधील डबोई येथे दाखल झाले .बाजीराव पेशवे डभोईवर दाखल होण्यापूर्वीच दाभाडेंच्या लोकांनी पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करून , पुष्कळ लोक मारले होते .परंतु बाजीराव पेशव्यांनी या हल्ल्याला न जुमानता डभोईपर्यंत तशीच मजल मारली. त्रिंबकराव दाभाडे यांची काही फौज अगोदरच डबोईस होती .तेथे बाजीरावांनी फंदफितुरी करून सैन्य आपल्याकडे घेतले होते. त्रिंबकराव दाभाडे येऊन पोहोचता न पोहोचतात तोच त्यांच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली की, फौजेत खूप फंदफितुरी झाली आहे. बाजीराव पेशवे यांनी त्रिंबकराव दाभाडे यांच्या सैन्यास आपल्याकडे वळवून घेतले होते. दाभाडे यांच्या सैन्याची पथके पाण्यावर जाण्याच्या निमित्ताने पेशव्यांना जाऊन मिळाली होती. दाभाडे यांचे कारभारी पेशव्यांशी लढाई न करताच तह करावा असा सल्ला देऊ लागले. परंतु शौर्यशाली व बहादुर दाभाडे यांना ही गोष्ट पटणारी नव्हती .त्यांनी सर्वांना सांगितले की, वडील खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर आपली ही पहिलीच लढाई आहे .बाजीराव पेशव्यांनी केलेल्या चढाईला सडेतोड उत्तर हे दिलेच पाहिजे. काय व्हावयाचे ते होवो. जर आपल्यापैकी कोणाला आपल्या जीवाची भीती वाटत असेल तर त्यांनी खुशाल आपल्या माणसात जाऊन राहावे .आमची त्यास काहीच हरकत नाही.
त्रिंबकराव दाभाडे यांचे वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सर्वजण निरुत्तर झाले. लढाईला सुरुवात होण्या अगोदरच दाभाड्यांच्या फौजेतील घोडेस्वार आपल्या घोड्यास पाणी पाजण्याच्या निमित्ताने जे गेले ते परत आलेच नाहीत. सकाळच्याच प्रहरी उभयता फौजेची लढाई सुरू झाली. त्रिंबकराव दाभाडे हत्तीवर स्वार होउन शत्रूचा नायनाट करत होते. त्रिंबकराव दाभाडे यांची वीरश्री पाहून हे कोण शत्रूंच्या नरडीचा घोट घेण्यासाठीच उत्पन्न झाला आहे की काय असा भास या लढाईत सर्वांनाच होऊ लागला .त्रिंबकरावांच्या तलवारीचे पाते पेशव्यांच्या रोखाने फिरत होते. पेशवे स्वार्थी, दगाबाज स्वराज्याची ही पर्वा न करणारे होते. त्रिंबकराव बेफान होऊन लढत होते. त्रिंबकराव यांची समशेर निर्धाराने वेडिपीशी होऊन विजेगत फिरत होती. पेशव्यांचे सैन्य अफाट असूनही त्रिंबकराव दाभाडे यांच्या तलवारी खाली शत्रूची मुंडकी सपासप उडत होती. त्रिंबकराव दाभाडे यांचे ही लोक जखमी होत होते. परंतु शत्रूच्या मानाने फारच थोडे.
हत्यारांचा आवाज व लोकांचा आक्रोश याशिवाय काहीही कानांना ऐकू येत नव्हते, की डोळ्यांना दिसत नव्हते .पेशवे आणि दाभाडे दोघेही भडकलेल्या आगी प्रमाणे कमालीच्या शौर्याने लढत होते. तलवारीचे घाव भयंकरपणे एकमेकावर थडकत होते. त्रिंबकराव दाभाडे यांच्या अंगी बारा हत्तीचे बळ संचारले होते. अटीतटीचा तडाका चालू होता. त्रिंबकराव दाभाडे इरेलाच पेटले होते. जीवाची घाई करून सपासप त्रिंबकराव दाभाडे तलवारीचे घाव घालत होते. त्रिंबकराव चवताळून ,खवळून ,उफाळून धगधगत्या सूर्यासारखे आग ओकत होते. घनघोर युद्ध माजले होते. दाभाड्यांच्या सैन्याला उधाण आले होते. त्रिंबकराव पेशव्यांच्या सैन्याला धूवून काढत होते. चारी दिशा रणगर्जनांनी निनादल्या होत्या. त्रिंबकराव दाभाडे यांच्या पराक्रमाचे तुफान वादळ सुटले होते. ज्यांना ज्यांना त्रिंबक रावांनी गाठले त्यांना जणू मरणानेच गाठले होते. प्रत्येकाच्या छाताडात, कंठात, मस्तकात त्रिंबकराव यांची तलवार घुसत होती. त्रिंबकराव दाभाडे हे डावखुरे होते.त्यामुळे त्यांच्या डाव्या हातातली तलवार एकदा घुसलीकी जीव वसूल करूनच बाहेर पडत होती. बळ पणाला लावून त्रिंबकराव लढत होते.
त्रिंबकराव दाभाडे हे तिरंदाजीच्या युध्दात अगदी निष्णात होते. लोखंडाचे सात सात तवे एका समोर एक ठेवून जर त्यांनी शरसंधान केले तर त्यांचा तीर त्या सातही तव्यास भोक पाडून पार होई !
त्यांच्या या खास विद्येमुळे या लढाईत त्यांनी आपल्या शत्रूचे शेकडो लोक स्वहस्ताने परलोकी पाठवले.
त्रिंबकराव दाभाडे म्हणजे शौर्याचा, धैर्याचा एक पुतळाच होते. त्रिंबकराव दाभाडे यांनी शत्रूच्या माराने हत्ती परत फिरेल म्हणून त्याच्या पायात साखळदंड अडकवून त्याला उभे केले होते. त्रिंबकराव यांच्या अंगात चिलखत व डोळ्यात शिरस्त्राण घालून लढत होते. दोन्ही शत्रू हातघाईवर आले होते. आपले कोण व शत्रुचे कोण हेही एकमेकास मुळीच कळत नव्हते. बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे हे दोघेही छत्रपती शाहू महाराजांचे सरदार असल्यामुळे दोघांच्याही फौजेत एकमेकांचे नातेवाईक खूप होते. त्यात त्र्यंबकराव ढमढेरे हे पेशव्यांच्या बाजुने लढत होते .ते त्रिंबकराव दाभाडे यांना म्हणालेकी आपल्या शिपाईगिरीची शर्थ झाली आता आपण तह करावा हे चांगले.
सेनापती त्रिंबकराव दाभाडे यांनी चोख उत्तर दिले की युद्ध प्रसंगात नातेगोते मुळीच ओळखायचे नसते. स्वराज्याचे सार्वभौम ,स्वातंत्र्य आणि स्वराज्य बळकावणारा शत्रू कोणत्याही धर्माचा असो ,पंथाचा असो की नात्याचा तरी तो शत्रूच .अशा शत्रूशी लाचार स्वार्थासाठी मी नाती - गोती जोडत नसतो. तु आपल्या आईबापास एकुलता एक आहेस माझ्या हाताने तुझा नाश व्हावा हे इष्ट नाही. एवढ्या करिता तू ईकडून निघून जा.
त्रिंबकराव ढमढेरे ही शिपाईगडी होता. त्यांनी ताडकन उत्तर दिले की,या प्रसंगी मी निघून गेल्यास आपल्या व माझ्या वंशास बट्टा लागेल. याकरता तुम्ही मजवर शस्त्र चालवण्यास कमी करू नका .मीही चार हात करतो. यावर त्रिंबकराव दाभाडे म्हणाले ,बाबा तू लेकरू आहेस. तुझवर मी आधी हत्यार करावे हा धर्म नाही. तू आधी हत्यार चालव, नाहीतर ईथून नीघून जा .यावर त्रिंबकराव ढमढेरे यांनी आपला भाला त्रिंबकराव दाभाडे यांच्यावर फेकला. या भाल्याने हत्तीचा माहुत ठार झाला. त्रिंबकराव दाभाडे यांना काहीच झाले नाही. पुढची फळी तेवढी फुटली.नंतर पुढे त्रिंबकराव दाभाडे यांनी तीर सोडला त्या तिराने त्रिंबकराव ढमढेरे यांचा घोडा व ते स्वतः दोघेही कोसळून मृत पडले.
खरेतर पेशव्यानी दाभाड्यांच्या तमाम सैन्याला फितूर केले होते. दाभाडे यांच्या मानाने पेशव्यांचे सैन्य खूप जास्त होते. परंतु दाभाड्यांच्या लढाई पुढे पेशव्यांचे काही चालेना. त्रिंबकराव दाभाडे यांनी एक तीर मारल्या बरोबर पेशव्यांचे सैन्य चे चे करत कोसभर मागे पडले होते .हे सैन्य मागे हटल्याचे पाहून त्रिंबकराव दाभाडे यांना स्वतःचा विजय झाल्यासारखे वाटले. जयघोषाची वाध्दे त्रिंबकराव दाभाडे यांच्या फौजेत वाजू लागली .सर्व सैन्य विजयोत्सवात दंग झाले होते. या वेळेपर्यंत अत्यंत ऊन होऊन ऊकाडा जाणवू लागला होता. त्रिंबकराव दाभाडे यांना वाटले ,आता आपल्याला जय मिळाला आहे तर आपण थोडी विश्रांती घ्यावी .या हेतूने त्रिंबकराव दाभाडे यांनी आपल्या डोक्यावरील पोलादी शिरस्त्राण गरमीमुळे थोडेसे उचलून निवांत बसले. यावेळी त्रिंबकराव दाभाडे यांचे सावत्र मामा भाऊसिंग ठोके यांनी संधी साधून पेशव्यांकडील एका फितूर बारगीरास सांगून त्रिंबकराव दाभाडे यांच्या मस्तकात गोळी झाडली.ती गोळी दाभाड्यांच्या कानशीलातून पार झाली. त्रिंबकराव दाभाडे या गोळीने खाली कोसळले.
दाभाडे खाली कोसळलेले पाहून सगळीकडे हाहाकार उडाला. बाजीरावांना हे वर्तमान कळताच त्यांना अधिकच चेव आला.बाजीराव पेशवे यांनी त्रिंबकराव दाभाडे यांच्या सैन्यावर निकराने हल्ला चढवला.
त्रिंबकराव दाभाडे यांनी अगोदरच आपल्या दोन बंधूंना निरोप पाठवला होता की ,जसे आहात तसे लवकर निघून या घडीचाही अवकाश नको. त्याप्रमाणे दोघेही बंधू मोठ्या लगबगीने त्रिंबकरावांना येऊन मिळणार तेवढ्यात त्रिंबकराव दाभाडे यांचा अंत झाला होता. आपल्या भावाचा अंत झालेला पाहून दोघे बंधू दुःखाने अत्यंत व्याकूळ झाले. मध्यरात्रीचा समय झाला होता. त्रिंबकराव यांचे प्रेत हत्तीवरून खाली उतरून घेतले .भयान काळोखात काय पाहायला मिळाले दोन बंधूंना.या दृष्शाने झुडपे थरारली, अस्मान कडाडले, दोन बंधूंच्या काळजात विज सळसळून गेली. परंतु इलाज नव्हता.त्यांनी मोठ्या दुखाःत आपल्या बंधूंच्या प्रेताला अग्नी दिला.
आपल्या बंधूवर अंत्यसंस्कार करून बाजीराव पेशव्यांचा सूड घेण्यासाठी दाभाडे बंधू पेशव्यांच्या मागावर निघाले. हे दोन बंधू आता आपल्याला सोडणार नाहीत हे बाजीराव पेशव्यांना कळून चुकले. म्हणून पेशवे जीव मुठीत घेऊन पळत सुटले ते थेट साताऱ्यात येऊन दाखल झाले. साताऱ्यात येई पर्यंत बाजीराव पेशवे यांच्या जीवात जीव नव्हता.पेशव्यांना कळून चुकले होते की आपण दाभाड्यांशी युद्ध करून त्रिंबकराव दाभाडे यांना मारून चूक केली आहे. छत्रपती शाहू महाराजांना ही गोष्ट नक्कीच आवडणार नाही. म्हणून बाजीराव पेशवे अत्यंत घाबरले होते. त्यांनी छत्रपती शाहूमहाराजांचे पाय घट्ट धरून ठेवले. ते शाहू महाराजांना म्हणाले "माझ्याकडून आपराध झाला आहे. स्वामीनीच माझे पारिपत्य करावे, अथवा माझा बचाव करावा "
अशा प्रकारे खंडेराव दाबाडे या शूर सेनापती यांचा अंत झाला
सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
आगामी पुस्तकं
उमाबाई साहेब दाभाडे यांचे पुस्तकातून साभार
उमाबाईं साहेब दाभाडे यांचे वंशज श्रीमंत सत्यशिलराजे दाभाडे यांच्या सुचनेनुसार वरील लेखांमधे काही दुरूस्ती केली आहे. त्याची वाचकांनी नोंद घ्यावी
No comments:
Post a Comment