तानाजी मालुसरे ,पिलाजी नीलकंठराव आणि सूर्याजी सुर्वे यांचा अपराचीत इतिहास
अफजलखान वधानंतर शिवाजीमहाराजांनी कोकणात प्रवेश केला होता.
दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ “तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालू जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,’. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.
तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ “या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या पराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले,तू त्यांचा सरदार असतांनाहि सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही….” असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.
तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या संरक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रूची तुकडी घायाळ झाली आणि याचा फायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रूची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रूच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच ताने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला. (शिवभारत अध्याय ३० श्लोक ३५ ते ४६)
तेव्हा त्याच्याआज्ञेने द्विज नीळकंठ राजाचा पुत्र निरनिराळ्या युद्धातप्रसिद्धीस आलेला पायदळाचा अधिपती तानाजी मालुसरे याच्या बरोबर शत्रूच्या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेल्या संगमेश्वरास आला (शिवभारत अध्याय २९ श्लोक ८१-८२)
यानंतरचा महत्वपूर्ण उल्लेख सापडतो तो १६६१ चा चिपळूण आणि संगमेश्वर ताब्यात येताच पिलाजी नीळकंठराव संगमेश्वर मुक्कामी महाराजांना भेटायला आले. शिवाजी महाराजांनी त्यांना तानाजी मालुसरे यांच्या सोबत स्वराज्याच्या मर्जीत राहून काम करण्यास सांगितले. तानाजी मालुसरे व इतर वीरांना संगमेश्वर येथील रस्ते दुरूस्तीची कामे सांगितल्याचा एक महत्वपूर्ण उल्लेख आढळतो.
शिवाजीने दूर्गम मार्ग साफसूफ करण्याच्या ईच्छेने संगमेश्वरी ठेवलेले ते सैन्य आपले सैन्य घेऊन सत्वर वेढले. (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक क्र ३८)
पुष्कळ पायदळाच्या साह्याने शिवाजीचे मोठे सैन्य मध्यरात्री वेढून दुर्दैवाने लढूं इच्छिणारा तो सूर्याजीवर पुष्कळ वेळ मेघाप्रमाणे गर्जना करू लागला (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ३९)
गरूड जसा नागांचा फूत्कार सहन करत नाही, तशी प्रचंडपणे कानी पडलेली ती गर्जना त्या समयी तानाजीप्रभ्रुती योद्ध्यांनी सहन केली नाही (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ४०)
तेव्हा अतिशय भ्यालेला नीळकंठ राजाचा पूत्र जो हतभागी पिलाजी त्याने प्रभावलीच्या राजास जणू काय यश देण्यासाठीच लढण्यापेक्षा पळणेच अधिक पसंत केले. (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ४१)
कापरे भरलेल्या अतिशय धापा टाकणा-या हातातील तरवार खाली टाकून पळत सुटलेल्या अशा त्या पिलाजीस ताबडतोब कित्येक पावले जाऊन मालूस-याने स्वतः हातात धरले व त्याचा उघड धिक्कार केला (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ४२)
मालूसरे म्हणाला, “या युद्धात मी तूझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांस टाकून पळत सुटला आहेस ही खेदाची गोष्ट आहे. पूर्वी तू ज्या बढाया मारत होतास त्या तूझ्या बढाया, हे सेनापते कुठे गेल्या? (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ४३)
अभिष्टदात्या शिवाजीने ज्या तूला मोठेपणा देऊन तूला पाळले तो तू सेनापती आज सैन्य टाकून पळून जात आहेस? आणि अरे त्याची तूला खंतही वाटत नाही! (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ४४)
असे बोलून त्या घाबरलेल्या पिलाजीस आपल्या सन्निध दोरखंडास पक्के बांधून ठेवून तेथे लगेच आपले शौर्य शूरास पदोपदी दाखवीत नाचू लागला. (श्रीशिवभारत अध्याय ३० श्लोक ४५)
ठार केलेल्या शत्रूकडील विरांच्या रक्ताचे पाट वाहावयास लावणारा व प्रचूरयूद्धशोभारूपी सुंदरीच्या कानातील अलंकार असा तो तानाजी मालुसरेयुद्धात चमकू लागला व त्याच्या तेजाने त्या रात्री सूर्य उत्पन्न झाला. (श्रीशिवभारत अध्याय३० श्लोक ४६)
तानाजी मालुसरे यांचा हा पराक्रम पाहून खुद्द शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचा सन्मान केल्याचा उल्लेख आपल्याला पहायला मिळतो
ज्याने मोठ्या पराक्रमाने शत्रूचे सैन्य पराभूत केले, असा तो तानाजी आल्याने नीळकंठराजाच्या पुत्राने जवळ जाऊन कळविले असता वंदन करणा-या त्या मानधन तानाजीस पाहून राजाने त्याचा सैन्यासह मोठ्या कृपेने सन्मान केला. (श्रीशिवभारत अध्याय ३१, श्लोक २-३)
No comments:
Post a Comment