चंद्रपूर शहराचा संस्थापक गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह याची बल्लारपूर येथील समाधी
गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह (१४७२-१४९७) याने चंद्रपूर किल्याची पर्यायाने राजधानीचीही मुहूर्तमेढ रोवली. बल्लारपूर (किंवा बल्लारशा) शहरास त्याचे नाव राजा खांडक्या बल्लाळ शाह मूळे प्राप्त झाले असा समज आहे, परंतु वास्तविकतः गोंड राजा आदिया बल्लाळ सिंह (१३२२-१३४७) हा या शहराचा निर्माता असून त्यानेच गोंड राज्याची राजधानी तेलंगाणातील सिरपूर येथून हलवून बल्लारपूर येथे आणली.
लहानपणापासून अंगांगावर फोड व डाग असल्याने त्याला उपहासाने 'खांडक्या' म्हटले जाऊ लागले. सुदैवाने राजाला राणी हिरातानीच्या रूपात बुद्धिमान व सुलक्षणी पत्नी मिळाली. तिने राजाची पुरेपूर काळजी घेतली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून राणीने राजास शिकारीच्या निमित्ताने जंगलात फेरफटका मारण्यास सुचविले. बल्लारपूर पासून १० किमी दूर जंगलात जुनोना येथे विस्तीर्ण तलाव खोदून त्याच्या काठावर जलमहाल बांधून घेतला. शिकारीदरम्यान थकवा आल्यास राजा या जलमहालात विश्राम करीत असे. उन्हाळ्यातील अश्याच एका शिकारीदरम्यान वाट चुकून राजा एका पाण्याच्या स्रोताजवळ आला, तिथले थंडगार पाणी पिल्याने राजाची तहान तर भागलीच, परंतु त्या पाण्याने अंग धुतल्याने राजाच्या अंगावरील कोड सुद्धा कमी झाले. या जागेचे अलौकिक महत्व ओळखून राणी हिरातानीने राजाकरवी त्या जागेवर एक भव्य मंदिर बांधून घेतले. ते मंदिर म्हणजेच झरपट नदीकाठचे चंद्रपूरचे प्रसिद्ध 'अंचलेश्वर मंदिर'.
अश्याच एका विस्मयकारी प्रसंगातील दैवी संकेत ओळखून राणीने राजास चंद्रपूर किल्ल्याची उभारणी करण्याचे सूचित केले. त्यामूळेच जवळपास १२ किमी लांबीची विस्तृत तटबंदी असलेल्या चंद्रपूर किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. कालांतराने राज्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद्रपूरला हलविण्यात आली.
बल्लारपूर शहराच्या पूर्वेस सिरोंचा-अल्लापल्ली रस्त्याच्या उजव्या बाजूस, बल्लारपूर शहराच्या टोकाकडील विरळ लोकवस्तीच्या भागात खांडक्या बल्लाळ शाहची समाधी आहे. इस्लामी पद्धतीचे भव्य घुमट असलेल्या या समाधीला स्थानिक लोक 'खर्जीचे मंदिर' म्हणतात. दुर्दैवाने या शहरातील बऱ्याच रहिवाश्यांना याची माहितीसुद्धा नाही. त्यामुळे बरीच वर्षे ही समाधी गर्द काटेरी झाडीझुडुपांत गुडूप झाली होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी छुप्या संपत्तीच्या आशेने समाधीच्या आतील भाग उद्ध्वस्त केला होता. सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने श्री. बंडू धोत्रे यांच्या इको प्रो संस्थेच्या सहाय्याने समाधीची व परिसराची स्वच्छता केल्याने या समाधीस पूर्ववत देखणे रूप प्राप्त झाले आहे. राजाच्या समाधीसमोरच राणी हिरातानीची चौथ-याच्या स्वरूपातील समाधी आहे. राजाच्या समाधीजवळील दगडावर एकूण ८४ पावलांचे ठसे कोरलेले आहेत. हे ठसे त्याच्या समाधीवर सती गेलेल्या ४२ पत्नींच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरले गेले आहेत असा समज आहे. येथे समोरच एक देखणी पायऱ्यांची विहीर (बारव) सुद्धा आहे.
खांडक्या बल्लाळ शाहच्या समाधीच्या डाव्या बाजूलाच एक अत्यंत साध्या धाटणीची दुसरी एक समाधी आहे. ती समाधी याच गोंड राजवटीतल्या शेवटच्या निळकंठ शहा (१७३५-१७५१) या राजाची आहे. इ.स. १७५१ मध्ये त्याला नागपूरचे भोसले राजे रघुजी (पहिले) यांनी तुरुंगात टाकले आणि कैदेतच त्याचे निधन झाले. इतिहासाच्या विचित्र विडंबनांपैकी एक असे हे दृश्य येथे दिसते. ज्यात चंद्रपूरचा थोर संस्थापक आणि त्याच्या अधोगतीचा साक्षीदार, ज्याच्या कारकिर्दीत गोंड राजवटीचा अस्त झाला हे दोन्ही एकमेकांच्या बाजूलाच चिरनिद्रेत पहुडले आहेत. इतर गोंड राजवटी आधीच लयाला गेल्या होत्या, त्या मानाने चांदाची गोंड राजवट बराच काळ टिकली. चांदाच्या गोंड राज्याला कुशल व बुद्धिमान शासकांचा मोठा वारसा मिळालेला होता, व इतर राज्यांना ग्रासलेल्या अंतर्गत कलह आणि षड्यंत्रांच्या नैसर्गिक प्रलोभनांचा प्रतिकार करीत हे राज्य जवळपास पाच शतके आपला नावलौकिक टिकवू शकले.
(लेखन व संपादन - अमित भगत)
No comments:
Post a Comment