शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती राजाराम महाराज हे श्रीशिवछत्रपतींचे द्वितीय चिरंजीव. त्यांना त्यांच्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आधी पित्याचे आणि वर्षभरातच आईचे छत्र गमवावे लागले. ध्यानी मनी नसताना अचानक छत्रपतीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. आणि येथून त्यांची कारकीर्द सुरू झाली.
तारीख-ए-महंमदी या समकालीन फारसी ग्रंथाचा लेखक छत्रपती राजारामांचा उल्लेख ‘कार्रोफर नमुदा’ (फारसी भाषेतील अर्थ 'बेडर हल्ले करणारा') असे करतो यातून छत्रपती राजाराम महाराजांची कर्तबगारी अधिक स्पष्ट होते, असे मला वाटते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांच्या “मराठी सत्तेचा उदय” या मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात ते म्हणतात,
“आपल्या थोर वडिलांच्या अनेक श्रेष्ठ गुणांचा वारसा राजाराम यांचेकडे आलेला आढळतो. त्यांचे धाडस, त्यांचे कौशल्य, त्यांचे व्यसनांपासून मुक्त असणे, त्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेला सहजभाव आणि स्वभावातील सौम्यता हे तर त्यांच्यात आहेतच, पण सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे आपल्या देशबांधवांच्या मनात आत्मविश्वास आणि विजिगीषुवृत्ती निर्माण करण्याची क्षमता हा होय.”
राजाराम महाराजांच्या कार्यकाळात छत्रपती या नात्याने त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांविषयी बरेच मतभेद आहेत. त्यातला सर्वात वादग्रस्त धोरणात्मक निर्णय होता, शिवछत्रपतींनी बंद केलेली वतनदारी पुनरुज्जीवित करण्याचा. या धोरणामुळे मोगलांच्या पदरी असणारी अनेक फौजबंद सरदार मंडळी राजाराम महाराजांजवळ जमा झाली. त्यांना त्यांनी सर्व मोगलांच्या ताब्यातील भूभागावर आक्रमण करून तो भाग आपल्या राज्याला जोडल्यास त्याचे वसुलीचे हक्क देऊ, अशा सनदा दिल्या. पण ते सर्व केवळ
वतनाची हाव असल्याने आलेले होते असे मानून,
मोगलांकडून परत येणाऱ्या या मराठी सरदारांच्या
निष्ठेबद्दल सतत संशय व्यक्त करून हे धोरण योग्य होते का, आवश्यक होते का, त्याचे विपरीत परिणाम झाले का, असे अनेक प्रश्न नंतर निर्माण करून त्याबद्दल मतभेद व्यक्त केले गेलेले आहेत.
रियासतकार सरदेसाई लिहितात, “मोगल बादशाहा स्वत: मराठा सरदारांना जमिनीची वतनदारी देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करत होता. मराठी राज्यकर्त्यांनी तसेच केले नसते तर मोगलांशी युद्ध करण्यासाठी आवश्यक सैन्य उभारणे त्यांना शक्य झाले नसते.”
असा हा मराठा साम्राज्याच्या तिसऱ्या छत्रपतीच्या कारकिर्दीचा अत्यंत रोमहर्षक, अभिमानास्पद परंतु काही कारणांनी ‘अलक्षित’ राहिलेला इतिहास आहे.
- डॉ. प्रमिला द्वारकानाथ जरग, शिवपुत्र राजाराम
@maratha_riyasat ©
No comments:
Post a Comment