विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 May 2021

पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed) भाग ५

 पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)

लेखक :शशिकांत पित्रे

भाग ५
रणभूमी : भौगोलिक विश्लेषण : समुद्रसपाटीपासून १६०० फूट उंचीवर असलेल्या पालखेडचे क्षेत्र मैदानी होते. गोदावरी नदी नैऋत्येला १५ मैलांवर असून तिथून जवळच प्रवरा नदी तिला मिळते. प्रवरेत मुठेचे पाणी येते. त्यामुळे गोदावरीचे पात्र रुंद, मुबलक पाण्याने भरलेले. ती ओलांडण्याची एकच जागा म्हणजे पुणतांबे. पालखेडच्या आग्नेयेस आणि पूर्वेच्या दिशेने शिवनाला ती वाहत असे. पालखेडच्या सान्निध्यातील पिण्याच्या पाण्याचा तो एकमेव स्रोत होता. उत्तरेला प्रदेश चढत जात होता आणि २५ मैल दूर २२०० फूट उंचीवर घनदाट अरण्य होते. ते पार करणे कठीण होते. उत्तरेस अरण्य, पूर्वेस शिवनाला आणि दक्षिणेस गोदावरी अशा सर्व बाजूंनी अडथळ्यांनी वेढलेले पालखेडचे रणांगण बाजीरावांच्या डावपेचांना पूरक होते.
लढाईचा आराखडा : बाजीरावांच्या रणनीतीचे तीन प्रमुख घटक होते. त्यांच्या अनुमानानुसार निजामाच्या अगडबंब सैन्याला गोदावरी पार करण्यास तीन दिवस लागणार होते. पहिल्या दिवशी पाहणी आणि योजनेसाठी आघाडीच्या तुकड्या गोदावरी पार करून येणे अपेक्षित होते, दुसऱ्या दिवशी प्रमुख सेना, काही रसद आणि बाजारबुणगे आणि तिसऱ्या दिवशी तोफखाना आणि अवजड रसद. तोफखान्याला निजामाच्या इतर सेनेपासून वेगळे करण्याचा बाजीरावांचा मुख्य डाव होता. तोफखाना हे मोगलांचे प्रमुख अस्त्र होते. त्याला गोदावरी ओलांडण्यासच मज्जाव केला, तर त्यांचे हे युद्धविजयी अंगच निकामी होणार होते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सेना गोदावरी ओलांडून सापळ्यात आल्यावर पुणतांब्याची ओलांडण्याची जागाच आपल्या तुकडीद्वारे गोठवून टाकली की, १५ मैल दूर असलेला तोफखाना कुचकामी होईल, हा रणनीतीचा पहिला घटक होता.
दुसरा घटक निजामाची रसद तोडणे, हा होता. निजामी सैन्याचा शिधा आणि सामान गाढवांवर लादलेले असे. हा घोडे-गाढव चमू पालखेड रणक्षेत्रात आला की, रात्री गनिमी हल्ला करून त्यांना चारी दिशांना पळवून लावायचे आणि रसद व त्याबरोबर जनावरांच्या वैरणीची धूळधाण करायची, हा डावपेच.
तिसरा घटक म्हणजे शत्रूला पाण्याविना मारायचे. शिवनाल्याला तसे फेब्रुवारीमध्ये पाणी कमीच. विहिरीही कोरड्या. गोदावरी आणि शिवनाल्यावर शत्रुसैन्याला पाण्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, हा तिसरा कावा. निजामाच्या सैन्याचा शिधा आणि पाणी अडवले तर निजाम शरण येईल, याची बाजीरावांना खात्री होती. उत्तरेकडे अरण्य आणि दक्षिणेकडे गोदावरी याची पूर्णत: नाकेबंदी केली, तर त्यांचे मार्गच खुंटतील, हे निश्चित होते.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...