विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

कर्नाटक मोहिम आणि शिवाजी राजे आणि एकोजी राजे


 

कर्नाटक मोहिमेवर असता महाराजांनी ९ मे रोजी ५००० स्वार कांचीवरवरून जिंजीवर रवाना केले. त्यानंतर स्वारी कावेरी तिरावर मुक्कामास आली तिथून त्यांनी आपला सावत्र भाऊ एकोजीराजे यांस पत्रे लिहिली. तेव्हा महाराजांच्या भेटीस एकोजीराजे यांनी आपल्यातर्फे काही पोक्त लोक पाठविले. या मंडळीशी महाराजांनी व्यवहाराची योग्यतीच बोलणी केली. “कैलासवासी शहाजी महाराजांच्या कष्टाच्या धनदौलतीत जसा एकोजीराजांचा वाटा आहे तसाच आपलाही वाटा आहे. तेव्हा अर्धावाटा बऱ्या बोलाने द्या” असे महाराजांनी सांगून पाठविले. आणि हा निरोप त्यांनी एकोजीराजांची जी माणसे भेटावयास आली त्याज बरोबर एकोजीराजांच्या भेटीस आपलेकडील थोर माणसे, बाळंभट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी अशी तिघेजण पाठविले. त्याजबरोबर महाराजांनी एकोजी राजांस पत्र दिले व त्यात लिहिले की शहाजी राजांच्या जहागिरीचा अर्धा वाटा एकोजी राजे यानी संभाजी (शिवरायांचे बंधू) पुत्र उमाजी यास द्यावयास हवा आणि त्यांना आपल्या भेटीस बोलाविले. शिवाजी महाराजांचा मुक्काम तिरूमल वाडी येथे जुलै १६७७ पासून होता. तिथे एकोजी राजे दोन हजार स्वार घेऊन भेटण्याकरिता आले. मुकामावर आल्यानंतर भेटी जहाल्या. नित्य एकेताटी भोजन एकांती बसोन भाषण वाद जाले, आठवडा झाला. दिनांक २० जुलै ते २७ जुलै तरी खुलासवार बोलणे काहीच न करता मनात कुढत राहिले व छत्रपती शिवाजी महाराज आपणास अटक करतील अशी भीती वाटून एके दिवशी रात्री गुप्तपणे कावेरी नदीत तराफ्यावर चढून पुरांतून पलीकडे तंजावरास निघून गेले. शिवाजी महाराजांस ही बातमी समजतांच वाईट वाटले. एकोजी राजांचे कारभारी शामजी नाईक कान्हेरपंत व शिवाजी शंकर हे महाराजांचे छावणीत होते. त्यांस वस्त्रे भूषणे देऊन रवाना केले व एकोजीरावांस सांगून पाठविले की “तुम्ही व आम्ही वाटे करून घेऊन
परस्परे समाधाने राहू. ” पण यावर काही उपयोग झाला नाही. मात्र महाराजांचे एक सापत्न बंधू संताजीराजे भोसले हे महाराजांना येऊन मिळाले. महाराजांनी त्यांना हजार स्वाराची सरदारी देऊन फौजेत ठेविले. शिवाजी महाराजांनी दौलतीचा हिस्सा मागितल्यावर एकोजी राजे
यांनी प्रत्यक्ष भेटीत न बोलता आपला मनोदय आपल्या माणसांकरवी महाराजांस ऐकविला. वडील असता शिवाजी महाराजांनी बंडपणा पातशहापाशी केला. तमाम मुलूख घेतला, त्यामुळे वडिलांस कित्येक प्रकारे इजा झाली. आम्ही वडिलांजवळ तंत्र देऊन राहिलो, त्यामुळे बादशहाची दौलत रक्षिली गेली. वाटा देणे ही वतनदारी तरी नाहीच. वतन बाब असेल त्याचा वाटा घ्यावा. चाकरीची दौलत सर्व विजापूरचे शहाची, आम्ही शहाचे चाकर. त्यांचे हुकूमाचे मालक, यांत तुमचा संबंध नाही. अशा प्रकारे पत्र लिहिण्यास मदुरा व म्हैसूर नायकांनी व मुसलमान सल्लागारांनी एकोजीराजांस भाग पाडले. एकोजीराजे यांनी जे महाराजांस लिहिले त्याची प्रत विजापूर दरबारास त्याची संमती मिळण्यासाठी पाठविली. विजापूर दरबारने एकोजीस सबुरीचा सल्ला दिला. दरम्यान मुक्काम हालवून महाराजांची स्वारी वलिगुंडपुरमुला आली तिथून त्यांनी रघुनाथ पंतास मदुरेच्या नायकाबरोबर तह करण्यास रवाना केले. त्यांनी ६ लक्ष होनांचा करार करून महाराजांनी आपले सैन्य परत घ्यावे असे ठरले. तद्नंतर महाराजांनी मुक्काम हलवून वलिगड पुराहून तुंदम गुत्तीला (तोरगड) २७ जुलैस आले. तेथे महाराजांस असे समजले की एकोजीराजे मुसलमान लोकांच्या नादी लागून शिवाजी महाराजांशी झगड करावा या हेतूने महाराजांवर सैन्य पाठवीत आहे. हे ऐकताच महाराजांनी जनार्दन पंतास सैन्य देऊन एकोजीच्या सैन्याशी सामना देण्यास पाठविले. दोन्ही सैन्याचा थोर झगडा झाला.एकोजीराजांचे लोक पराजय पावले, कित्येक मारिले गेले, कित्येक पळून गेले. अशा रीतीने वलिगुंड पुरच्या लढाईत एकोजीराजेंच्या सैन्याची दाणादण उडाली. तरी देखील एकोजीराजे सलोख्यास तयार झाले नाहीत हे महाराजांच्या लक्षात आल्यावर महाराजांनी शहाजीराजांची बंगळूर, होसपेट, सिरे वगैरे ठाणी व त्याशेजारची राज्ये जिंकून घेतली. महाराजांचा हा पराक्रम पाहून एकोजीराजांस सुबुद्धी सुचली. त्यांनी शिवाजी महाराजांचे कर्नाटकातील मुख्य कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांच्या मार्फत महाराजांशी बोलणी लाविली. त्यास यश येऊन भावाभावांमध्ये समजुतीचा तह झाला. महाराजांनी एकोजीराजांस त्याचा बहुतेक मुलूख व थोडा अधिकच त्याचेकडे लावून दिला आणि एकोजीराजांबरोबरचे भांडणे मिटविले. महाराजांनी कर्नाटक प्रांत जिंकल्यावर कर्नाटकांतील शहाजीराजांच्या जहागिरीपैकी दोन लाख उत्पन्नाचा प्रदेश भावजयीला चोळी बांगडीसाठी आणि जिंजीप्रातां पैकी सात लाख होनांचे महाल एकोजीराजांस दूधभातासाठी म्हणून लावून दिले. अशारीतीने घरगुतीसंबंध महाराजांनी सांभाळले व मे महिन्यांत (१६७८) उर्वरित कामगिरी सरदारांवर सोपवून ते रायगडी परतले. महाराजांनी एकोजीराजांस धीर देण्यासाठी एक पत्र लिहिले आणि सांगितले की पुरुषार्थ आणि कीर्ती करून दाखविण्याचे हे दिवस आहेत त्याप्रमाणे वागावे. महाराजांच्या कर्नाटक स्वारीत रघुनाथ नारायण हणमंते महाराजांच्या सेवेस बरोबर होते. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांताचा बंदोबस्त रघुनाथ हणमंते यांनी केला. महाराजांनी त्यास दसऱ्याच्या सुमारास (२६ सप्टेंबर १६७७) दक्षिणची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार दिले आणि त्याजवर कर्नाटकातील सर्व व्यवहार सोपवून महाराज इ. स. १६७८ च्या मे-जून मध्ये रायगडास परत आले. दक्षिण दिग्विजयामुळे स्वराज्याची हद्द दक्षिण समुद्राला मिळाली. कुतुबशाही नमली. अपार संपत्ती मिळाली. दक्षिणेकडे हिंदवी सत्तेचे पुनरुज्जीवन झाले. वेलूर आणि जिंजीमुळे स्वराज्य बळकट झाले. मराठ्यांच्या मर्दुमकीला नवे कार्यक्षेत्र मिळाले.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...