विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 28 June 2021

शिवराज्याभिषेकाप्रसंगीच्या तीन नाण्यांची गोष्ट.....

 





शिवराज्याभिषेकाप्रसंगीच्या तीन नाण्यांची गोष्ट.....

लेखन
नविन म्हात्रे
जोगेश्वरी , मुंबई.
उत्तर कोकणातील प्रदेशावर शिवाजी महाराजांचा अंमल प्रस्थापित झाल्यापासून इंग्रज हे मराठयांचे शेजारी बनले. व्यापारी असलेले इंग्रज आणि मराठ्यांचे व्यापारी संबंध होते. राज्याभिषेकाच्या वर्षात म्हणजेच इ.स. १६७४ मध्ये इंग्रज आणि शिवाजी महाराजांची तहाची बोलणी सुरू होती. शिवाजी महाराजांच्या कोकणच्या प्रदेशात व्यापार वाढवणे. राजापूरचे नुकसान भरून काढणे व नव्या सवलती मिळवणे तसेच पूर्वी झालेल्या बोलणीवर शिकामोर्तब करून त्यास तहाचे स्वरूप आणणे. हे इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते. १६७४ च्या मार्चमध्ये मुंबईतील सल्लागार मंडळाने हेन्री ऑक्झेंडनची वकील म्हणून नेमणूक केली. याच सुमारास रायगडावर राज्यभिषेकाची धामधूम होती. हा इंग्रजी वकील ता. २२ मे रोजी चौलमार्गे रायगडावर पोहोचला त्याच्यासोबत त्याचे दोन सहकारी होते. (राज्याभिषेकातील चित्रात जे तीन इंग्रज शिवाजी महाराजांना मुजरा करताना दिसतात ते हे तीन इंग्रज होत.) २६ मे रोजी शिवाजी महाराज आणि या इंग्रज वकिलांची पहिली ऐतिहासिक भेट झाली. त्यावेळी या वकिलांनी महाराजांना नजराणा दिला. महाराजांनी तो आदरपूर्वक स्वीकारला आणि म्हंटले," आता तह झाला आहे, तेव्हा तुम्ही खुशाल बिनधोक व्यापार करा."
या तहात एकूण २० कलमे जरी असली तरी ती फक्त चार मुख्य कलमांची उपकलमे होती असे म्हणता येईल. या चारपैकी दोन महाराजांनी मान्य केली तर दोन फेटाळली. महाराजांच्या राज्यात इंग्रजांनी व्यापार करावा आणि त्यांना व्यापारी मालावर जकात माफ असावी. ही दोन कलमे महाराजांनी मान्य केली होती. नाणी आणि किनाऱ्यावरील वादळात सापडलेल्या गलबतांबद्दलची कलमे ही फेटाळली होती. नाण्यांच्याबाबतीत महाराजांनी प्रत्यक्ष विरोध केला नव्हता. त्याचे म्हणणे होते की ,"इंग्रजांची नाणी चांगली असली , म्हणजे त्यातील धातूची किंमत व नाण्यांची छापील किंमत ही योग्य प्रमाणात असली तर लोकं आपखुषीनेच ती स्वीकारतील."
इ.स. १६७० मध्ये मुंबईस इंग्रजांनी आपली नाणी पाडण्यास सुरुवात केली. १६७० मध्ये मुंबईस इंग्रजांनी आपली नाणी पाडण्यास सुरुवात केली. १६७६ मध्ये इस्ट इंडिया कंपनीस नाणी पडण्याचा मक्ता इंग्लंडच्या राजाने दिला. आपण जेथे जेथे व्यापार करू तेथे तेथे आपली नाणी रूढ व्हावी हा कंपनीचा हेतू होता. कंपनीच्या सोन्याच्या नाण्यास कॅरोलिना , रुप्याच्या नाण्यास ऑजेलिना आणि तांब्याच्या नाण्यास कॉपेरुन व जस्ताच्या नाण्यास टिनी ही नावे होती. इंग्रज व मराठे यांच्या तहाने कंपनीच्या नाण्यास महाराजांच्या प्रदेशात कायदेशीर चलन म्हणून मान्यता मिळावी असा इंग्रजांचा आग्रह होता.
राज्यभिषेकप्रसंगी सर्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून शिवाजी महाराजांनी दोन धातूंमध्ये नाणी पाडली होती. तांब्याची 'शिवराई' आणि सोन्याचा 'होन' ही तीन नाणी होतं. नाण्यांवर देवनागरी लिपीचा वापर केला होता. नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव' व दुसऱ्या बाजूला 'छत्रपती' अशी अक्षरे होती. सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारात तांब्याची 'शिवराई' हे नाणे चलनात वापरले जाई तर 'होन' या नाण्याचा वापर मोठ्या व्यवहारात केला जाई.
इंग्रजांचा कॉपेरून आणि शिवराई ही जवळजवळ सारख्याच वजनाची नाणी होती. इंग्रजी नाणी व्यापारात पर्यायाने व्यवहारात वापरण्याचे नाकारून महाराजांनी शिवराईलाच आपल्या प्रदेशात अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली होती. काही काळातच हा कॉपेरुन व्यवहारातून बाजूला पडला परंतु शिवराई मात्र काही दशका आधीपर्यंत चलनात होती.
* इंग्रजांचे कॉपेरून हे नाणे १३-१४ ग्रॅमचे असून नाण्याच्या एका बाजूवर MON/BOMBAY/ANGELIC/REGIMS/A. O.9.0. असा मजकूर असून बिंदूयुक्त वर्तुळात EO : PAX : & : INCREMENTVM :74 A D. तर मागील बाजूस ईस्ट इंडिया कंपनीच्या ढालीचे चित्र आहे तसेच बिंदूयुक्त वर्तुळात HON : SOC : ANG : IND : ORI :ही अक्षरे असतात.
* 'शिवराई' हे नाणे तांब्याचे, सुमारे ११-१२ ग्रॅम वजनाचे असून नाण्यावर बिंदूयुक्त वर्तुळात एका बाजूला "श्री राजा शिव" तर दुसऱ्या बाजूला " छत्र पती" असा मजकूर असतो. 'होन' सोन्याचे २.८८ ग्रॅम वजनाचे व १.३२ सेमी व्यासाचे नाणे आहे. 'होन' या नाण्यावर शिवराई नाण्याप्रमाणेच मजकूर येतो.
शिवराई आणि होन(replica) नाणी लेखकाच्या वैयक्तीक संग्रहातील आहेत तसेच कोपेरून चे छायाचित्र इंटरनेटवरून.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...