जाधवराव – मालोजीराजे व रंगपंचमीची हकीकत
बाबाजी भोसले मोठे सदाचारी व धर्मशील होते . ह्यांना मालोजी व विठोजी असे दोन पूत्र होते. मालोजी १५५० त जन्मला व विठोजी १५५३. हे मोठे हुशार व सद्गुणी निपजले.
मालोजी शरीराने मोठा मजबूत व धिप्पाड होते , इतका की त्याच्या स्वारीस घोडें टिकत नसे, यामुळे जाधवरावाने त्यास देवडीवर ठेवले. तो मोठा चतुर, हुशार व गुणी असल्यामुळे जाधवरावाचा त्याच्यावर लवकरच लोभ जडला. त्याने त्यास मूर्तिजा निजामशहा पाशी नेऊन, हा मोठा नेकीचा व उमदा पुरुष आहे, अशी त्यांची शिफारस केली. बादशहाने त्याची इभ्रत व हुशारी पाहून खुष होऊन त्याला आपल्या लष्करात शिलेदारी दिली, मग मालोजी घरची घोडी व बारगीर ठेवून निजामशहाची नोकरी करू लागला, तरी तो जाधवरावांचा अंकित च होता.
मालोजीचे लग्न फलटणचा देशमुख जगपाळराव निंबाळकर याच्या बहिणीशी झाले. हिचे नाव दीपाबाई
विठोजीस ही शिलेदारी मिळाली होती, त्यास आठ पूत्र झाले, परंतु मालोजास काही एक संतती होईना. आपल्या पोटी मूल नाही म्हणून दिपाबाईला अतिशयातित दुःख वाटे. त्या दंपत्याने पुत्रप्राप्तीसाठी पुष्कळ दानधर्म अनुष्ठाने, नवस सायास केले. शेवटी त्याने नगरचा पीर शहाशरीफ यास नवस केला. प्रत्येक गुरुवारी मालोजी फकिरास दानधर्म व खैरात करत असे, असा क्रम त्याने सहा महिने चालविला तेव्हा सुदैवाने दिपाबाई गरोदर होऊन १५९४ मधे तिला प्रथम पुत्ररत्न प्राप्त झाले. हा पुत्र आपणास पिराच्या अनुग्रहाने झाला असे मानून मालोजीने त्याचे नाव शहाजी असे ठेवले. नंतर दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफजी असे ठेविले.
शहाजी राजे
शहाजी राजे हे चांगला देखणा असून मोठा चलाख, हुशार व गुणी होते . त्याची वाणी मधुर होती, चालचलणूक फारच मोहक होती. ह्या मुलाची चालचर्या पाहून जाधवरावास मोठे कौतुक वाटे. तो त्याला आपल्या घरी वेळोवेळा घेऊन जाई व त्याला वस्त्राभरणे देऊन नटवी सजवी, असे त्याचे अनेक प्रकारे लाड करी.
जाधवरावास जिजाऊ नावाची दोनतीन वर्षाची एकुलती एक मुलगी होती. तिच्या बरोबर शहाजी तासनतास खेळत असे.
शहाजी राजे पाच वर्षाचा असता शिमग्याचा सण आला. जाधवरावाने रंगपंचमी समारंभ करून मातबर लोकांना व आप्तांस आपल्या घरी आमंत्रण केले. इतरांबरोबर मालोजीसही आमंत्रण मिळाले, त्यावरून तो शहाजीराजस घेऊन समारंभास गेला. जाधवरावाने शहाजीस हाक मारून आपल्या जवळ बोलावले. तो जाऊन जाधवरावाच्या मांडीवर बसला. इतक्यात जिजाऊ घरातून धावत येऊन आपल्या बापाच्या दुस-या मांडीवर बसली. दोन्ही मुले बहुतेक समान वयाची व गोजिरवाणी पाहून जाधवराव लडिवाळपणे बोलला, “मुली, हा तुला नवरा पाहिजे काय? खरोखर हा जोडा योग्य दिसतो” इतक्यात ही दोन्ही मुले जवळ असलेल्या तबकातील रंगगुलाल घेऊन एकमेकांवर उडवू लागली. ती त्यांची बालस्वभावास अनुरूप अशी क्रीडा पाहून सभेत बसलेल्या लोकास मोठे कौतुक वाटले व ते हसून म्हणाले, “जोडा योग्य आहे” तेव्हा मालोजी व विठोजी उठून सभासदास म्हणाले, “ऐका हो, जाधवराव आजपासून आमचे व्याही झाले व जिजाऊ आमची सून झाली ते काय बोलले ते तुम्ही सर्वांनी ऐकिलेच आहे, आता हा निश्चय बदलणार नाही. थोर लोक सभेत बोलल्यावर मागे सरणार नाहीत.”
ह्याप्रमाणे सर्व सभाजनांस साक्षी ठेवून ते खाली बसले. ते त्याचे बोलणे ऐकून सभेतील लोक म्हणाले की, “प्रमाण आहे” जाधवराव हा प्रकार पाहून चकित झाले त्यानी त्या वेळी काही एक उत्तर केले नाही.
दुसरे दिवशी जाधवरावाने सर्व आप्तांस भोजनाचे आमंत्रण दिले. इतरांबरोबर मालोजीस ही बोलावणे पाठवले. मलोजीने उलट निरोट पाठवला की, “आम्ही तुमचे व्याही झालो, आता तुमच्या बरोबर भोजन लग्नसमारंभाचे वेळी होईल. मध्यंतरी आम्हास बोलावू नये”
ही गोष्ट जाधवरावांची पत्नी म्हाळसाबाई हिस कळली. तेव्हा मालोजीचा हा उद्दामपणा पाहून ती फारच रागावली. जाधवरावासारख्या मातब्बर सरदाराशी मालोजीसारख्या यःकश्चित शिलेदाराने सोयरीक करू पाहणे हे अर्थितच मोठे धाडस होते.
म्हाळसाबाई आपल्या नव-यास म्हणाली, “आपल्या तोंडून सभेत शब्द गेला हे अनुचित झाले, ते उठून बोलले त्यावेळी त्यास लागलीच धमकी द्यावी ती आपण दिली नाही त्या वेळी उगीच गप्प बसलो हे ठीक झाले नाही. मालोजी आपल्या पदरचा नोकर, त्याच्या घरी मुलगी दिल्याने लोकापवाद येणार. निंबाळकर, शिर्के, महाडीक असे बरोबरीचे सरदार, मनसबदार, देशमुख आहेत, त्यांच्या घराण्यात मुलगे आहेत. ते टाकून मालोजीच्याच मुलास मुलगी द्यावयाची, एवढी त्याची मातब्बरी तरी काय पाहिली?”
जाधवरावाने तिचे समाधान केले की, “मी सभेत सहज बोललो. माझे त्या बद्दल वचन काही गुंतले नाही”
मग त्याने मालोजीस परत असे सांगून पाठवले की, “लग्नाची गोष्ट बिलकुल बोलू नका, आमच्या घरात ती कोणाच्या विचारास येत नाही.. सभेत मी जे बोललो ते केवळ विनोदाचे होते. ते खरे समजून हट्ट धरून बसणे समजूतदार मनुष्याला शोभत नाही. भोजनास अवश्य यावे. पुढे ब्रम्हसूत्र असेल तसें घडून येईल”
त्यावर मालोजीचा असा जवाब आला की, “इतक्या लोकांसमक्ष आपण बोललात, ते अप्रमाण कसे होईल? आम्हास आपणाशी सोयरीक अवश्य कर्तव्य आहे.”
हा त्याचा उद्धटपणाचा जवाब ऐकून जाधवरावास अतिशय क्रोध आला. भोजन आटोपल्यावर त्याने कारकुनास बोलावून आणून हुकूम दिला की, “मालोजीचा व विठोजीचा जो काही हिशोब झाला असेल तो त्यास चुकता करावा व नोकरी सोडून आताच्या आता मुले-माणसे घेऊन येथून जावयास सांगावे.” ह्या प्रमाणे जाधवरावाची नोकरी सुटून त्या दोघांस वेरूळगावी जाऊन रहावे लागले व पुन्हा त्यांच्या हाती नांगर आला.
संकलन
आयशा आस्मा
९६१९९७१४९५
संदर्भ : क्षत्रिय कुलावतंस शिवाजी महाराज
चिटणीस बखर
History of Marathas by Grant Duff
No comments:
Post a Comment