Saurabh Madhuri Harihar Kulkarni
लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील तांदुळजा या गावी जगजीवनराव नाईक बावणे यांची भव्य गढी आहे. साधारण २५० वर्षापूर्वी याचे बांधकाम झाले आहे. तांदुळजा हे गाव आंबेजोगाईपासून २५ कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य प्रवेशद्वार त्याचे बुरूज आपले मन मोहून टाकतात. गढीत आत प्रवेश करतानाच आपल्याला गढीतून सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी केलेली दगडी पाईपलाईनची व्यवस्था पहायला मिळते. आतमध्ये नाईक बावणेंच्या वंशजांची घरे पहायला मिळतात. खूप खोल अशी आडवजा विहीर पहाता येते. साधारण १००-१५० फूट पूर्ण बांधलेला आड आहे तो. बुरूजावरून मारा करता येईल अशाप्रकारे जंग्या केलेल्या आहेत. गढीच्या बाहेर आण्णासाहेब नाईक बावणे यांचा वाडा आहे. आण्णासाहेब हे इ.स. १९४८ च्या मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्या वाड्यात ब्रिटिशकालीन दुर्मिळ दुर्बीण, लहान ब्राँझची तोफ आहे तिचा बार दसराला करण्याची परंपरा आहे. अजून विवध वस्तू पहायला मिळतात. जुनी छायाचित्रे होती त्याचा संग्रह पहायला मिळतो. खूपच चांगली माणुसकी असलेले घराणे आहे.
नाईक बावणे हे क्षत्रिय मराठे कुलापैकी एक महत्त्वाचे कुल आहे. हे घराणे मुळचे उत्तरेचे तेथे मोगलांची चाकरी करत असताना दक्षिणेत येऊन प्रथम मौजे पांगरी परगणे जालना उर्फ जालनापूर येथे येऊन स्थायिक झाले. तेथून साताऱ्यास जाऊन श्री शाहूछत्रपतींचा आश्रय स्विकारला. नंतर छत्रपती शाहूंनी प्रसन्न होऊन आंबेजोगाई परगण्यातील गिरवली व तांदुळजा ही दोन गावे मोकासा म्हणून इनाम दिली. उपलब्ध माहितीप्रमाणे उत्तरेतून दक्षिणेत आल्यानंतर मालोजी व त्यांचा पुत्र जानोजी हे मुळ पुरुष असावे. या घराण्यात जानोजी नाईक बावणेचा नातू व्यंकटराव बावणे हे जसे शूर व तलवारबहाद्दर होते त्याचप्रमाणे ते मोठे सुविद्य पंडित व कवि होते. व्यंकटराव बावणे याने 'प्रद्युम्नोत्तर अथवा आनंदविधान' या नावाचे मराठीत एक चांगले काव्य लिहले आहे. व्यंकटराव बावणे आपले पूर्वज दक्षिणेत इनामाच्या गावी येऊन स्थाईक झाल्यानंतरचा कालवृत्तांत सांगताना म्हणतात की मोगलांची सेवा करताना आमच्या शौर्याची व तलवारबहाद्दरीची कीर्ती श्री शाहूछत्रपती महाराजांच्या कानी गेली व आमच्या वडीलांचे वडील जानोजीराव यांना छत्रपतींनी सन्मानानें व प्रेमाने बोलावून इनाम गांव वगैरे दिली व स्वतः जवळ चाकरीस बोलावून घेतले.
श्लोक-
- श्रीशाहू नृपतीस माहित असे जाणोनि बोलाविले | सन्मानेनि कृपा करोनी बरवी स्वस्थान ग्रामे दिल्हे || जानोजी मम ताततात वसले सांबांब मध्यांतरी |तद्वंशी निज जन्म हऊनि नसे साफल्य केले तरी ||
बावणे हे आडनाव कसे पडले तर ५२ दिवसांत ५२ किल्ले जिंकले म्हणून बावणे झाले. त्याचा श्लोक
बावन किल्ले बावनी दिनी साहेजहान | तब ते नाम प्रसिद्धी मे आयो सिंध सुजाण || निजमूख औरंगजेब साह बोले नायकराव | फेर कृपा करके दिये बक्षिस पांचहि गांव |
ऐतिहासिक मराठे आणि निझामाचा उदगीरचा तह येथेच तांदुळजाला झाला होता. राक्षसभुवन आणि खर्डाची लढाईमध्ये नाईक बावणेंच्या अश्वदलातील सरदार होते. इ.स १७९५ च्या खर्डाच्या लढाईत व्यंकटराव बावणे आणि निझामाचा वजीर मशीर उल्मुल्क यांचा सामना झाला होता.मग तांदुळजा गढीत तह झाला व ८२ लाखाचा मुलूख देण्याचे कबूल करून लढाई थांबली पण त्यांने तह पाळला नाही. ११ मार्च १७९५ ला लढाई झाली आणि निझामाचा पराभव झाला. तहात निझामाने परांडा किल्ला ते दौलताबाद किल्ला तापी नदीपर्यंतचा मुलूख दिला. तहात "मराठी बोलणार्यांचा वाडा" म्हणून "मराठवाडा" असे नाव पडले.
इ.स. १७४९ मध्ये छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर नाईक बावणे अक्कलकोटकर भोसलेंसोबत राहू लागले. फत्तेसिंह भोसलेंच्या टीपूवरील स्वारीत नाईक बावणेंचे अश्वदळ होते.
अजिंठ्यासारखी जगमान्य चित्रकला या मराठवाड्यात जन्माला आली. हा कलेचा वारसा मराठवाड्याच्या मातीने पुढे अनेक शतके जपून ठेवला. निरनिराळ्या मंदीरांची, किल्ल्यांची, शिल्पांची आणि चित्रांची निर्मिती वेळोवेळी येथील कलाकारांने केली. मराठवाड्याचा हा भाग अनेक ऐतिहासिक अवशेषाबाबत समृद्ध आहे. सदरचा चित्रसंग्रह सरदार नाईक बावणे ,तांदुळजा यांच्या खाजगीतला आहे. सुविद्य वंशज श्री. जानोजीराव नाईक-बावणे यांनी हा संपूर्ण संग्रह मराठवाडा विद्यापीठाच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयास सानुग्रह देऊ केला. त्यांच्या या औदार्यपूर्ण देणागीमुळेच हा बहुमोल चित्रसंग्रह डाॕ. सतीश देशमुख यांनी यावर पी.एच.डी. करुन दखनी, मराठा, मुगल, राजपूत इ. शैलींची २९ चित्रे ह्या संग्रहात प्रकाशित केली.
इ. स.१९४८ स्वातंत्र्यसंग्रामात तांदुळजा, सारसा व देवळा या गावच्या लोकांवर रझाकारांनी अत्याचार सुरु केला. तेव्हा तांदुळजाच्या सरदार नाईक बावणे यांच्या गढीतून लोकांनी रझाकारांशी अनेक वेळा मुकाबला दिला. याच लोकांनी, बन्सीलाल मारवाडी व त्याच्या मुलाचा खून करुन त्यांच्या घरातील सोने नाणे घेऊन जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना मांजरा नदीत तांदुळजा, नायगांव, सारसा व देवळा या गावकऱ्यांनी अतिशय योजनापुर्वक मांजरा नदीतच जलसमाधी दिली.
Team- पुढची मोहिम
No comments:
Post a Comment