विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

मराठी सत्तेच्या उत्तरेतील पाऊलखुणा भाग २

 

मराठी सत्तेच्या उत्तरेतील पाऊलखुणा
पोस्ट सांभार : Pramod Karajagi



भाग २
चारखी दाद्री या गावात अनेक मंदिरे व धर्मशाळा आहेत, गावात मरेठा गौडांची त्यावेळी शंभर एक घरे होती. तेथील बहुतेक ब्राम्हण मरेठा गौड आहेत. त्यांच्यात 'पंत' आणि 'प्रधान' अशी आडनावे आढळतात. पहिल्या बाजीरावाबरोबर हे दक्षिणेतून आले असावेत. महीम व तुश्याम हे प्राचीन कसबे आहेत, तेथील बांधलेली शंकराची प्राचीन मंदिरे मराठ्यांनीच बांधलेली आहेत असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या भागात "जसवंतराव तेरे मरनेके बाद अंग्रेजोनो राज बढायो " अशी गाणी तेथील लोकांच्या गळ्यात वास्तव्य करून आहेत. (जसवंतराव म्हणजे यशवंतराव होळकर). महादजी शिंदे, यशवंतराव होळकर, खंडेराव हरी, नारायणराव, गोपाळराव भाऊ अशी नावे त्या भागातील लोकांच्या माहितीतील आहेत. तसेच 'कोट' या गावातील एक भुईकोट किल्ला आहे, तो मराठ्यांनी बांधलेला आहे. किल्ल्याला सभोवार खंदक खणलेला आहे. किल्ल्याच्या आत मराठ्यांची आवडती अशी 'सावन भादवा ' नावाची तोफ आहे. शिंद्यानी त्यांच्या या किल्ल्यातील वास्तव्याच्या वेळेस किल्ल्याचे नाव "मोतीगड" असे ठेवले होते. शहरात 'भाऊ गंज' नावाचा मोहल्ला आहे. मराठ्यांचे अंमलदार गोविंदराव भाऊ यांनी तो वसवला असे म्हणतात. कानोड उर्फ महिंद्रगड नावाचा प्रसिद्ध किल्ला या प्रांतात आहे, तो नजफकुली खानाकडून मराठ्यांनी लढून जिंकून घेतला होता. या लढाईत खंडेराव हरी, गोपाळराव भाऊ व फ्रेंच सेनापती पेरन निकराने लढले होते.
दिल्लीपलीकडील मराठी सत्ता व आक्रमणे याबद्दलची बरीच लोकगीते त्या भागात प्रचलित आहेत. त्यामध्ये महादजी शिंदे याने गुलाम कादिर याच्यावर बादशहाची बेइज्जती केल्याबद्दल उगवलेला सूड तसेच यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा केलेला पराभव असे विषय आलेले आहेत. या कवितांची शीर्षके "जंग ए सेंधिया " तसेच "जंग ए हुलकर " अशी आढळतात.
एकंदरीत मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने उत्तर हिंदुस्थानात आपल्या स्मृती अद्याप ठेवलेल्या आहेत असे दिसते.
(संदर्भ: श्री.शंकर पुरुषोत्तम जोशी लिखित मराठी सत्तेचा उत्तरेकडील विस्तार हे पुस्तक. हे पुस्तक सन १९३७मध्ये प्रसिद्ध झाले होते.१९३६च्या जानेवारी ते जूनअखेर पर्यंत लेखकाने हरियाणातील दिल्ली नजीकच्या भागात मिळेल त्या वाहनाने तर कधी कधी पायी प्रवास केला होता आणि ही माहिती लिखित स्वरूपात जतन करून ठेवली आहे.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...