विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 24 April 2021

स्वराज्याच्या घोडदळाचे दुसरे सरनोबत नेताजी पालकर भाग १

 स्वराज्याच्या घोडदळाचे दुसरे सरनोबत नेताजी पालकर 

माणकोजी दहातोंडे सरनोबत वाढत्या वयामुळे खुप थकले होते. त्यांना आता लढाया झेपत नव्हत्या. त्यामुळे मार्च १६५९ मध्ये महाराजांनी त्यांना प्र्मुख सल्लागार व युद्धशात्र तज्ञ म्हणुन नियुक्त केले. त्यानंतर रिकाम्या असलेल्या सरनोबत पदी कोणाची नियुक्ती करावी? यावर राजे विचार करु लागले. जुन १६५९ रोजी एके दिवशी दरबारात नेताजींना बोलवण्यात आले. राजे नेताजींना म्हणतात, “सुभेदार नेताजी..! आजपासुन तुम्ही श्रींच्या राज्याचे सरनोबत आहात.” आणि स्वराज्याच्या घोडदळाचे दुसरे सरनोबत नेताजी झाले.

 


         नेताजी पालकर. पुण्यातील करडे परगण्याचे पिढीजात देशमुख. त्यांची जन्मतारीख उपलब्ध नाही. त्यामुळे अंदाजे इ.स. १६१५-२० मध्ये त्यांचा जन्म झाला असावा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य आरंभले तेव्हा त्यांच्या या कार्याला भारावुन नेताजींनी स्वराज्याची चाकरी पत्कारली. आरंभिच्या ब-याच लढायांमध्ये भाग घेवुन मोठा पराक्रमही केला. पुरंदर किल्ला स्वराज्यात दाखल झाला तेव्हा पुरंदरचा हवलदार म्हणुन राजांनी नेताजींची नियुक्ती केली. आपल्या निष्ठेच्या आणि पराक्रमाच्या जोरावर घोडदळाचे सरनोबत पद त्यांना मिळाले.

        नेताजी तसे शिवरायांचे नातलगच होते. शिवरायांच्या पत्नी पुतळाबाई राणीसरकार या ‘पालकर’ घराण्यातल्या होत्या. शिवराय नेताजींना काका म्हणत. नेताजी अतिशय शुर, पराक्रमी व बेडर होते. त्यांना युद्धशात्राचे व गनिमी काव्याचे उत्तम ज्ञान होते. नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या रणसंग्रामा वेळी नेताजींची नेमणुक वाई परीसरात केली होती. राजांची त्यांना आज्ञा होती कि, “ खान पडल्यावर त्याच्या मुख्य छावणीवर हल्ला करुन, त्याचा वाईचा तळ लुटायचा.” यावेळी वाईच्या तळावर अफजलपुत्र फाजलची नेमणुक केली होती. ठरल्या प्रमाणे नेताजी ससैन्य आपअपल्या जागी दबा धरुन बसले होते. पण खान पडल्याची खबर नेताजींना उशीरा मिळाली. तेवढ्या अवधित फाजल पळुन गेला. उशिरा का होईना मराठ्यांनी वाईवर जबरदस्त हल्ला चढवला. भरपुर लुट मिळाली. पण फाजल पळुन गेल्यामुळे राजांना नेताजींचा थोडा राग आला.

          दि.११ नोव्हेंबर १६५९ महाराज, नेताजी, दारोजी हे तीन वाटांनी आदिलशाहीत घुसले. आदिलशाही मुलखात मराठ्यांची दहशत निर्माण झाली होती. नेताजी लक्ष्मेश्वर पर्यंत जावुन तेथील प्रचंड लुटीसह कोल्हापुरकडे निघाले. त्यांनी आदिलशाही मुलुख अक्षरश: नागडा करुन टाकला होता. इकडे कोल्हापुरात मराठ्यांनी पन्हाळ्याला वेढा दिला होता. पन्हाळा…! आदिलशाहाचा  ‘शहानबीदुर्ग’ मराठ्यांची ‘दख्खन दौलत’ दि.२८ नोव्हेंबर १६५९ मध्यरात्रीची वेळ होती. राजे पन्हाळ्याच्या पायथ्याशी होते. इतक्यात मशालीच्या उजेडात नेताजी आनंदाची खबर घेवुन आले. “राज.. ! मोहीम फत्ते झाली. पन्हाळ्यावर भगवा फडकला….”


          अफझलखानाचा वध, आदिलशाही मुलखात लुट. यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रुस्तम- ए- जमान आणि फाजलखान या दोन सरदारांना दहा हजार फौज, हत्ती, उंट देवुन कोल्हापुरावर पाठवले. हेरांनी लगेच हि खबर महाराजांना दिली. विजापुरी फौज मिरजेजवळ आली नि कोल्हापुरकडे दौडत निघाली. कोल्हापुर नजीक येताच त्यांना समोर दिसले खुद्द शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर सोबत पाच हजार मराठ्यांची फौज. यांना पाहुनच विजापुरी फौज थरथरायला लागली. तरी हल्ला करण्याचे हुकुम झाले. मराठेही ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करीत शत्रुवर तुटुन पडले.

          विजापुरी फौजेची चारही बाजुने कोंडी झाली. फाजल मराठ्यांना आवरायला पहात होता. पण आता त्याच्याच नाकी नऊ आले. अन्‍ त्याची गाठ नेताजीरावांबरोबर पडली. त्याला वाईचा तळ आठवला. ‘तिथुन आपण कसे बसे बचावलो, आता नेताजीशी गाठ पडली तर मौत’ असा विचार तो करु लागला आणि पुढे पडणारी त्याची पाऊले हळुहळु मागे वळाली. आणि फाजलखान पळाला.. ! धुमठोकुन पळाला…! तो पळतो तोच रुस्तमहि पळाला. विजापुरी फौजेत एकच पळापळ सुरु झाली.

          विजापुरी फौजेला पळता भुई थोडी झाली. त्यातच वाईच्या जवळचे चंदनगड आणि वंदनगड स्वराज्यात दाखल झाले. नेताजींच्या पराक्रमामुळे त्यांना सर्वजन प्रति शिवाजी म्हणू लागले. विजापुरी मुलखात त्यांची दहशद निर्माण झाली. त्यानंतर शिवरायांनी त्यांना विजापुरी मुलखात पाठवले. आदिलशाही ठाण्यावरुन पाहरेक-यांना नेताजी ससैन्य येत असल्याचे दिसले. पहारेकरी ठाणेदाराकडे गेला. ठाणेदार म्हणतो, “क्या हुआ ?”

          घाबरलेला शिपाई म्हणतो, “ हुजुर ! नेताजी आला. भागो नेताजी आला.”

          “कंबख्त होश मेतो हो ये क्या बोल रहे हो ?”

          “अल्ला कसम हुजुर. नेsssताsssजी  ओ देखो.”

          ठाणेदार पाहतो नेताजी येत आहे. तो स्व:ताशीच म्हटल्यासारखा म्हणतो, “ये अल्ला… ये शैतान कहासे आया ? अब क्या होंगा ?.....भागो…!”

          बोरगाव, मालगाव, कुंडल, सतीकीर, आड, सांगली, मायील, पारगाव यांसारखी आदिलशाही ठाणी नेताजींनी पहिल्या धडकेत जिंकली. त्यानंतर मिरजेच्या भुईकोटास वेढा दिला. पण खुप लढवला तरी तो दाद देत नव्हता. तेव्हा स्व:ता शिवराय वेढ्यात सहभागी झाले आणि नेताजींना विजापुरी मुलखावर चालुन जाण्याची आज्ञा केली. इकडे आदिलशहाने सिद्दी जौहरला स्वराज्यावर पाठवले. सिद्दी येत आहे अस कळताच राजांनी वेढ्यातुन माघार घेवुन पन्हाळा गाठला.

          नेताजींनी विजापुरी मुलखात धुमाकुळ घातला. जिकडे तिकडे “शैतान आया भागो..!” “प्रति शिवाजी आया भागो…!” अशा आरोळ्या एकु येवु लागल्या. प्रत्यक्ष आदिलशाहाला धडकी भरली. त्याला वाटले, “ नेताजी विजापुरी मुलखात असेच तुफान उठवत राहिला तर आदिलशाही एखाद्या महिन्यातच नामशेष होवुन जाईल.” आदिलशाही मुलखात हेरांनी खबर आणली, “सरनोबत..! घात झाला. हबशी जव्हरच्या वेढ्यात राज पन्हाळगडावर फसल..! गनिमान गडाला लई घट्ट घेर टाकलाय..!” नेताजींना खबर समजली. त्यांनी विचार करुन योजना आखली आणि सरळ विजापुरच्या दिशेने कुच केले. तेव्हा विजापुरला सैन्य कमी होते. (अंदाजे ४-५ हजार) अशा वेळी विजापुरवर हल्ला केल्यास सिद्दी जौहरला विजापुरच्या संरक्षणाकरीता जावे लागेल आणि राजेही वेढ्यातुन मुक्त होतील. हा त्यांचा डाव. किती मोठी दुरदृष्टी हि..!

          नेताजींनी विजापुर नजीकच्या शहापुरवर रात्रीच्या वेळी हल्ला केला. शहापुर जाळुन लुटले. आता त्यांनी आपला घोडा थेट विजापुरकडे वळवला. विजापुरची नि बादशहाची घाबरगुंडी उडाली. बादशहाने जौहरला बोलवण्याची सिद्धता हि केली. पण हेरांनी खबर आणली की, ‘नेताजीकडे फक्त दोन हजारांची फौज आहे.’ बादशहाने लगेच खवासखानास पाच हजार फौज देवुन नेताजींवर पाठवले.©RohitSarodeमोठे युद्ध झाले. सततच्या प्रवासाने आणि लढायाने मराठी फौजही खुप दमली होती. त्यामुळे मराठी फौजेचा निभाव लागला नाही. एक हजार मराठे कामी आले. नेताजींनी माघार घेतली.

          विजापुरहुन नेताजी थेट राजगडावर आले. त्यांच्या सोबत सिद्धी हिलालहि होता. राजगडावर काहीतरी विचित्र घडल्यासारख  त्यांना जानवल. ते आऊसाहेबांकडे जात असता, वाटेतच त्यांना आऊसाहेबांच दर्शन झाल.  त्यांची मुद्रा क्रोधमय होती. युद्धवेश धारण करुन त्या आल्या होत्या. त्यांची नजर नेताजींवर पडली. तशी नेताजींनी आपली नजर खाली केली. आऊसाहेब म्हणतात,

          “सरनोबत..! तुमच्या कमरेची समशेर द्या आम्हाला.”

          नेताजी म्हणतात, “काय झाल आऊसाहेब ?”

          “काय झाल म्हणुन काय विचारता? कुठे होतात?”

          “महाराजांच्या हुकुमाने विजापुर मारायला गेलो होतो. आणि….”

          “खामोश…! तीन महिने झाले आपला राजा वेढ्यात अडकुन आणि तुम्ही या राज्याचे सरनोबत विजापुरात गनिमाला भिऊन पळुन आलात. थोर पराक्रम केला. शाबास…! थकला असाल ना ? आता थोडी विश्रांती घ्या. आम्ही जातीने शिवबाला सोडवायला जात आहोत, तुम्ही फक्त तुमची समशेर द्या आम्हांला.”

          “आऊसाहेब पाया पडतो तुमच्या पण अस टाकुन बोलु नका. आम्ही जिवंत असतांना तुम्ही मोहीमेवर जाण बर दिसत नाही. आऊसाहेब..! आई भवानी पाठीशी आहे. मी स्व:ता जातो पन्हाळ्यावर. जौहरच्या वेढा फोडुन राजांना त्यातुन बाहेर काढतो.”


           नेताजी आणि सिद्दी हिलाल दौडत निघाले. इकडे जौहरच्या छावणीत पळापळ सुरु झाली. त्याला नेताजीची खबर लागताच त्याने आपली शिलकी फौज त्यांच्यावर पाठवली. पन्हाळ्यापासुन   ब-याच अंतरावर या दोन फौजेत लढाई झाली. मराठ्यानी मोठी शिकस्त केली. पण हिलालचा मुलगा सिद्दी वाहवाह पडला आणि हे पाहताच हिलाल पळत सुटला. त्याच्या बरोबर मराठी फौजही पळत सुटली. इथेही नेताजींचा पराभव झाला.

          यानंतर नेताजींचा उल्लेख उंबर खिंडीत कारतलबखानाबरोबर झालेल्या युद्धात येतो. या युद्धात खानाच्या फौजेची खुप मोठी कोंडी केली. खुप पराभव सहन केलेल्या नेताजींनी या युद्धात खुप मोठा पराक्रम करुन विजय आपल्या पदरात पाडला. यानंतर नेताजींवर ‘तुंगारणा’ या भागाची जबाबदारी आली. या भागात तुंग, तिकोना, विसापुर, लोहगड हे किल्ले आहे. यांच किल्ल्यावर शाहिस्तखान लक्ष ठेवुन होता. त्याच्या मार्गात नेताजी हिमालयासारखे ऊभे होते. खान त्यांना एवढा वैतागला होता कि, त्याने त्यांच्या मागावर ‘तब्बल अठरा मोगल सरदारांना पाठवले.’ पण ‘ते अठराच्या अठरा सरदार सुद्दा नेताजींच काहीच वाकड करु शकले नाही.’

          शाहिस्तखानाने स्वराजाचे खुप नुकसान केले होते. ते भरुन काढण्यासाठी राजांनी सुरतेची मोहीम काढली. स्वराजाचे सरनोबत या नात्याने नेताजीही या मोहीमेत सहभागी होते. मंगळवार दि. जानेवारी १६६४ रोजी औरंगजेबाच्या ‘दार-उल-हजवर’ ची म्हणजेच सुरतेची मराठ्यांनी बेसुरत केली. त्यानंतर मुधोळच्या स्वारीत त्यांनी मोठा पराक्रम केला. तसेच कुडाळ येथे खवासखानाच्या पारिपत्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.खवासखान नेताजींना एवढा घाबरला होता कि तो थेट चंद्रगडावर पळुन गेला.

          शिवरायांनी शाहिस्तखानाची केलेली फजीती, मोगली ठाण्यांवर केलेली लुट,  कारतलबखान, नामदारखान, इनायातखान, जसवंतसिंह राठोड यांसारख्या पराक्रमी सरदारांना सुद्धा मराठ्यांनी पळता भुई थोडी केली आणि यावर कळस म्हणजे औरंगजेबाच्या लाडक्या सुरतेची केलेली बेसुरत. ‘दिल्लीच्या अफाट फौजेपुढे, प्रचंड तोफखान्यापुढे आणि अगनित पैशांपुढे मराठे हार मानत नाही. दरबारातील कोणत्या सरदाराला पाठवावे ? सगळेच मराठ्यांना घाबरतात.’ त्यामुळे स्वःता औरंगजेब दख्खनमध्ये उतरण्यास सज्ज झाला. प्रचंड फौजेनिशी तो मथुरेत आला. तिथल्या मुक्कामात मिर्झाराजे जयसिंग त्याच्या पुढे हजर झाले. यापुढील उत्तरार्धात….

-रोहित सरोदे  

            ◆संदर्भ सुची :-

राजाशिवछत्रपती

श्रिमान योगी

गरुड झेप

छावा

शिवछत्रपतींचे शिलेदार     

सभासदाची बखर

शिवकालीन पत्र

‘पावनखिंडीचा ईतिहास’

शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा

 

 

 

           ◆आपल्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा

rohisthoughts@gmail.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...