विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 28 June 2021

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार : हेन्री ऑक्झेंडन

 


शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार : हेन्री ऑक्झेंडन

शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या परदेशी वकीलांपैकी, ब्रिटिश सरकारने पाठवलेला महत्वाचा वकील म्हणजे हेन्री ऑक्झेंडन, त्याच्यासोबत जॉर्ज रॉबिन्सन, थॉमस मिचेल आणि नारायण शेणवी हा दुभाषा आले होते.
चौल म्हणजेच रेवदंडा येथे बुधवार,१३ मे रोजी रात्री ऑक्झेंडन एका गलबतातून पोहोचला. १४ मे रोजी चौलच्या सुभेदाराची भेट घेऊन त्यास काही नजराणे देऊन तो निजामपूर गांगवली मार्गे १९ मे रोजी सकाळी ९ वाजता पाचाडला पोहोचला. यावेळी निराजीपंत रायगडावर असल्याने त्यांची भेट २० मे रोजी झाली. या भेटीत हेन्रीने निराजीपंत यांना एक अंगठी नजर केली व त्यांच्या थोरल्या मुलगा प्रल्हाद निराजीस पाम-यांची एक जोडी दिली.
या वेळी शिवराय प्रतापगडावर भवानीमातेच्या दर्शनासाठी गेले असल्याने रायगडी नव्हते, त्यामुळे त्याला पाचाडमध्येच मुक्काम करावा लागला.
२१ मे रोजी महाराज रायगडावर परत आले असल्याचे त्याला समजले.
२२ मे रोजी शिवरायांच्या सूचनेप्रमाणे हेन्री ऑक्झेंडन व त्याचे दोन सहकारी रायगडावर पोहोचले. एका स्वतंत्र घरात त्यांची राहण्याची सोय केली होती.
गड चढत असताना ऑक्झेंडनची नजर गडाविषयी विविध गोष्टी मनांत साठवत होती. यांच्या नोंदी हेन्रीच्या रोजनिशीत पह यला मिळतात.
“फितुरीखेरीज हा गड अभेद्य असून कोणाच्या ताब्यात जाण्याचा संभव नाही; गडावरील राजमहाल, दरबार, घरे मिळून सुमारे तिनशे इमारती आहेत”
२३ मे रोजी ऑक्झेंडनने निराजीपंतांना विनंती केली की, “माझी आणि राजांची भेट घडवून द्या” पण महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वतयारी, इतर दोन पत्नींसोबत समंत्रक विवाह या विधींमध्ये व्यस्त असल्याने भेट होऊ शकली नाही.
२६ मे रोजी रायगडावर शिवराय व ऑक्झेंडन यांची पहिली ऐतिहासिक भेट झाली. ऑक्झेंडनने महाराज आणि संभाजी राजे यांना नजराणा दिला. शिवरायांनी तो आदरपूर्वक स्विकारला व म्हटले “आता तह झाला आहे; तेव्हा तूम्ही खुशाल, बिनधोक व्यापार करा” यावर हेन्रीने इतर देशांत मिळणाऱ्या सवलती या राज्यात मिळाव्या अशी इच्छा व्यक्त केली. यावर शिवरायांनी मोरोपंतांचा हवाला देऊन तह पूर्ण करून घ्या असे सांगितले. शिवरायांना मुंबई वरून आलेली दरबारी खुर्ची या प्रसंगी त्याने नजर केली.
ऑक्झेंडनने नजर केलेल्या वस्तूंची यादी खालीलप्रमाणे
*शिवाजीराजे यांस*
१ हिरेजडित शिरपेच,
२ हिरेजडित सलकडी
२ मोती
*युवराज संभाजी राजे यांस*
२ सलकडी
१ कंठी ८ हि-यांची
*मोरोपंतास* २ मोती
*अण्णाजी पंडितास* २ सोन्याचे गोफ
*निराजी पंडितास* २ पाम-या
*रावजी सोमनाथास* २ पाम-या
ऑक्झेंडनच्या रायगडच्या शिष्टाईची रोजनिशी मधील एक नोंद आपल्याला *शिवकालीन पत्रसार संग्रह, खंड २, पत्र क्र १६४३* मध्ये पहायला मिळते, ती पुढीलप्रमाणे
जून 5 रोजी दुसऱ्या दिवशी सात आठ वाजता सिंहासनारूढ राजाला मुजरा व नजर करण्यासाठी यावे म्हणून निराजी पंडिताचा निरोप आला
तारीख ६ जून रोजी त्यावेळी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झालेला व मूल्यवान पोषाख केलेल्या प्रधानांनी वेष्टीलेला दिसला. संभाजी राजे, पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राम्हण हे सिंहासनाखाली लगत उंचवट्यावर बसले होते. राहिलेले सेनाध्यक्ष व इतर अंमलदार बाजूला आदराने उभे होते. मी मुजरा केला व नारायण शेणव्याने नजरेची अंगठी वर धरली. शिवाजीचे आमच्याकडे लक्ष जाताच त्याने अगदी सिंहासनाच्या पायरीजवळ येण्याचा आम्हाला हुकूम केला व पोषाख देऊन आम्हाला तत्काळ रजा दिली. थोडाच वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो, तेवढ्या वेळात सिंहासनाच्या दोन्ही बाजूना सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर (मुसलमानी पद्धतीची) अनेक अधिकार विषयक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला दोन मोठी मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्व पूछे व एक मुल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी, न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो होतो, तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूंना उभे केले असून, दोन सुंदर (पांढरे) घोडे शृंगारून आणलेले दिसत होते. गडाचा मार्ग इतका बिकट होता हे लक्षात घेता हे पशु कोठून वर आले असावे, याचा आम्हाला तर्कच करवेना.
११ जून रोजी शिवाजीराजे यांनी तहावर मान्यतादर्शक सही केली व १२ जून रोजी त्यावर अष्टप्रधानांच्या सह्या झाल्या. ऑक्झेंडन यानंतर निराजीपंतांच्या घरी गेला, निराजी व ऑक्झेंडन यांचा स्नेहपूर्वक संवाद झाला. तहाच्या कलमाचे उतारे करून इतर कामगिरी निराजीपंतांच्या पुतण्याने केली म्हणून ऑक्झेंडनने त्याला एक पामरी भेट केली.
प्रसन्न मनाने १३ जून रोजी ऑक्झेंडन रायगडावरून निघाला व १६ जून रोजी मुंबईत दाखल झाला. शिवरायांसोबत बरोबरीचा तह हा ऑक्झेंडनचा मोठा राजनैतिक विजय होता.
शिवराज्याभिषेक समयीच्या ब-याच महत्वपुर्ण विधी व घटनांचा क्रम याविषयी वस्तूनिष्ठ संदर्भ ऑक्झेंडन च्या रोजनिशीत मिळतात.
स्वराज्यातील एक महत्वपुर्ण घटना अभ्यासणे सोपे होते.
संदर्भ
शिवकालीन पत्रसार संग्रह २
सभासद बखर
मराठ्यांची ९१ कलमी बखर
संकलन
आयशा आस्मा
(९६१९९७१४९५)
📸 Courtesy : अमर सोनके

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...