पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुखरूप कसाबसा माळव्यात पोहोचले, कालांतराने राणोजी शिंद्याच्या याच पुत्राने इतिहास घडविला आणि अवघ्या १० वर्षांत पानिपतच्या पराभवाचा कलंक धुऊन काढून मराठेशाहीला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
हरहर महादेव ' च्या गगनभेदी घोषणा देत महादजी शिंद्याच्या युद्धशल नेतत्त्वाखाली रणझुंझार मराठा सैन्यदळे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तुटून पडलीत . मराठयांच्या झावाती आक्रमणाचा मुकाबला करण्याचा झाबेताखानाने आटोकाट प्रयत्न केला , पण व्यर्थ , चवताळलेल्या मराठ्यांनी झाबेताताखानाच्या सैन्याचा धुव्वा उडविला . पराभूत झाबेताखान निसटला , दुआबात पळाला . १० फेब्रुवारी १७७१ रोजी महादजी शिंद्यांनी दिल्लीचा लाल किल्ला काबीज करून उत्तरेच्या राजकारणावर पुन्हा मराठ्याच्या वर्चस्वाची मोहर उठविली,
१४ जानेवारी १७६१ पानिपत - १० फेब्रुवारी १७७१ दिल्ली काबीज अवघ्या १० वर्षात महादजी शिंदेंनी पानिपतच्या दारुण पराभवाचा कलंक धुऊन काढला.
अली गौहर उर्फ शहाआलम दुसरा या दिल्लीच्या परागंदा मुघल बादशहास संरक्षण देऊन महादजी शिंदेने ६ जानेवारी १७७२ रोजी त्याची पुन्हा मोठ्या इतमामाने दिल्लीच्या तख्तावर प्रतिष्ठापना केली. नामधारी मुघल बादशहास हाताशी धरून उत्तर हिंदुस्थानवर मराठेशाहीचे वर्चस्व प्रस्थापित करावयास महादजी बाबा मुक्त झाले .
नजीबखानाची कबर उद्ध्वस्त करून , उभा रोहिलखंड मनसोक्त लुटुन व बेचिराख करून महादजींनी पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या पराभवाचा सणसणीत सूड उगविला.संपूर्ण रोहिलखंडावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली.मराठ्यांचा विजयी जरीपटका माळव्यापासून दुआबापर्यंत डौलात फडफडू लागला.
ब्रिटिशांशी करावयाच्या तहाची सूत्रे आपल्या हाती असावीत , यावरून नाना व महादजी यांच्यात सुरू असलेल्या रस्सीखेचीत अखेरीस नानाला महादजीपुढे नमते घ्यावे लागले . १७ मे १७८२ रोजी ग्वाल्हेरपासून २० मैल अंतरावरील सालबाई येथे महादजी शिंदेने मराठेशाहीच्या वतीने ब्रिटिशांशी तह केला . डिसेंबर १७८२ मध्ये हैदरअलीचा मृत्यू झाल्यानंतरच नाना फडणिसाने सालबाईच्या तहावर १७८३ च्या सुरुवातीस अधिकृतपणे मान्यतेचे शिक्कामोर्तब केले . मराठेशाहीतील एककेंद्रियत्व संपुष्टात येऊन नाना फडणीस व महादजी शिंदे यांच्या रूपाने मराठेशाहीत दोन सत्ताकेंद्रे अस्तित्वात आलीत . बुद्धिमान कुशल राजनीतिज्ञ रणझुंझार मुत्सद्दी महादजी बाबा अव्वल दर्जाचे सेनापती होते,
यरोपियनांच्या प्रशिक्षित फौजेचे महत्त्व सर्वप्रथम ओळखणाऱ्या महादजी शिंदेंनी १७८४ मध्ये डी बॉयने या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाला आपल्या पदरी ठेवून १७८४ - ९२ या काळात डी बॉयनेच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्श युरोपियनांच्या तोडीस तोड पाश्चात्त्य पद्धतीच्या प्रशिक्षणाने सज्ज झालेल्या आपल्या तीन पलटणी उभारल्या.आग्रा आणि अलीगड या ठिकाणी महादजी बावांनी दारूगोळ्याचे कारखाने काढले आणि पाश्चात्त्य धर्तीवर शस्त्रास्त्रांची निर्मिती तोफा ओतण्याचा धुमधडाका सुरू केला . पाहता पाहता महादजींनी आपला प्रभावी तोफखाना व शिस्तबद्ध लष्करी फौज उभारून उगवत्या ब्रिटिश सत्तेस जबरदस्त आव्हान दिले.
केवळ महादजींचे मराठेशाहीतील अस्तित्व ब्रिटिशांना मराठेशाहीपासून चार हात दूर ठेवण्यास पुरेसे होते.ब्रिटिश हेच मराठ्यांचे खरे व अंतिम शत्रु आहेत ; हिंदुस्थानवरील आपल्या सार्वभौमत्वासाठी मराठ्यांना अखेरचा लढा ब्रिटिशांशीच द्यावा लागणार आहे ; याची मनोमन जाणीव महादजींला होती . रणांगणावर ब्रिटिशांशी प्रत्यक्ष लढलेल्या आणि उत्तरेतील ब्रिटिशांचे राजकारण व त्यांच्या तिरक्या चाली यांची इत्थंभूत माहिती असलेल्या महादजी शिंदेंनी टोपीकर इंग्रजांचा कावा व त्यांची साम्राज्यवादी पावले जितकी ओळखली होती,तितके ब्रिटिशांच्या राजनीतीबाबत नानालाही ज्ञान नव्हते,टोपीकर इंग्रजांच्या धूर्त,कपटी,संधीसाधू राजकारणाची व त्यांच्या साम्राज्यवादी धोरणाची जितकी अचूक जाणीव शिवछत्रपतींना होती ; ती जाणीव त्यांच्यानंतर तेवढ्याच प्रकर्षाने मराठेशाहीत महादजी शिंदेंना झाली होती ; म्हणूनच रियासतकार सरदेसाई म्हणतात , “शिवाजी महाराजांनंतर महाराज नावास शोभणारा अखिल मराठेशाहीत महादजी हा पुरुष झाला यात संशय नाही,
१४ नोव्हेंबर १९७८४ रोजी फत्तेपूर सिक्री येथे महादजी शिंदेंचे समारंभपूर्वक जंगी स्वागत करून बादशहा शहाआलमने ' वकील - ए - मुतालिक ' या पादशाहीतील सर्वाच्च अधिकारपदावर त्याची नियुक्ती केली,वझीर आणि मीरबक्षी या दोघांचेही अधिकार समाविष्ट असलेले वकील - ए - मुतालिक हे सर्वोच्च अधिकारपद यापूर्वी फक्त निजाम - उल - मुल्क यालाच देण्यात आले होते.
लासोट्याच्या लढाईत महादजी शिंदेंना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली, डीगपर्यंत यशस्वी माघार घ्यावी लागली, लालसोटच्या पराभवाने महादजींच्या उत्तरेतील प्रतिष्ठेला जबरदस्त तडा गेला, परंतु त्या बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले धैर्य सोडले नाही की,त्यांच्या महत्त्वाकांक्षेला तडा गेला नाही,कारण अशा एक - दोन पराभवांनी खचणाऱ्या पैकी महादजी शिंदे नव्हते,स्वत:च्या कर्तबगारीवर व कर्तृत्वावर त्यांचा ठाम विश्वास होता,
संपूर्ण राजपुतान्यावर महादजींचे वर्चस्व प्रस्थापित झाले, गुलाम कादर व त्याच्या साथीदारांचे पारिपत्य केल्यामुळे रोहिलखंडातील रोहिल्यांची हड्डी नरम झाली, महादजींनी शिख,जाट आणि पठाणांशी बोलणी करून सतलज नदीपर्यंत महादजींची सत्ता व वर्चस्व मान्य करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आणि त्यांनी त्याला उत्स्फूर्तपणे होकार दिला. महादजींची सत्ता सतलजच्या तीराला जाऊन भिडली,पानिपतच्या रणसंग्रामानंतर पुन्हा एकदा महादजी शिंदेंनी पंजाब प्रांतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले,उत्तर हिंदुस्थानातील महादजी शिंदेंची वर्चस्वसीमा थेट सतलजच्या तीराला जाऊन भिडली . पानिपतच्या दारुण पराभवाचा कलंक रणझुंझार महादजींनी सतलजच्या पाण्याने धुऊन काढला,
संदर्भ- मराठी रियासत- सरदेसाई
द ग्रेट मराठा - एन जी राठोड
अलीजह बहाद्दर महादजी शिंदे-पी एन शिंदे

No comments:
Post a Comment