विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

कुडाळदेशकर ब्राह्मण

 


कुडाळदेशकर ब्राह्मण- 
यांचें दुसरें नांव आद्यगौड ब्राह्मण असें आहे. मूलत: हे उत्तरेकडील असून कोंकणांत केव्हां व कसे आले याबद्दल जी माहिती मिळते ती पुढें दिल्याप्रमाणे:-

महंमुद गिझनीकरानें उत्तरहिंदुस्थानांत स्वार्‍या करून धुमाकूळ घातला. त्या सुमारास (इ. स. १०१७) गंगा किनार्‍याच्या प्रदेशावर गोडेश्वरपाल राजांचें साम्राज्य होतें. त्यांच्या मांडलिकांत गंगाकिनार्‍यालगतच्या भागांत ‘सामंत’ नांवाचे एक ब्राह्मण संस्थानिक होते. यांच्या राज्याची वाताहत महंमुदाच्या वेळीं झाल्यामुळें हें घराणें तेथून निघून दक्षिणेस कोकणांत

(१) शके १३१७ चा मठगांवचा शिलालेख. (२) नागदेव सामंत याची मुद्रा व लेखनावधि. (३) भानजी प्रभु सरदेसाई यांची मुद्रा. (४) वालावली येथील श्रीनारायणदेव याची मुद्रा. (५) भानजी प्रभु याची मोडी सही (पृष्ठ ५२८-५३२).

सध्यांच्या देवगड तालुक्यांतील “हिंदवे” या गांवीं तत्कालीन कोंकणच्या कदंब राज्याच्या आश्रयास येऊन राहिले. यांचें गोत्र काश्यप असून त्यांच्या बरोबर आणखी तेरा गोत्रांचीं दुसरीं ब्राह्मण घराणीं कोंकणांत आलीं होतीं. येथून कुडाळदेशकर ब्राह्मण ज्ञातीच्या इतिहासास सुरुवात होते.

यापूर्वी  निदान १०० वर्षे तरी प्रांतभेदानें तत्कालीन ब्राह्मणांचा नामनिर्देश होऊं लागला असावा असें वाटतें. तत्पूर्वी शिलालेखांत अगर ताम्रपत्रांत गोत्रभेदानें ब्राह्मणांचा उल्लेख येतो. त्यानंतर प्रांतवाचक उल्लेख येऊं लागला. आणि त्यामुळें पुढील काळांत या प्रांतवाचक निरनिराळ्या ब्राह्मणांत विवाहसंबंध होईनासा झाला असावा. उत्तरेकडील सर्व ब्राह्मण यजुर्वेदी असल्यानें वरील सामंत घराणें व बाकीचीं तेरा घराणीं हीं सारीं यजुर्वेदीच होतीं. सामंत हें गांव प्रथम मांडलिक राजसत्तादर्शक होतें. परंतु पुढें आडनावांचा प्रघात पडल्यावर तें तद्दर्शी झालें. (तत्पूर्वीं आडनांवें प्रचारांत नसावी.). कुडाळदेशकर ब्राह्मण हे मूळचे यजुर्वेदी असून हल्लीं त्यांच्यांत ऋग्वेदी कसे आढळतात असा एक प्रश्न आहे. त्यास उत्तर असें कीं, ते दक्षिणेंत आल्यानंतर त्यांची वसाहत जेथें झाली त्या भागांत कर्‍हाडे ब्राह्मणांचें साहचर्य त्यांस निकट असल्यानें व ते ऋग्वेदी असल्यामुळें हेहि ऋग्वेदी बनले. यास पुढील उदाहरण आहे. चित्पावन ब्राह्मण हे मूळचे हिरण्यकेशी यजुर्वेदी असून पुढें त्यांच्यापैकीं बरेच ऋग्वेदी बनले.

आडनांवांचा प्रघात पडल्यानंतर तो कुडाळ देशकर ब्राह्मणांतहि सुरू झाला. त्यांच्यांतील जुनीं व नवीं आडनांवें अशीं आहेत. सामंत प्रभु, नायक, ठाकूर, पंडित, पाटील, जोशी, महाजन, सरदेसाई, देसाई, नाईक, देशपांडे, सरनाईक, मतकरी, जुवळे, बोंद्रे, टिकल्ये, नगारे, गिते, गोसावी, डिंगे कोले, साठकुंभे, वेर्वे, वाघ, संत इत्यादि.

याशिवाय धंद्यावरून व गांवांवरून पडलेलीं अनेक नांवें आहेत. ब्राह्मण ज्ञातींत ‘सामंत’ हें नांव कुडाळ प्रांतांतच नव्हे तर सबंध महाराष्ट्रांत फक्त याच (कुडाळ देशकर) जातींत आढळतें; दुसर्‍या कोणत्याहि ब्राह्मण जातींत तें आढळत नाहीं. ‘प्रभू’ उपनांवहि कुडाळ प्रांतांत मुख्यत्वेंकरून याच जातींत आढळतें. त्या प्रांतांतील शेणवी ब्राह्मणजातींत तर मुळीच आढळत नाहीं; कर्‍हाडे ब्राह्मणांत (प्रभुदेसाई) फारच विरळ आढळतें; चांद्रसेनीय कायस्थ प्रभु (ही जात “प्रभु” हें उपनांव म्हणून कधींच लावीत नाहींत) त्या प्रांतात कधींहि नव्हते व सध्यां नाहींत. (कुडाळ प्रांताबाहेर ‘प्रभु’ हें उपनांव कांहीं जातींत क्वचित आढळतें; पण तें बहुतांशीं “परब” या अपभ्रंशाच्या रूपानें.) यावरून कुडाळ प्रांतांतील प्रभु हे नामांकित राज्याधिकारी या कुडाळ देशकर जातीचेच होत असें विद्वानांचें म्हणणें आहे. त्यांचे वंशज आज अस्तित्वांत आहेत.

कदंबांच्या राजवटींत  या जातीला राजाश्रय होता. या जातींतील बहुतेक घराणीं पुढें तत्कालीन परिस्थितीमुळें क्षात्रवृत्तीचीं बनलीं. यादवांच्या वेळीं या जातींतील कांहीं घराणीं त्यांचीं मांडलिक बनलीं. या मांडलिकांत ‘जोगदेव’ उगीदेव, मायीदेव, (माइन्देव) वगैरे नांवाजण्यासारखे पुरुष झाले. सम्राट सिंघण यादवाच्या काळीं माइन्देव हयात असून त्याला महाप्रधान, सर्वाधिकारी, महापरम विश्वासी अशा उपाधी होत्या. या माइन्देवाच्या हाताखालीं हेम्म (हेम्मेय) नायक नांवाचा एक सुकाधिकारी (सुंकएककर) बनवासी प्रांतावर होता. माइन्देव फार शूर असल्यानें त्याला रणलक्ष्मीवधूवर व मंगमहीपति असें म्हटलेलें आहे. त्यानें बरेच प्रांत जिंकल्याचें आढळतें. ‘मांग्लाख्यमहेश्वर’ असाहि त्याचा उल्लेख एका शिक्यांत आहे. त्यावरून सिंघणाच्या पश्चात माइन्देव हा स्वतंत्र झाला असावा असें वाटतें. यापेक्षां त्याला खात्रीचा पुरावा मिळत नाहीं. या घराण्यांत देम, भैरवदेव, काई(काइन) देव आणि नागदेव या राजांचीं नांवें प्रामुख्यानें पुढें येतात. या नागदेवाचा एक ताम्रपट प्रसिद्ध आहे. तसेंच हेमराजाचाहि एक ताम्रपट उपलब्ध झाला असून अद्यापि अप्रकाशित आहे.

पुढें १५ व्या शतकाच्या पूर्वी बहामनीराजांनीं कोंकण घेतलें त्यावेळीं हें सामंत घराणें नष्ट झालें. या घराण्यापैकीं आज फक्त दोन शाखांचाच शोध लागतो. पैकीं एका शाखेंत त्यांच्या पूर्वजांच्या पाषाणाच्या मूर्ती पूजेंत ठेविल्या आहेत. परंतु त्यांनां आपल्या घराण्याच्या इतिहासाची फारशी ओळख नाहीं. या मूर्ती राजांच्या पालखींत बसविलेल्या अशा दाखविलेल्या आहेत. यादव राजे राज्य करीत असतां पूर्वींच्या जैन व लिंगायत धर्माचा त्यांनीं उच्छेद करून पुन्हां वैदिक धर्माची आपल्या राज्यांत सर्वत्र स्थापन केली. त्या कामांत माइन्देव, देमदेव व भैरवदेव यांनींहि भाग घेतला होता. त्यामुळें या धर्मप्रस्थापक सम्राट (यादव) व मांडलिक (सामंत) राजांच्या मूर्ती पालखींत बसलेल्या अशा कुडाळ प्रांतात बर्‍याच आढळतात.

मुसुलमानी अमदानींत सामंत घराण्याचें प्रधानकीचें किंवा सेनापतींचें काम करणार्‍या जामदग्न्यवत्सगोत्री प्रभु उपनांवाच्या ब्राह्मण घराण्याकडे (ते कदंबांच्या वेळेपासून देशमुखीहि करीत असल्यामुळें व त्यावेळीं या ब्राह्मण जातींत हेच प्रमुख असल्यानें त्यांच्याकडेच) बहामनी शहांनीं कोंकणांतील या प्रांताची व्यवस्था सोंपविली. हे प्रभु त्यावेळीं जहागीरदार बनले. या काळींच कुडाळाचें महत्व जाऊन तें गोव्यास प्राप्त झालें (गोवें बंदरांत किंवा जवळच सामंताची एखादी राजधानी असावी असें इ. स. १३९१ च्या विजयनगरताम्रपटांतील ‘गोंवाभिधां कौंकण राजधानीं’ या पदावरून वाटतें). त्यावेळीं  गोवें बंदराचें महत्व फार असल्यानें बहामनी शहांनीं तें जिंकण्यासाठीं बरेच प्रयत्‍न केले. या प्रभु घराण्यांत (बखरीच्या आधारें) चंद्रभान व सूर्यभान हीं दोन जुनीं नांवें आढळतात. त्यांचा नक्की काळ समजत नाहीं. परंतु १४व्या शतकाच्या सुरुवातीस हे असावेत असें जैन वाङ्मयांतील उल्लेखांवरून म्हणतां येतें. हें प्रभु घराणें शेवटपर्यंत मुसुलमानांचें व मध्यंतरीं कांहीं काळ विजयानगरकरांचें मांडलिक होतें. कारवार, अंकोला व मिरजन हा भाग या घराण्याकडे प्रथमत: विजयानगरकरांतर्फें आला असें दिसतें. या घराण्याकडे गोमप्रभु,  रामप्रभु, बायाजीप्रभु, भानजीप्रभु, बाबाजीप्रभु, जोगणप्रभु हे प्रसिद्ध पुरुष होऊन गेले. इ. स. १४६० ते १६४० पर्यंत हें घराणें सुस्थितींत होतें. इ. स. १६९६ सालीं प्रस्तुतच्या वाडकर (मराठे) सावंतांच्या पूर्वजांनीं या प्रभूस जिंकून या घराण्याचा शेवट केला. शिवाजीमहाराजांची स्वारी होण्यापूर्वी कांहीं वर्षे या प्रभु सरदेसायांच्या अंमलाखालीं पंचमहाल कुडाळ (४१३ गांवें), साळशीमहाल (८४ गांवें) व कारवार, अंकोला आणि मिरजन हे महाल इतका प्रदेश होता. शिवाय तपें चांदगड परगण्याचा कांहीं भागहि होता असें दिसतें.

या प्रभु घराण्यानें विहिरी, घाट, देवळें वगैरे बांधून व ब्राह्मणांनां व अग्निहोत्र्यांनां वगैरे उत्तेजन देऊन ब्राह्मणी धर्माचें संरक्षण केलें. पुढें शिवाजीमहाराजांच्या वेळीं या जातींतील लोकांनीं त्यांना थोडेंफार साहाय्य केलें. यांनीं कोल्हापूरकर व सातारकर छत्रपति आणि पेशवे, आंग्रे, बावडेकर वगैरे दरबारांचा आश्रय केला होता. यांच्या आश्रयामुळेंच पुढील अवनत काळांत ही जात जिवंत राहूं शकली व वाडीच्या सावंतांनीं या जातीच्या जमिनी, इनामें व देवस्थानें काबीज करून त्यांच्यावर “बामणदंड” नांवाचा कर जुलमानें लादला. यामुळें व वरील इतर परिस्थितींमुळें कुडाळ प्रांतांतील शेंकडो कुटुंबें तो देश सोडून दुसरीकडे गेलीं असें या जातीचें म्हणणें आहे. या वसाहती विशेषत: आजरें, वसई, अर्नाळा, बेळगांव, धारवाड, विजापूर, गोकर्ण, मोगरनाड, बारकोर येथें झाल्या आहेत. वाडीच्या सावंतांच्या पदरीं या जातीचे लोक नोकर म्हणून फारसे नाहींत. शेणवी ब्रह्मणांनां कुडाळदेशकर ब्राह्मणांनीं पूर्वीं ते त्यांचे नोकर असतांना जमीनी वगैरे दिल्या होत्या. परंतु उलट “या जातीचा त्यांनीं छळ केला” असें शेणवी म्हणतात. इंग्रजी अंमलांत हा छळ कमी झाला. याबद्दल कै. रा. राजाराम रामकृष्ण भागवत यांनीहि आपला अनुभव विविधज्ञानविस्तारांत लिहिला आहे. या जातींत शिक्षणप्रसार बरा झाला असून सरकारी व एतद्देशीय संस्थानांतील मोठ्या दर्जाच्या नोकर्‍या या लोकांनीं केल्या आहेत. व्यापाराच्या क्षेत्रांतहि त्यांचें पाऊल पुढें पडत आहे. तरी ही ज्ञाति म्हणण्यासारखी सधन नाहीं.

या ज्ञातीच्या हल्लीं पुढील पांच संस्था आहेत:- (१) कुडाळ देशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धि समाज, (२) गौड ब्राह्मण सभा, (३) कुडाळ देशकर आद्य गौडब्रह्ममंडळ, (४) कुडाळदेशस्थ गौडब्राह्मण निराश्रित साहाय्यकारी फंड, (५) कुडाळदेशकर आद्य गौडब्राह्मण महामंडळ. पहिल्या संस्थेचें भांडवल आज एक लाख रुपयांवर आहे व ती ३०।३२ वर्षे विद्यार्थ्यांनां मदत करीत आहे. दुसरीचें काम वाङ्‌मयात्मक व सामाजिक (ज्ञातीचें) कार्य करणें हें होय. तिसरी ज्ञातिसंघट्टण करणारी. चौथीचें भांडवल १५ हजार असून पांचवी सर्व  ज्ञातीची प्रातिनिधिक संस्था आहे. ज्ञातींतील धनाढ्य गृहस्थ कै. वा. अनंत शिवाजी देसाई, टोपीवाले यांनीं परदेशीं जाऊन विद्या शिकण्यार्‍याकरितां तीन लाखांचा फंड उभारला आहे.

या जातीचे शंकराचार्यान्वयी गुरुपीठ ५।६ शें वर्षांचें जुनें असून तें या ज्ञातीच्या राजवटींत कुडाळ शहराच्या कोटापासून ३ मैलांवर सोनवडें (स्वर्णवट) गांवीं स्थापन करण्यांत आलें. हा प्राचीन मठ नंतर (वाडकर) सावंताच्या अमदानीच्या सुरुवातीस शेणवी ज्ञातीनें ताब्यांत घेतला (या मठासंबंधीं प्रकरणांत कै. वा. गणपतराव परुळेकर वकील, यांनीं आपल्या ‘कुडाळदेशकर’ नामक पुस्तकांत ३ र्‍या प्रकरणांत विस्तृत आणि मार्मिक विवेचन केलें आहे, तें वाचनीय आहे). मध्यंतरीच्या कळांत चिंदर व गोळवण हें मठ स्थापन होऊन शेवटीं सुमारें १७५ वर्षांच्या पूर्वी सध्याचें दाभोली हें मठसंस्थान स्थापन करण्यांत आलें.

या जातींत गोपाळ बोध गोसावी मळगांवकर, पूर्णानंद चिदानंद, विमलानंद, श्रीधर स्वामी उर्फ मौनीबुवा, शुक्रदेव, हरिचरण गिरी, भगवान गिरी, दत्तगिरी, रुक्माजी बुवा, उमाजी बुवा, अंबरनाथ, गंबरनाथ, काननाथ, रामदासी संप्रदायांतील रघुनाथ बुवा आणि अनंत बुवा (यांचे कुडाळ प्रांतात दोन मठ आहेत), केशवबुवा द्वादशीकर, वारकरी संप्रदायांत गेल्या ६०।७० वर्षांपूर्वीं प्रसिद्ध असलेले अजरेकर संतबाबा महाराज, गोविंददादा, पद्मनाभतीर्थ (बाडमठ) इत्यादि साधू संत होऊन गेले. यांत गोपाळ बोध, चिदानन्द, पद्मनाभतीर्थ हे कवी म्हणूनहि प्रसिद्ध आहेत.

या जातीची एकंदर लोकसंख्या सुमारें ३५ हजार आहे. यांची नोंद धर्मगुरूंच्या संस्थानांत मिळते. जातींत पूर्वी पंचायत होती, हल्लीं महामंडळ स्थापन झालें आहे. यांचा कायमचा अध्यक्ष धर्मगुरू (शंकराचार्यान्वयी मठपति) असून लोकनियुक्त उपाध्यक्ष बहुतेक कामें करितो. ज्ञातीचा कर वसूल करण्यासाठीं मंडळ्या (कमिट्या) नेमलेल्या आहेत. ज्ञातींत शरीरसंबंधानें किंवा इतर कोणत्याहि तर्‍हेनें बाहेरचीं माणसें समाविष्ट होत नाहींत. आजकालच्या मानानें ज्ञातीचीं पूर्वींचीं शास्त्रविहित कर्में शिथिल होत चाललीं आहेत. त्यामुळें धर्मगुरू व पंचायत यांच्या शासनाधिकाराचा उपयोग क्वचितच होतो. या जातींत पूर्वीं १४ गोत्रें होतीं, परंतु त्यांपैकीं चार नाहींशी झाली. बाकींच्या १० गोत्रांतीलहि कित्येक घराणीं जीं बाहेर गेली. त्यांच्या दोन जाती बनल्याची समजूत जुनीच आहे. पैकीं एक पेडणेकर ही होय. अर्थातच ते आपल्यास गौड ब्राह्मणच म्हणवितात. यांची वसाहत गोव्यांतील पेडणें महालांत (हा महाल पूर्वी कुडाळ प्रांतात मोडत असे) जास्त आहे. या भेदास ३५० वर्षे झालीं असावीं. त्यांत सध्यां प्रभु उपनांवाचें एक धनाढ्या घराणें पोर्तुगीजांचे व्हायकाउंट आहे.

या ज्ञातीचे उपनयनविवाहादि धार्मिक संस्कार याच ज्ञातीचे अगर कर्‍हाडे ज्ञातीचे उपाध्याय करितात. जातीचे प्रश्न जात सोडविते. शंकराचार्यांचा किंवा इतर कोणत्याहि ब्राह्मण जातीचा सल्ला घेण्यांत येत नाहीं. चातुर्वर्ण्यांत या ब्राह्मणांनां इतर दशविद्यांचेंच स्थान आहे. ज्ञातीसंबंधीं कागद धर्मगुरूंच्या संस्थानांत व पंचांच्या प्रमुख घराण्यांत आहेत. ज्ञातीचीं स्थलांतरें (वरील कारणांमुळे झालेलीं) गेल्या तीनचारशें वर्षांतील आहेत. एकंदर बहुजनसमाज पुराणमताभिमानी असा आहे. ज्ञातींत विधवेचा पुनर्विवाह झाल्याचें एकहि उदाहरण आढळत नाहीं. विधवा व निराश्रितांची तरतूद ज्ञातिफंडांतून होते. या जातींतील पुरुषांस रखेल्यापासून झालेल्या मुलाचीं गणना सर्वसाधारण शूद्र वर्गांत करितात; अशा ज्ञातीपासून उत्पत्ति झाली ही गोष्ट दर्शविणारें असें स्वतंत्र नांव त्यांनां नाहीं. देवळी या नांवाचा एक बराच मोठा वर्ग त्या प्रांतांत महशूर आहे. त्या वर्गांतील स्त्रियांस भावणी (संस्कृत भाविनी) म्हणतात पण या जातीवर आतां कोणत्याहि विशिष्ट जातीला हक्क सांगता येईल असें वाटत नाहीं.

ज्ञातीचें मूळचें नांव गंगाकिनार्‍यावरील गौडप्रांतांतील राहणारे म्हणून आद्य गौड अगर गौड असें आहे;  पण कोंकणांत सर्वसाधारण लोक अलीकडे या जातीला “कुडाळदेशकर ब्राह्मण” असें म्हणतात. हें नांव क्वचित १७ व्या शतकाच्या सुरुवातीपासून व सन १६९६ पासून पुढील कागदांत विशेषत: रूढ झाल्याचें आढळतें. कुडाळ देश यांनीं वसविला म्हणून हे कुडाळदेशकर होत अशी जी व्युत्पत्ति एका पुस्तकांत आढळतें ती बरोबर नाहीं. कारण हे कुडाळाकडे येण्यापूर्वीपासून कुडाळ (कुट्टापरान्तक) प्रांत अस्तित्वांत होताच. दुसरा असा एक विचित्र तर्क आहे कीं, देशावरील (वाईजवळच्या) कुडाळामध्यें यांनीं प्रथम वसाहत केली आणि दुर्गादेवीच्या दुष्काळाच्या सुमारास (कदाचित् दुष्काळामुळें) त्यांनीं कोंकणांत  येऊन वसाहत केल्यानंतर ‘देशावरील कुडाळाहून’ आले म्हणून त्यांस ‘कुडाळदेशकर’ असें नांव पडून त्या नवीन वसाहतीस ‘कुडाळ’ असें नांव पडलें. पण हा तर्क जितका विचित्र आहे. तितकाच तो निखालस खोटाहि आहे असें रा. वा. अ. बांबर्डेकर म्हणतात.. कारण दुर्गादेवीचा दुष्काळ सन १३९६ त पडलेला नसून, तो रा. राजवाडे यांनीं अस्सल कागदांवरून सन १४६८-१४७५ च्या दरम्यानच्या काळांत पडल्याचें निर्विवाद सिद्ध केलें आहे (सरस्वतिमंदिर मा. पु.). आणि या सालापूर्वीं (१४३६), रा. बांबर्डेकर यांच्या पूर्वजांनीं कुडाळ प्रांतांतील त्यांच्या गांवच्या देवस्थानासंबंधीं दिलेल्या इनाम जमिनींचा त्यांनीं स्वीकार केल्याचा उल्लेख ज्यांत आहे, असा एक कागद रा. बांबर्डेकरांपाशीं आहे. त्यावरून ही जात दुर्गादेवीच्या दुष्काळाच्या पूर्वींपासूनच या प्रांतीं आहे हें उघड होतें. त्याला इतिहासाचा इतर पुरावा आहे तो वेगळाच. तसेंच या प्रांताचें नांव दुर्गादेवीच्या दुष्काळापूर्वींच ‘कुडाळ’ असें होतें हें त्यापूर्वीच्या एका बहामनी शहाच्या फर्मानांत ‘कुडाळ’ असें नांव असल्यावरून सिद्ध होतें.

या ज्ञातींतील लोकसंख्येची वाढ असावी त्या मानानें बरीच कमी दिसते. यास पुढील कारणें असावी:- (१) बामणदंडादि आपत्तींमुळें भर पडलेली सतत दोन अडीच शतकांची अवनत स्थिति. (२) तत्कालीन  राजकीय परिस्थितीमुळें स्वार्थाला बळी पडून कांहीं घराण्यांनीं परजातींत स्वत:स समाविष्ट करून घेतलें. पण यांतूनहि शिल्लक राहिलेली सर्व लोकसंख्या मठांतील गादीप्रमाणें सुमारें ३५ हजार असतां आणि त्यांतील मोठा भाग मुंबईइलाख्यांत असतां १९२१ च्या सरकारी खानेसुमारीमध्यें मुंबई इलाख्यांतील संख्या ५।६ हजारच दाखविली गेली आहे. याचें कारण, या जातींतील कांहीं माणसें चुकीनें गौडसारस्वत या जातींत समाविष्ट झालीं असावीं हें होय.

हल्लीं प्रसिद्ध झालेल्या (१९२०) एन्थॉवेनकृत ‘ट्राइब्ज अँड कॉस्टस् ऑफ बाँबे’ या पुस्तकांत दाक्षिणात्य गौडब्राह्मण म्हणून समजल्या जाणार्‍या जातींनां ‘सारस्वत, गौडसारस्वत आणि शेणवी’ अशा त्रिविध नांवाच्या एकाच प्रमुख सदरांत गोंविलें असून माहिती देतांना फक्त शेणवी ब्राह्मणांच्या मूळ कथा सांगून त्यांतच सर्वांचा समावेश केला आहे. याबद्दल रा बांबर्डेकर म्हणतात:- “ह्या मूळ कथा सह्याद्रि खंड आणि मंगेश महात्म्यांतल्या म्हणून कोणी तरी साहेबमजकुरांस पुरविलेल्या आहेत. पण मुळीं त्या तशा वरील महात्म्यांत आणि सह्याद्रिखंडांत नाहींतच. परशुरामानें ‘सारस्वत उर्फ शेणवी’ ब्राह्मणांस आणिलें असें या ग्रंथांत म्हटलेलें नसून नुसतें ‘गौडब्राह्मण’ आणिले असें म्हटलें आहे. तसेंच या ग्रंथांत ब्राह्मणांचीं नुसतीं ६६ कुलें (कुलं षट् षष्टिकं) आणिलीं असें आहे. पण एनथॉवेन हे त्यांत ९६ कुलें दिलीं आहेत असें सांगून त्यावरून शाहाण्णवै=शेणवी हें नांव पडल्याचें नमूद करितात. ग्याझेटिअर व शेणव्यांच्या ज्ञातिसंबंधाच्या पुस्तकांतून शिळी झालेली शेणवी शब्दाची ही व्युत्पत्ति १९२० सालीं एनथॉवेनच्या पुस्तकांत नमूद व्हावी ही आश्चर्याची गोष्ट होय ! शिवाय परशुरामाच्या वेळीं (४।५ हजार वर्षांच्या सुमारास) ब्राह्मणांत ज्ञाती नव्हत्या वगैरे गोष्टी सह्याद्रीखंडकारांस कदाचित् माहीत नसतील. परंतु या साहेबासारख्या ज्ञातिविषयांवर लिहिण्यास प्रवृत्त झालेल्यांना व त्यांनां वरील माहिती पुरविणार्‍यानां तरी त्या माहीत असल्या पाहिजेत. तसेंच परशुरामानें आपणांस आणिलें असें कोंकण आणि मलबार किनार्‍यावरील कित्येक ब्राह्मणजाती सांगतात. त्यांत ऐतिहासिकपणाचा अंश कांहीं नाहीं हें या एथ्नॉग्रफीकार एनथॉवेन साहेबांस कळावयास हवें. सह्याद्रीखंड हें इतिहासकारांस आतां विश्वसनीय वाटत नाहीं. या खंडाच्या उत्तर खंडांतले पहिले तीन चार अध्याय वाचून असें निश्चित म्हणतां येतें कीं, गोव्याची, तेथील देवतांची व ब्राह्मणांची त्यांत दिलेली माहिती ही अगदीं अलीकडे म्हणजे दीड पावणेदोनशें वर्षांच्या आंत किंवा इ. स. १८७७ सालाच्या पूर्वीं कांहीं वर्षें, डॉ. ड. कुञ्जांनीं तें काम हातीं घेतल्यावर, शेणवी म्हणविणार्‍या लोकांपैकीं कोणी तरी त्यांत घुसडून दिलेली दिसते. शेणवी या ज्ञातिवाचक बनलेल्या नांवांत कांहीं हीनत्व आलें असें ज्यावेळीं त्या लोकांस वाटलें त्या वेळेपासून त्यांनीं असल्या कथा रचण्यास सुरुवात केलेली दिसते. आणि एथ्नॉग्रफीशास्त्रज्ञतेचा टेंभा मिरविणार्‍या एनथॉवेनसाहेबांनीं असल्या गोष्टी खुशाल प्रसिद्ध कराव्या यापेक्षां त्या पुस्तकाची (या बाबीपुरती तरी) अनुपयुक्तता आणखी ती काय सिद्ध करावयास पाहिजे? वरील दहा ब्राह्मणांचीं ६६ कुलें झालीं असें लिहिणारा व हे श्लोक घुसडणारा कोणी तरी साष्टीकर असला पाहिजे असें सह्याद्रीखंडाच्या त्या (१८७७च्या) प्रतींतील प्रस्तावनेंत जीं त्यांचीं नांवें दिलेलीं आहेत त्यावरून अनुमान काढतां येतें. त्यांपैकीं एक केणी उपनांवाचे शास्त्री (हे गौडसारस्वत म्हटलेल्या जातींतील साष्टीकर या भेदाचे) यांनीं इ. स. १८७१ सालीं हुबेहुब सह्याद्रीखंडांतील भाषेप्रमाणें ‘दशप्रकरण’ नांवाचें एक श्लोकबद्ध संस्कृत पुस्तक शाण्णवी सारस्वत उर्फ कोंकणे ब्राह्मण या नांवाच्या ज्ञातीच्या माहितीचें रचिलें होतें. त्यांत सुद्धां स्वज्ञाति (साष्टीकर आणि शेणवी हे आतां रोटीबेटी व्यवहारानें एक झाल्यासारखे आहेत) संबंधीं बनावट माहिती दिली आहे. एनथॉवेन यांनीं आधारभूत म्हणून स्वीकारिलेलें हे ग्रंथ (सह्याद्रि खंड आणि मंगेशमाहात्म्य) मुळींच विश्वासास पात्र नाहींत.  त्यांनां आधारास घेऊन सारस्वत, गौडसारस्वत उर्फ शेणवी या लांबलचक नांवाच्या जातीच्या दिलेल्या कथा निव्वळ खोट्या आहेत. त्या इतिहासाच्या कसोटीला टिकण्यासारख्या नाहींत. असल्या भाकड कथा ज्या जातीच्या म्हणून लिहिल्या त्या पुस्तकांत कुडाळदेशकर ब्राह्मणांच्या नांवाचा संबंध साहेब मजकुरांनीं विनाकारण जोडलेला आहे. मात्र एथ्नॉग्रफीच्या दृष्टीनें कुडाळदेशकरांचीं जात वर लिहिलेल्या त्रिविध नांवाच्या जातींहून भिन्न दिसत असल्याचेंहि साहेब मजकुरांनीं आपल्या पुस्तकांत नमूद केलें आहे.”

कै. वा. गणपतराव परुळेकर वकील यांनीं आपल्या “कुडाळदेशकर” पुस्तकांत पर्यायानें आपल्या ज्ञातीचा संबंध सह्याद्रीखंडांतील मागें सांगितलेल्या गौडब्राह्मणांशीं जोडण्याचा प्रयत्‍न केला आहे. परंतु रा. बांबर्डेकर यांनां तो मुळींच मान्य नसून हास्यास्पद वाटतो. त्यांच्या मतें सह्याद्रिखंडाच्या रचनेचा काळ त्यास जोडलेल्या परिशिष्टावरून व त्यांतील अत्यंत विसंगत कथानकांवरून सन १५०० ते १५५० पर्यंतचा असून सध्यां उपलब्ध असलेल्या खंडाच्या प्रतींत ज्यांनां संधि मिळाली त्यांनीं घुसडाघुसड केल्यामुळें पुराणाची शुद्ध प्रत मिळूं शकत नाहीं. त्याचप्रमाणें रा. परुळेकरांनीं आपल्या पुस्तकात ‘कोंकणाख्यान’ या ज्या एका पोथीचा उपयोग केला होता तीहि पोथी कुचकामाची आहे.”

[संदर्भग्रंथ:- सिलेक्शन बॉं.ग्या. रेकार्ड पु.१०; हचिनसकृत सावंतवाडी मेमॉयर्स, जर्नल अँथ्रा. सो. बां. पु. ८, १०; देमनृपतीचा ताम्रपट; मठगांवचा शिलालेख; मालवणच्या प्रभुदेसायांची जुनी कैफियत; रिपोर्ट वेस्ट्राप म्युझिअम जर्व्हिसकोंकण, बाँ. ग्याझेटिअर पु. १०; पिंगुळकरकृत सावंतवाडी संस्थानचा इतिहास; परुळेकरकृत ‘कुडाळदेशकर’ पुस्तक रा. वासुदेव अनंत बांबर्डेकर यांचा लेख].

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...