विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 6 April 2021

प्राचीन भारतातील महाजनपदे (Mahajanapadas in ancient India)

 




प्राचीन
भारतातील महाजनपदे (Mahajanapadas in ancient India)
लेखक :संदीप परांजपे
भारतीय उपखंडाच्या प्राचीन इतिहासातील राज्ये. यांमध्ये सोळा महाजनपदांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक संहितात जनपद हा शब्द सापडत नाही. काही इतिहासकारांनी अनेक गावांच्या समूहाला जनपद ही संज्ञा वापरली आहे. इतिहासकारांनी या जनपदांची तुलना ग्रीस व रोममधील नगर राज्यांशी केली आहे. ज्या प्रकारे मॅसिडोनियाने ग्रीस व रोम जिंकून आपले विशाल राज्य स्थापले, तसेच भारतात मगधच्या राजांनी इतर महाजनपदे जिंकून आपल्या विशाल साम्राज्याचा विस्तार केल्याचे म्हटले आहे.
सोळा महाजनपदे, भारत (इ. स. पू. ६००)
इ. स. पू. सहाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात अनेक छोटी-मोठी राज्ये अस्तित्वात होती. ‘महाʼ म्हणजे मोठे आणि ‘जनपदʼ म्हणजे जास्त लोकसंख्या असणारे क्षेत्र अशी ‘महाजनपद’ या शब्दाची व्याख्या करण्यात येते. याचा अर्थ जास्त लोकसंख्या असणारा प्रदेश असा होतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात एका ग्रामात (गावात) १०० ते ५०० घरे असल्याचे म्हटले आहे. तर एका जनपदात ८०० गावे असल्याचे म्हटले आहे. या ग्रामाचे क्षेत्रफळ एक ते दोन कोस (एक कोस म्हणजे सु. तीन किमी.) असे. प्रत्येक जनपदात केंद्रीय स्थानी एक दुर्ग असे, त्यालाच राजधानी म्हणून संबोधत असत. सुरुवातीला जी छोटी राज्ये अस्तित्वात होती, त्यांत संघर्ष होत असे. अशा अनेक छोट्या राज्यांची यादी सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथांत मिळते. त्यातील निर्बल राज्ये नष्ट होत शक्तिशाली राज्यात विलीन होत गेली. शेवटी अधिक शक्तिशाली आणि विस्ताराने मोठ्या अशा राज्यांना ‘महाजनपद’ असे संबोधले जाऊ लागले. महाभारतात गांधार, मगध, पांचल, कुरू, अंग, चेदी वगैरे तत्कालीन अनेक छोट्या मोठ्या राज्यकर्त्यांनी युद्धात भाग घेतल्याचे दिसून येते.
पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये संघ आणि जनपद यांचा उल्लेख आहे. या ग्रंथातून आपल्याला शुद्रक, मालव, अंबष्ठ, हस्तिनायन, मद्र, शिबी, आश्वायन व आश्वकायन ही गणराज्ये प्रबळ असल्याचे समजते. मार्कंडेय पुराणात मध्य प्रदेशात मत्स्य, कुशूल, कुल्य, कुंतल, काशी, कोसल, अर्वूद, पुलींद, समक, वृक आणि गोवर्धनपूर यांचे उल्लेख सापडतात. या ग्रंथानुसार अवंती हे जनपद अपरांतात होते. बौद्ध वाङ्मयात गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वी अशी सोळा स्वतंत्र राज्ये अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळतात. अंगुत्तरनिकाय या बौद्ध ग्रंथात अंग, मगध, काशी, कोसल, मल्ल, वृज्जी, चेदि, वत्स, कुरू, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज या स्वतंत्र राज्यांचा उल्लेख सापडतो. तर पाणिनीच्या ग्रंथात कंबोज, गांधार, ब्रह्मणक, कछ, मद्र, त्रिगर्त, कुरू, कोसल, काशी, मगध, श्रावस्ती, कालिंग आणि अश्मक या जनपदांचा उल्लेख मिळतो. भगवती सूत्र या जैन ग्रंथात अंग, वंग, मगध, मलय, मालव, अछ्, वच्छ्, कच्छ्, पांड्य, लाढ, वज्जि, मोलि, काशी, कोसल, अवाह, समुत्तर ही नावे येतात. या राज्यांची नावांची व्युत्पत्ती जरी समजत नसली तरी ही नावे तेथील लोकांवरून पडली असावीत. या ग्रंथात सोळा राज्यांचे उल्लेख सापडतात; परंतु बौद्ध ग्रंथातील आणि या ग्रंथातील काही राज्यांची नावे भिन्न आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या ग्रंथांच्या रचनेचा काळ वेगवेगळा आहे. उदा., वृज्जी आणि मल्ल या राज्यांचा उल्लेख बौद्ध व जैन ग्रंथात येतो; परंतु तो पौराणिक ग्रंथात येत नाही.
या सोळा महाजनपदांमधे काही जनपदात राजतंत्र होते, तर काहींमध्ये गणतंत्र राज्यप्रणाली होती. राजतंत्र प्रकारात राजाच्या हाती सत्ता असे. अंग, काशी, चेदी येथे राजतंत्र होते, तर शाक्य, शुद्रक, मालव, वृज्जी या महाजनपदात गणतंत्र प्रणाली होती. गणतंत्र असणाऱ्या जनपदात दोन प्रकारे कारभार चाले. एकात सर्व नागरिक एकत्र येऊन आपला कारभार करत, तर दुसऱ्या प्रकारात उच्चकुलीन वर्ग कारभार करत असे. या महाजनपदात ‘काशी’ हे सर्वांत बलवान महाजनपद असल्याचे तत्कालीन बौद्ध ग्रंथात म्हटले आहे. याचे पुरावे अनेक जातकांत सापडतात. ‘गुत्तील जातकात’ वाराणसी हे अधिक महत्त्वाचे नगर असल्याचा उल्लेख आहे. बुद्ध आणि महावीर यांच्या कालखंडात कोसल, मगध, वत्स आणि अवंती ही महत्त्वाची जनपदे होती. बिंबिसाराने मगध सम्राज्याची स्थापना करून आपल्या शेजारील अंग राज्य जिकून घेतले, तर काशीचे राज्य कोसलमधे विलीन झाले.
या महाजनपदांमधे आहत नाणी (Punch-marked coins) या चलनाचा वापर केला जात असे. यावर अनेक चिन्हे ठोकून अंकित केलेली असत. अनेक उत्खननातून या जनपदांची नाणी उपलब्ध झालेली आहेत. या नाण्यांवर प्रामुख्याने मानवी आकृती, प्राणी, जलचर, झाडे, चंद्र, सूर्य, पर्वत, धार्मिक मंगलचिन्हे, आयुध चिन्हे उमटवलेली दिसतात. ही चिन्हे नाण्याच्या विशिष्ट भागावर व ठरावीक ठिकाणी उमटवलेली दिसून येतात. सुरुवातीला नाण्याच्या एकाच बाजूवर चिन्हे उमटवलेली असायची; परंतु नंतरच्या काळात दोन्ही बाजूंवर उमटवलेली दिसतात. या चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न प्रसिद्ध नाणे अभ्यासक दुर्गा प्रसाद, धर्मानंद कोसंबी, परमेश्वरीलाल गुप्त यांनी केला. महाजनपदांच्या नाण्यांवरील चिन्हे, त्यांचे वजन, तयार करण्याची पद्धत, धातूची शुद्धता यांत सूक्ष्म फरक असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.
प्राचीन भारतीय ग्रंथ, ग्रीक-रोमन प्रवासवर्णने आणि बौद्ध ग्रंथात उल्लेखलेल्या महाजनपदांची ओळख एकोणिसाव्या शतकात केली गेली. याचे श्रेय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे पहिले महासंचालक सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना जाते. महाजनपदांच्या भूमीत दिल्लीमधील पुराना किला, हस्तिनापूर, मथुरा, कांपील, अहिच्छत्र, अयोध्या, कौशांबी, अलाहाबादमधील शृंगवेरपूर, बनारसमधील राजघाट, श्रावस्ती, काली नदीच्या परिसरात अतरंजीखेरा यांसारख्या ठिकाणी उत्खनने झालेली असून अनेक प्राचीन अवशेष मिळाले आहेत. इ. स. पू. ३२६ मध्ये अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी यातील अनेक गणराज्ये अस्तित्वात असल्याचे त्याच्या बरोबरच्या ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. मेगॅस्थिनीजने त्याच्यावेळी हिंदुस्थानातील एकंदर राज्यांची संख्या ११८ दिलेली आहे. ह्युएनत्संगने (युआन च्वांग) महाजनपदांच्या राजधान्यांना भेटी दिल्याचे त्याच्या प्रवासवर्णनात दिसते.
संदर्भ :
Singh, Upender, A History of Ancient and Early Medieval India, From the Stone Age to the 12th Century, Pearson Education India, 2008.
गिरिजा शंकर प्रसाद मिश्र, प्राचीन भारत का इतिहास, जयपूर पब्लिशिंग हाउस, जयपूर, १९९६.
ढवळीकर, मधुकर केशव, प्राचीन भारतीय नाणकशास्त्र, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९७५.
नकाशास्रोत : देगलूरकर, गो. बं. प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती, अपरांत प्रकाशन, पुणे, २००५.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...