स्वराज्याच्या घोडदळाचे दुसरे सरनोबत नेताजी पालकर भाग २
मिर्झाराजे जयसिंग सुर्यवंशी राजपुत. कच्छवाह कुळाचे भूषन. मोठे पराक्रमी, खुप ज्ञानी, प्रचंड अनुभवी, मुत्सद्दी, अभ्यासु. त्यांचे घराणेही खुप पराक्रमी. स्वतः अकबराने त्यांच्या पुर्वजांना ‘मिर्झा’ हा किताब दिलेला. हे राजपुत कोण? तर हे ‘प्रभु रामचंद्रांचे वंशज’. एका महान पुरुषाचे वंशज आता काय करत होते? एका धर्मवेड्या, पापी, बेरेहम बादशहाची सेवा. मुघली सेनेचे सेनापती मिर्झाराजे जयसिंग.
औरंगजेबाने त्यांना दख्खनची मोहीम दिली. सोबत दिलेरखान हा पठाण दिला. ऑक्टोबर १६६४ रोजी औरंगजेबाचा ४७ वा वाढदिवस साजरा करुन त्याला अखेरचा कुर्निसात करुन दिल्लीचे हे दोन राहु-केतु सह्याद्रिच्या सुर्यास ग्रहन लावण्यास निघाले.
ब-हाणपुर, औरंगाबाद मार्गे ते मार्च १६६५ मध्ये पुण्यात दाखल झाले. एके दिवशी पुण्यातील त्यांच्या छावणीत एकदम गडबड उडाली. सगळी कडे एकच आरडाओरड “मराठे आले...! मराठे आले...! प्रति शिवाजी आला...!” नेताजीरावांनी हा हल्ला चढवला होता. असेच सतत हल्ले चढवुन मिर्झाच्या सैन्यास त्यांनी वैतागुन सोडले होते. त्यानंतर दिलेरचे लक्ष पुरंदराकडे गेले. मोगली फौज पुरंदराकडे वळाली. यावेळी नेताजी परिंड्याच्या मोगली अमलात घुसले. परिंड्याचा मुलुख मराठ्यांनी मारुन काढला. तिथल्या सैन्याला काय नेताजींना रोखता येत नव्हते. तेव्हा स्वारांनी मिर्झाकडे बातमी आणली, “वो शैतान नेताजी यहा पें हंगामा कर रहा है। उसको रोखना हमारे बस मे नही। उसको रोखने के लिये कुमक भेजीए।“ त्याप्रमाणे मिर्झाने सय्यिद मुनव्वरखान या सरदाराला नेताजींवर पाठवले. त्याच्या सोबत इतर चार सरदार हि पाठवले.
इकडे पुरंदरवर मोगलांचा हल्ला सुरुच होता. कितीहि हल्ला केला तरी पुरंदर दादा देत नव्हता. त्यामुळे मिर्झाच्या सांगण्यावरुन दिलेरने वज्रगडावर तोफा डागल्या. दहा दिवसांच्या झगड्यानंतर अखेर वज्रगड पडला. तेथुन दिलेरने पुरंदरावर तोफा डागल्या. हळुहळु पुरंदरही कोसळु लागला. मोगल नुसते स्वराज्यातील किल्ल्यांवरच नाही तर गरीब रयतेवरही हल्ला करीत होते. रयतेचे हे हाल राजांना पाहवले जात नव्हते. स्वराज्याला ग्रहन लागले. आता ‘शक्ती पेक्षा युक्ती क्षेष्ठ’ त्यामुळे राजांनी शरणागती पत्कारली. निशत्र मिर्झाच्या भेटीला गेले आणि तेथेच जुन १६६५ रोजी इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला.
पुरंदरच्या तहानुसार राजांनी तेवीस किल्ले आणि चार लाख होनांचा मुलुख बादशास द्यावा. किल्ले आणि मुलुख मिळेपर्यंत शंभुराजे मिर्झाकडे ओलीस ठेवावे. तसेच दरबाराची चाकरी पत्करावी. त्याप्रमाणे राजांनी तेवीस किल्ले आणि चार लाख होनांचा मुलुख दिला. पण दरबाराची चाकरी स्वतः न पत्करता ती ८ वर्ष उमर असलेल्या शंभुराजांना दिली. शंभुराजांना दरबाराने पंच हजारी मनसबदार बनवले. त्यांच्या वतीने राजे मोगलांच्या मोहीमेत सहभागी होनार होते. मिर्झाकडे शंभुराजे ओलीस गेले, तेव्हा त्यांच्या सोबत नेताजींना पाठवण्यात आले. तेथे नेताजी सावली सारखे त्यांच्या बरोबर असे.
तहाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या. आता मुघलांनी आपला मोर्चा विजापुरकडे वळवला. तहानुसार शंभुराजांच्या वतीने राजांनाही ह्या मोहीमेत सहभागी रहावे लागणार होते. डिसेंबर १६६५ मोगली आणि विजापुरी फौजेची गाठ पडली. मोगलांच्या वतीने आघाडीवर होते शिवाजी महाराज. त्यांच्या बरोबर नेताजी पालकर. विजापुरचा सेनापती सर्झाखान याने त्यांच्यावर प्रचंड मोठा हल्ला केला. थोड्याच वेळात मोगलांची फळी फुटली. त्यांना वेळीच दिलेरखानाने मदत करायला हवी होती. पण ती त्याने केली नाही. मोगलांचा या ठिकाणी पराभव झाला. राजांना आणि नेताजींना पळावे लागले. या उलट ‘हा पराभव शिवाजीने जाणुन बुजून केला, या फितुरी बद्दल त्याला ठार मारा.’ असा आरोप दिलेरने केला. यावर राजांनी मिर्झाकडे एक अर्ज केला,
“आपण मला पन्हाळगड घेण्याची आज्ञा द्यावी. गडाची मला अंतर्बाह्य माहीती आहे. शिवाय गडावरील शिबंदीहि बेसावध असेल.”
राजांच्या जिवाला छावणीत दिलेरकडुन धोका आहे. हे लक्षात येताच त्यांच्या अर्जास मिर्झाने मान्यता दिली. मिर्झाचा निरोप घेऊन नेताजींसह राजे पन्हाळ्याकडे निघाले.
पौष वद्य षष्ठी म्हणजेच जानेवारी १६६६ च्या रात्री राजे ससैन्य पन्हाळ्याच्या पायथी पोहचले. दुस-या बाजुने नेताजी येण्याची वाटपाहत होते. पहाटेची वेळ झाली. खुप वेळ वाट पाहुनही नेताजी काय आले नाही. शेवटी राजांनी हल्ला करण्याचा निर्धार केला. राजांना वाटले गडावरचे चौकी पहारे बेसावध असतील. सुमारे दोन ते अडीच हजार मावळे गड चढत होते. एवढ्यात घात झाला. राजांचा अंदाज चुकला. गडावरच्या अत्यंत सावध पहा-यांनी जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांना प्रतीकार करणे खुप अवघड झाले. मराठ्यांनी माघार घेतली. राजांसह मावळे विशाळगडाकडे गेले. या हल्ल्यात सुमारे १ हजार मावळे कामी आले.
राजे विशाळगडी असता नेताजी तेथे आले. १ हजार लोक गमवल्यामुळे राजे खुप संतप्त होते. त्यात सरनोबत वेळीच न आल्यामुळे त्या संतापात अजुन भर पडली. नेताजी सदरेवर आले. मुज-यास वाकले असता राजांची संतप्त नजर त्यांच्यावर पडली. संतप्त स्वरात राजे म्हणाले,
“सरनोबत...! समयास कैसे पावला नाही?”
यावर नेताजी म्हणाले, “कोण सरनोबत ? आपण कसले राजे आणि आम्ही कसले सरनोबत ? स्वतंत्र होतो तोपर्यंत आम्ही सरनोबत. आता आपन मोगलांचे मनसबदार...”
नेताजींच्या या बोलामुळे राजांचा संताप अजुनच वाढला. राजे म्हणतात, “खामोश....! आपणा मुळे आम्हास पळावे लागले. आपले १ हजार लोक कामी आले आणि आपले हे वागणे... आपणास आम्ही सरनोबत पदावरुन बडतर्फ करीत आहोत.”
नेताजी राजांवर रागावुन घोड्यावर मांड टाकुन निघुन गेले. त्यांनी घोड्याचे कायदे आवळले ते थेट विजापुरच्या बादशहा समोर. एकेकाळी ज्याला ‘प्रति शिवाजी’ असे म्हटले जायचे तो नेताजी आज आपल्याकडे नोकरीसाठी आला आहे. हे पाहुन बादशहा खुप खुश झाला. त्याने त्यांना ४लाख होन बक्षीस देऊन आपल्या सरदारांत सामील केले. नेताजींनीही विजापुरच्या वतीने मिर्झा व दिलेरवर तुफानी हल्ले केले. या हल्ल्यामुळे मिर्झा खुप वैतागला होता. त्याने नेताजीस गुप्त फर्मान पाठवले,
“तुला काय हवी ती जहागीर देतो. पण आमच्या पदरी नोकरीस ये.”
त्याप्रमाणे मिर्झाने नेताजींना ५ हजार स्वारांची मनसब, जहागीर व ५० हजार रुपये रोख बक्षीस दिले. मार्च १६६६ मध्ये नेताजी मोगलांना सामील झाले.
नेताजींचे असे वागणे कदाचीत शिवरायांची एक युक्ती असावी. कारण या आधीही नेताजींकडुन खुप चुका झालेल्या होत्या. अफजल प्रकरणात फाजलखान पळुन गेला, राजे सिद्दीच्या वेढ्यात असता विजापुरी मुलखात १ हजार मावळे कामी आले, राजांना वेढ्यातुन सोडावण्यास नेताजी आले असता तिथे त्यांचा पराभव झाला आणि आता पन्हाळ्यावर नेताजींना येण्यास उशीर. एवढ्या चुका होवुनही राजांनी नेताजीस शिक्षा केली नाही किंवा सरनोबत पदावरुन काढले नाही. नेताजीही विजापुरी छावनीत न राहता मोगलांना मिळाले. जरी मोगलांनी जहांगीर वैगरे दिली असेल पण यावेळी राजेही मोगलांकडुन लढत होते ना...! याबद्दल सबळ पुरावा नसल्याने येथे फक्त अंदाजच लावावा लागतो.
शुक्रवार दि. १७ ऑगस्ट १६६६ रोजी राजे औरंगजेबाच्या कैदेतुन निसटले. औरंगजेबाला हे कळताच तो खुप संतापला. त्याने मिर्झाला फर्मान पाठवले.
“सिवा येथुन पळाला आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या पदरी
असलेला त्याचा सरनोबत नेताजी पालकर यास तुरंत गिरफ्तार
करुन दिलेरच्या हवाली करुन दिल्लीस पाठवावे.”
नेताजी त्यांचा पुत्र नरसोजी यांस मोगलांनी कैद करुन दिल्लीस रवाना केले. दिल्लीला त्यांचे अतोनात हाल केले. शिवरायांच्या पळण्याचा सारा राग बादशहा त्यांच्यावर काढत होता. असुडाचे फटके दिले, उघड्या अंगावर कोरडे ओढले, नाकात नमक कोंबले, सर्वांगास चटके दिले. शेवटी हा जाच असह्य झाल्यामुळे त्यांनी मुसलमान धर्माचा स्विकार केला. एके काळचा ‘प्रति शिवाजी’ आता ‘मुहम्मद कुलीखान’ बनला. बादशहा तर यावर खुप खुश झाला. त्याने त्यांना मनसबदारी, सरदारकी बहाल केली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही बायकांचा मुसलमान धर्मानुसार त्यांच्याशी ‘निकाह’ लावुन दिला. या प्रसंगी स्वतः बादशहा तेथे जातीने हजर होता.
कुलीखानला ऑक्टोंबर १६६७ साली काबुल-कंदहारच्या मोहीमेवर रवाना केले. त्याठिकाणी त्याचे काय मन रमेना. सह्याद्रिच्या उंच पर्वतांची त्याला याद येवु लागली. शेवटी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. एकदा नव्हे दोनदा आणि दोनही वेळेस तो फसला. त्यामुळे छावनीचा मुख्य सरदार महबतखान याच्याकडुन त्याला अमानवी मारहाण झाली. त्यानंतर पळुन जाण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनाला शिवला नाही. काबुल-कंदहारमध्ये सर्व काही सहन करुन तब्बल ९ वर्षांनी कुलीखानचे आगमण दिल्लीला झाले. आता तर कुलीखानने दख्खन मध्ये परतण्याचा विचार सुद्धा सोडला होता. पण एक संधीच त्याला चालून आली. बादशहाने त्याची रवानगी दिलेरखानसोबत गोवळकोंड्याच्या मोहिमेवर केली. जुन १६७६ मोगली सैन्याची छावणी रायगड नजीक पडली होती. एक चांगली संधी पाहुन कुलीखान छावनीतुन पळाला. तेथुन थेट रायगड गाठला.
रायगडावर कोणी त्याला ओळखले नाही. त्याला राजांपुढे हजर करण्यात आले. राजांपुढे त्याने आपली सगळी कथा सांगितली तेव्हा राजांनी ठरवले ‘जे झाले ते झाले, मुहमंद कुलीखानला पुन्हा नेताजी पालकर बनवायचा..!’
मुहुर्त ठरला शके १५९५ आषाढ वद्य चतुर्थी दि. १९ जुन १६७६ रोजी विधिपुर्वक नेताजीराव पुन्हा हिंदु झाले. त्याच्यांवरचा कलंक मिटावा म्हणुन शिवरायांनी आपली कन्या कमलाबाई हिचा विवाह जानोजी पालकर याच्या सोबत लावुन दिला. हा जानोजी कोण? हे इतिहासाला माहित नाही. त्याच बरोबर नेताजींस वाई परगण्यातील मौजे पसर्णीची मोकासदारी बहाल केली.
शिवकाळाप्रमाणेच शंभुकाळातही नेताजींच्या स्वराज्य सेवेचा उल्लेख मिळतो. जुलै १६८१ मध्ये बागलाणात मुघलांवर जोरदार हल्ला केला. पुन्हा एकदा मोगलांना पळता भुई थोडी झाली. त्यानंतर औरंगपुत्र अकबर बापाविरुद्ध बंड करुन दख्खनमध्ये आला तेव्हा त्याला शंभुराजानीं आपल्या आश्रयास ठेवले. त्याच्या धर्माचा रिवाज नेताजींना माहीत असल्यामुळे त्याचीं नेमणुक शंभुराजानीं तेथे केली होती.
जानेवारी १६९० नंतर नेताजींच्या संदर्भात कोणत्याच नोंदी अढळत नाही. त्यामुळे त्यानंतरच त्यांचा मृत्यु झाला असावा.
-रोहित सरोदे
◆संदर्भ सुची :-
◆राजाशिवछत्रपती
◆श्रिमान योगी
◆गरुड झेप
◆छावा
◆शिवछत्रपतींचे शिलेदार
◆सभासदाची बखर
◆शिवकालीन पत्र
◆‘सरसेनापती नेताजी पालकर’
शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा
◆आपल्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा
No comments:
Post a Comment