विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

महाराष्ट्राची कुळकथा

 

-

महाराष्ट्राची कुळकथा
- राज जाधव

#मध्याश्मयुगात झपाट्याने झालेली लोकसंख्येची वाढ शेतीची सुरूवात होण्यास कारणीभूत झाली. विशिष्ट भौगोलिक मर्यादेत उपलब्ध असणाऱ्या ठराविक अन्नसाधानांवर अवलंबून असणारी माणसे वाढली. त्यामुळे कृत्रिम मार्गांनी अन्नपुरवठा वाढविणे अपरिहार्य झाले आसावे. आणि ते शेतेचा अवलंब करूनच शक्य होते. जमिनीवर पडलेले बी पुढील हंगामात जमिनीतून पुन्हा उगवते हे मानवाच्या नजरेत आले असणारच. त्याला नुसते निसर्गाचे अनुकरण केले म्हणजे पुरे होते. महाराष्ट्रात अन्नधान्यांचे शेतीद्वारा उत्पादन करण्यास साधारणपणे चार हजार वर्षांपूर्वी सुरूवात झाली असे तापीच्या खोऱ्यातील (जि. धुळे) पुराव्यावरून म्हणता येईल.
#इ.स.पू. १७०० च्या सुमारास माळव्यामधील आद्य शेतकऱ्यांनी खानदेशात स्थलांतर केले. ते पुढे गोदावरी आणि भिमेच्या खोऱ्यातही येऊन पोचले. तापीच्या खोऱ्यात त्यांच्या वसाहतींचे अधिकांश केंद्रीकरण झालेले दिसते. त्यामानाने प्रवरा-गोदावरीच्या खोऱ्यांत ते उणावलेले, तर भिमेच्या खोऱ्यात तुरळक आढळते. यातील बहुसंख्य वसाहती म्हणजे १००-२०० च्या आसपास लोकसंख्या असलेली छोटी परंतु स्वावलंबी अशी खेडी होती. या छोट्या छोट्या खेड्यांना जोडणारे एक मोठे प्रादेशिक केंद्र असे. उदाहारणार्थ, तापीच्या खोऱ्यातील प्रकाशे (जि. धुळे), गोदावरीच्या खोऱ्यातील दायमाबाद (जि. अहमदनगर), भिमेच्या खोऱ्यातील इनामगांव ( जि. पुणे), या प्रादेशिक केंद्राची लोकसंख्या १००० किंवा त्याहून अधिक होती.
#अहमदनगर जिल्ह्यात जोर्वे गावा नजिक प्रथम उजेडात आली म्हणून जोर्वे या नावाने ओळखली जाणारी नवीनच संस्कृती महाराष्ट्रात साधारणपणे इ.स.पू. १४०० च्या सुमारास उदयास आली. पूर्वीच्या संस्कृती प्रमाणेच या संस्कृतीचे लोकही त्यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण रंगीत भांडी, गारांची हत्यारे आणि तांब्याचे दागिने व हत्यारे इत्यादीचा वापर करीत. अर्थातच तांबे दुर्मिळ असल्यामुळे त्याचा वापर फार जपून केला जाई. कोकणचा सागरकिनारा व विदर्भातील काही प्रदेश सोडला तर जोर्वे संस्कृतीच्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वसाहती स्थापन केल्याचा पुरावा आहे. शेती, पशूपालन, शिकार व मासेमारी यांवर अवलंबून असलेली मिश्र अशी त्यांची अर्थव्यवस्था होती. पुण्याजवळील इनामगांव येथे मिळलेल्या पुराव्याद्वारे असे दिसते की या लोकांनी कालव्याद्वारे कृत्रिम पाणीपुरवठा करण्याची सोय केलेली होती. व त्यामुळे ते वर्षांतून दोनदा, अदलून बदलून पीक देखील घेत असत...
#जोर्वे संस्कृतीचे लोक मोठ्या चौकोनी घरात रहात. घराच्या भिंती कुडाच्या असत व छप्पर गवताने शाकारलेले असे. घरांमध्ये कणग्या व बलदांमधून धान्य साठवीत. घरात हल्लीसारख्या चुलीवर अन्न शिजवीत. घराबाहेरील अंगणात मोठा खड्डा करून त्यामध्ये जनावराचे मांस भाजीत. सुफलनाच्या संकल्पनेशी निगडित अशी त्यांची एक मातृदेवता होती. तसेच एक शिरोहीन देवता होती. तिचा कदाचित संततीच्या कल्याणशी संबंध असावा. त्यांची पुरूषदैवतेही होती. मरणोत्तर जीवनावर त्यांची श्रद्धा होती व म्हणून ते मृताला स्वतःच्या घरातच जमिनीखाली पुरत असत. लहान मुलाच्या मृत्युनंतर दोन मोठे कुंभ तोंडाला लावून ठेवीत. त्यात लहान मुलांना पुरले जाई. प्रौढ माणसाला मात्र उत्तरेकडे डोके करून उताणे पुरले जाई. दफनविधी पूर्ण होण्याअगोदर मृत व्यक्तिंची पावले घोट्यापासून तोडली जात. कदाचीत मृत व्यक्ती पळून जाऊन त्याचे भूत बनू नये हा या कृतीमागचा उद्देश असावा.
#ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचे नियंत्रण करणारे प्रमुख इ,स.पू. १२०० च्या आसपास पुढे आले. अशा एका प्रमुखाचे घर इनामगांव येथील उत्खननात उजेडात आले आहे. त्याच्या घराच्या बाजूस एक सार्वजनिक कोठार होते. या कोठारात दुष्काळात उपयोगी यावे म्हणून धान्य साठविले जाई. ते बहुधा लोकांकडून कर म्हणून गोळा केलेले असावे. खंदक खणणे, संरक्षणासाठी तटबंदी उभारणे, पाणी पुरवठ्यासाठी कालवे खोदणे व बांध घालणे इनामगांव येथील पुराव्यावरून व यासाठी श्रमणाऱ्यांची व्यवस्था करणे अशी सार्वजनिक जबाबदारी प्रमुखाचीच असे. शेतीच्या पाण्याचे वाटपही तोच करीत असावा.
अशा आद्य शेतकर्यांच्या वसाहती जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत भरभराटीला आल्या. परंतु इ.स.पू. च्या दुसऱ्या सहस्त्रकाच्या अखेरीस या वसाहतींमधील संपूर्ण जीवन अगदी संपुष्टात येत असलेले आपल्याला दिसते. या सर्वांचा परिणाम म्हणून तापी, प्रवरा, गोदावरी या नद्याच्या खोऱ्यातील ताम्रपाषाणयुगीन वसाहती उजाड झाल्या. भिमेच्या खोऱ्यातील लोक मात्र कसेबसे तग धरून राहिले. त्यांनी बांधलेल्या गोल झोपड्या व निकृष्ट दर्जाची भांडी होती असे दिसते. तसेच शेतीचे प्रमाणही अतिशय कमी झाले व लोकांना अन्नासाठी शिकारीवरच अधिकाधिक अवलंबून रहाण्याची वेळ आली. अशा रीतीने जीवनमान इतके खालावले की त्यांच्या जीवनास निमभटके स्वरूप प्राप्त झाले. इ.स.पू. ७०० पर्यंत त्यांनाही वसाहतस्थळे सोडून द्यावी लागली.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...