विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 July 2021

सावंतवाडी संस्थान.... भाग 3

 




सावंतवाडी संस्थान....

भाग 3
तेव्हां अज्ञान मुलगा (चवथा) खेम सावंत गादीवर आला.
हा सावंत सज्ञान झाल्यावर देखील राज्यकारभार नीट चालवीना, संस्थानांत बंडाळ्या होऊं लागल्या व एकंदर फार अनास्था माजली. तेव्हां इंग्रज सरकारनें से. १८३८ मध्यें राजघराण्यांत लायख पुरुष होईपर्यंत राज्यकारभार पोलिटिकल सुपरिंटेंडेंटमार्फत स्वतः पहाण्याचें ठरविलें. १८४४ मध्यें प्रसिद्ध फोंड सावंताचें बंड उद्भवलें त्यांत प्रत्यक्ष युवराज फोंड सावंत उर्फ आबासाहेब सामील होता. लवकरच हें बंड मोडलें व संस्थानांत बर्याच सुधारणा घडून आल्या. स. १८६७ मध्यें खेम सावंत निवर्तून त्याचा मुलगा फोंड सावंत नांवाचा गादीवर आला. हा दीड वर्षांतच वारल्यानंतर त्याचा मुलगा रघुनाथ सावंत उर्फ बाबासाहेब गादीवर बसला. यास बडोद्याच्या जमनाबाईसाहेबांची कन्या ताराराजे ही दिली होती. १८९९ मध्यें बाबासाहेब मृत्यु पावला व त्याचा चुलत भाऊ श्रीराम गादीवर आला. याच्या राज्याभिषेकाच्या वेळीं असा ठराव झाला होता कीं, पोलि. सुपरिटेंडेंटनें पोलि. एजंट या हुद्द्यानें संस्थानिक राजेबहाद्दरच्या नांवानें सर्व कारभार पहावा. स. १९०९ पासून हा सावंत पागा, देवस्थान व दरबार यांचीं कामें पूर्ण मुखत्यारीनें पाही. हा १९१३ मध्यें वारला. त्यावेळीं युवराज बापूसाहेब (प्रस्तुतचे राजे) अल्पवयस्क होते. यांचे शिक्षण इंग्लंडांत झालें असून गेल्या महायुद्धांत यांनीं मेसापोटेमियांत चांगली मर्दुमकी गाजविल्यामुळें यांनां 'हिज हायनेस' व कॅप्टन या पदव्या मिळाल्या. १९२४ सालच्या आक्टोबर महिन्यांत (ता. २९) बापूसाहेबांच्या हातीं (८६ वर्षे आपल्याकडे घेतलेलीं) सर्व सूत्रे इंग्रजसरकारनें दिलीं.
गांव :
सावंतवाडी संस्थानची राजधानी. ही वेंगुर्ल्यापासून १७ मैल आहे. सावंतवाडीस सुंदरवाडी म्हणतात. याची लोकसंख्या १९०१ सालीं १०२१३ होती. १६७० सालीं कोणी फोंड सावंतानें हें शहर वसविलें असें म्हणतात. गावांजवळच मोतीतलाव आहे. त्यानें ३१ एकर जमीन व्यापिली आहे. तलावजवळ पडक्या स्थितींत एक किल्ला आढळतो. १९०४ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. स. १८९५ मध्यें पाण्याचा चांगला पुरवठा करून नळांनीं शहरभर पाणी खेळविलें आहे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...