कृष्णाजी नाईक जोशी— (चासकर घराणें)
हा शिवकालीन मुत्सद्दी पन्हाळ्यास सुरनीस होता. त्यास महाराजांनीं तंजावरास व्यंकाजी राजाकडे जें शिष्टमंडळ पाठविलें त्यांत धाडलें होतें. यास पुढें शाहुमहाराजांनीं सर्व राज्याची पोतदारी दिली. पूर्वीचे पोतदार श्रीगोंदेकर पुंडे हे ताराबाईच्या पक्षास चिकटून राहिल्यामुळें व कृष्णाजीनें "मोंगलाईतून येतेसमयी स्वामींच्या व राजाच्या कल्याणाविषयीं बहुत श्रम साहस केल्यावरून... पोतदारीचा धंदा हुजुराचा व सर कारकून व सरदार यांजकडील वंश परंपरेनें" इनाम दिला. यांचा पुत्र महादाजी. हा चासकर घराण्याचा मूळपुरुष. महादाजी यांचा गोविंदा म्हणून एक भाऊ होता. या दोघांनीहि बापाप्रमाणेंच शिवाजीराजे - संभाजीराजे -राजाराम महाराज यांच्या वेळीं स्वराज्याची सेवा उत्कृष्ट केली. "महादाजी कृष्ण हे संभाजी व धनाजीसमवेत फौजा घेऊन गेले" त्यामुळें राजाराम यांनीं त्यांनां खवली गांव इनाम दिला. त्यानंतर कोल्हापूर शिवाजीच्या वेळींहि यांनीं व यांचा मुलगा बाळाजी महादेव याने (भाऊ, रामचंद्र व कृष्ण यांसह) सरकार सेवा केलेली आहे असें खुद्द करवीरकर संभाजी महाराजांनीं म्हटलें आहे. महादाजीनी रांगणा येथें बाळाजी विश्वनाथास मदत केली. तसेंच कान्होजी आंग्रे व बाळाजीपंत यांचा स्नेहहि त्यानींच जमविला. महादाजीपंताची मुलगी ही थोरल्या बाजीरावसाहेबांस दिली होती. त्यांचें नांव काशीबाई. महादाजी हे सावकार असल्यानें बाळाजीपंतांना त्यांचा बराच उपयोग झाला होता. [भा. व; रा. खं. २०; म. रि.] सातार्यास व्यंकटपुर्यांत असलेलें कृष्णेश्वराचें देऊळ या महादाजी कृष्णरावांनीच बांधल्याचा उल्लेख करणारा शिलालेख (शके १६४५ चा) तेथें आहे. या देवळाच्या पुढील हल्लीचा व्यंकटपुरा त्यावेळीं नसून तेथें महादाजीपंतानें सदाशिवपुरी नांवाची पेठ वसविली होती. महादाजीकडे लोहगडचा कारभार होता. कृष्णराव महादेवास पेशव्यांनीं चास येथें सरंजाम दिल्यामुळें या घराण्यास चासकर म्हणूं लागले. महादाजींचा पुत्र कृष्णराव हा सन १७३३ मध्यें फिरंग्यांच्या स्वारीवर गेला होता. तत्पूर्व त्याला पेशव्यांनीं कल्याणची सुभेदारी दिली होती. त्यावेळीं (स. १७३०) त्यानें भिवंडीच्या खाडीपलीकडील कांबें हें फिरंग्याचें ठाणें काबीज केलें होतें.
No comments:
Post a Comment