विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

कुलाबा जिल्हाच्या इतिहास



 कुलाबा जिल्हाच्या इतिहास

इतिहास- कुलाबा जिल्ह्यावर आतांपर्यंत पुष्कळ निरनिराळीं राज्यें झालीं. प्राचीन काळीं कुलाब्यावर छोटेसंस्थानिक राज्य करीत असत. ख्रिस्ती शक सुरू होण्याच्या सुमारास व त्यानंतर आंध्रवंशीय राजांनीं कुलाब्यावर आपली सत्ता बसविली. हे राजे सर्व कोंकणपट्टीवर व दख्खनवर आपला अंमल चालवीत होतें. सुमारें ख्रिस्ती शकाच्या १५० च्या सुमारास ग्रीक भूगोलवेत्ता टॉलेमी हा हिंदुस्थानांत आला होता. त्यानें त्यावेळीं आंध्रवंशीय राजे कुलाब्यावर अगर त्यावेळचे ‘चौल’ यावर राज्य करीत असत असें म्हटलें आहे. सहाव्या शतकांत, चालुक्य राजांनीं कुलाबा व उत्तरकोंकण या भागांवर आपली सत्ता प्रस्थापि केली. पुढें तेराव्या शतकांत देवगिरीच्या यादवांचे राज्य या प्रदेशावर सुरू झालें. १३४७-१४८९ या अवधींत बहामनी राजांनी कुलाबा जिल्ह्यांतील चौल वगैरे ठिकाणे जिंकून आपल्या ताब्यांत आणलीं. नंतर गुजराथच्या राजांनीं या प्रदेशावर आपलें वर्चस्व बसविलें. १५०७-१६६० या अवधींत पोर्तुगीज लोकांचेहि राज्य या जिल्ह्यांवर सुरू झालें. याच वेळीं कुलाबा जिल्ह्यांतील बराचसा मुलुख मुसुलमानांनीं बळकावला होता. पुढें १६३२ सालीं शहाजीराजे भोसले यांनीं मोंगलांनां हांकून लावून हा मुलूख आपल्या ताब्यांत आणला. शिवाजी महाराजांनी या जिल्ह्यांतील घोसाळें व रायगड येथें मजबूत किल्ले बांधले. सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथील किल्ल्यांची दुरुस्ती केली व रायगड हें राजधानींचे ठिकाण केलें. १६८० मध्यें शिवाजी महाराज वारल्यानंतर हा जिल्हा पुन्हां मोंगलांच्या ताब्यांत गेला. पुढें १६९० सालीं आंग्रे यांनीं तो प्रदेश मुसुलमानांपासून बळकावून घेतला (आंग्रे पहा). कान्होजी आंग्रे हा अत्यंत शूर होता. त्यानें शाहू, जंजीर्याचा शिद्दी, ब्रिटिश लोक यांपासून मोठ्या शौर्यानें आपल्या प्रदेशाचें रक्षण केलें. पण इ. स. १७३१ मध्यें कान्होजी मरण पावल्यानंतर त्याच्या दोघा मुलांत कलह माजले. त्यामुळे आंगर्याच्या सत्तेला उतरती कळा लागण्याला सुरुवात झाली. कान्होजीचा ज्येष्ठ पुत्र संभोजी हा शूर व धाडसी होता. त्यानंतर त्याचा मुलगा तुळाजी हा गादीवर बसला. याच्या कारकीर्दीत १७५८ मध्यें ब्रिटिशांनीं विजयदुर्ग किल्ला जिंकू घेतला. पुढें हा किल्ला ब्रिटिशांनीं पेशव्यांनां दिला. १८१८ सालीं पेशवाईचा र्हास झाल्यावर ब्रिटिशांकडे कुलाबा आला व आंग्रे हे ब्रिटिशांचे मांडलीक बनले. १८४० मध्यें दुसरा कान्होजी वारल्यानंतर कुलाबा जिल्हा मुंब सरकारनें आपल्या राज्यास जोडून घेतला, तेव्हांपासून आतांपर्यंत तो त्याच्याकडे तसाच चालू आहे.
ऐतिहासिक स्थळें— या जिल्ह्यांत पालें, कोलें, कुडें, कोंडाणें, अंबिवलि या ठिकाणीं बौद्धांचीं लेणीं आहेत. घारापुरी येथील "एलीफंटा" लेणीं ब्राह्मणी आहेत. पोर्तुगीज लोकांनीं या जिल्ह्यांत पुष्कळ प्रार्थनामंदिरें व किल्ले बांधले आहेत. शिवाय मराठ्यांनींहि व आंग्र्यांनींहि पुष्कळ किल्ले बांधविलें. त्यांपैकीं रायगड, कुलाबा, बीरवाडी, लिंगाणें, खांदेरी व उंदेरी इत्यादि प्रमुख किल्ले आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...