विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

मराठीशाहीतील धुळप घराणे

 


मराठीशाहीतील धुळप घराणे

धुळप- धुळप यांचें मूळचें उपनांव मोरे, हे मूळ उत्तर हिंदुस्थानांतील रहिवासी. ह्या घराण्यांतील परसोजी बाजी व जयाजी बाजी या उभयतां बंधूंनीं सह्याद्रीच्या पूर्वेस कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या मध्यें जावळीं व त्याच्या सभोंवतालचा मुलूख काबीज करून, जावळी हें आपल्या राहण्याचें ठिकाण केलें. परसोजीस पांच पुत्र झाले. (१) हणमंतराव, (२) बागराव, (३) कमलराव, (४)सुर्याजीराव व (५) चंद्रराव. जयाजी हा निपुत्रिक होता. शिवाजीच्या कारकीर्दीत चंद्रराव, सूर्याजीराव व हणमंतराव ह्या त्रिवर्गांचा शेवट झाला, नंतर हणमंतराव याचे मुलगे खेमाजी व चायाजी; बागराव याचा प्रतापजी; सुर्याजीराव याचा दादाजी; व चंद्रराव याचा बाळाजी येणेप्रमाणें मोरे घराण्यांतील मंडळी स्वसंरक्षणार्थ विजापूरच्या बादशहाच्या आश्रयास जाऊन राहिली. वरील सहा जणांनीं विजापूरकरांच्या वतीनें समशेर गाजविल्यामुळें, बादशहानें खुष होऊन `धुळप’ असा बहुमानाचा किताब दिला, अशी माहिती मिळते. विजापूरकर व शिवाजीराजे यांच्या झटापटींत या मोऱ्यांपैकीं-धुळपांपैकीं बरीच मंडळीं कामास येऊन, शेवटी छत्रपतींच्या धाकानें अवशिष्ट मंडळी वाट फुटेल तेथें जाऊन राहिली (हणमंतराव व चंद्रराव यांचे वंशज धवडे बंदरीं, बागराव यांचे दुदुशी दुदगांवीं, सूर्याजीराव यांचे वसईस व कमळराव यांचे बीरवाडीत गेले). ह्या घराण्याचा यापुढील पाऊणशें वर्षांचा इतिहास उपलब्ध नाहीं. इ. स. १७५६ मध्यें तुळाजी आंग्रे यास कैद केल्यानंतर पेशव्यांनीं विजयदुर्ग येथें आपल्या प्रत्यक्ष अधिकाराखालीं आरमाराचें मुख्य ठिकाण करून त्यास सुभा आरमार अशी संज्ञा दिली. या आरमारावर मुख्य अधिकारी एक असून त्यास सुभेदार निसबत सुभा आरमार असें म्हणत. इ. स. १७६४ मध्यें हणमंतराव मोरे यांचे वंशज आनंदराव धुळप या दर्यायुद्धांत नाणवलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. इ. स. १७९४ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे आनंदराव हाच सुभ्याचा प्रामुख्येंकरून कारभार आटपीत असे (आनंदरावाची हकीकत ज्ञानकोश विभाग ७ यांत त्याच्या नांवाखालीं पृ. १५३ वर पहा.). आनंदरावाप्रमाणेंच हरबाजीराव, जानोजीराव इत्यादि धुळप मंडळींनीं आरमाराची उत्कृष्ट कामगीरी करून पेशव्यांकडून वेळोवेळीं बक्षिसेंहि मिळविली. इ. स. १८१८ मध्यें पेशवाई नष्ट झाल्यानंतर त्याच्या वंशजांस इंग्रजांनीं `पोलिटिकल पेन्शन’ करून दिलें. श्री. कृष्णराव रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब या घराण्याचे विद्यामान वंशज हल्लीं विजयदुर्ग येथें राहतात.विजयदुर्ग येथील किल्ला, गोदी, वगैरे स्थलें प्रेक्षणीय आहेत. थोरले माधवराव पेशवे यांनीं स. १७७४ त जानोजी धुळप यास दक्षिणेंत स्वारीस पाठविलें होतें. इ. स. १७७५ मध्यें महीच्या पैलतीरी हरिपंत फडके व दादासाहेब यांचें युद्ध झाल्यावर पेशव्यानें जानराव धुळप यांस सांगितलें कीं दादासाहेब मुरतेकडून जाहाजांतून जलमार्गे एखादेंकडे जातील, याची बातमी व बंदोबस्त ठेवून, प्रसंगीं त्यांशीं गांठ घालून हस्तगत करून घेणें. ले. प्रूएन वगैरे इंग्रजांशीं झालेल्या दर्यायुद्धांत (१७८३ एप्रिल) धुळपांनीं फार पराक्रम केला. त्याबद्दल पेशव्यांनीं त्यांस बक्षीसें दिलीं. [भा.इ.मं. अहवा. १८३३; लो.- हिस्टरी ऑफ धि नेव्ही; स्टेट पेपर्स बाँबे.]

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...