वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य
१८५३ मध्ये लाॕर्ड डलहौसीने 'दत्तकविधान नामंजूर' करुन नागपूर संस्थान खालसा केले. त्यामूळे या संस्थानाचा अंमल असलेला चांदा जिल्हा(सध्याचा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा) ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आला. मार्च १८५४ मध्ये आर. एस. एलिस चांदा जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी झाले. जिल्ह्यात अनेक जमीनदारी आणि उप-जमीनदारी राजगोंड कुटुंबियांच्या मालकीच्या होत्या. या सर्व जमीनदाऱ्या भोसले राजवटीच्या आधी म्हणजेच गोंड काळापासून अस्तित्वात होत्या. स्वाभाविकपणे, या साऱ्या जमीनदारांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामूळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल प्रचंड राग उफाळत होता.
अशीच एक जमीनदारी मोलमपल्लीची होती. ज्यात सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील २४ गावे होती. मोलमपल्लीचा जमीनदार बाबूराव सेडमाके (शेडमाके) हा २५ वर्षांचा उमदा तरुण होता. त्याचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात १२ मार्च १८३३ रोजी झाला होता. मार्च १८५८ च्या सुरुवातीस बाबुरावने जवळच्या प्रदेशातील गोंड, माडिया आणि पूर्वी निजामाच्या सेवेत असलेल्या रोहिला जमातीमधील आदिवासी तरुणांची जमवाजमव केली. त्यातून सशस्त्र व निर्भय सैन्याची एक शिबंदी तयार केली. या सैन्याच्या बळावर बाबुरावने चांदा जिल्ह्यातील संपूर्ण राजगड परगणा ताब्यात घेतला. चंद्रपूरात ही बातमी पोहोचताच, तत्कालीन जिल्हाधिकारी क्रिश्टन यांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी ब्रिटीश सैन्याच्या तुकडीची नेमणूक केली. १३ मार्च १८५८ रोजी ब्रिटिश सैन्याची नांदगाव-घोसरीजवळ बाबुरावच्या सैन्याशी चकमक झाली. त्यांच्यात एक निर्णायक युद्ध झाले आणि त्यात बाबुरावच्या सैन्याचा दणदणीत विजय झाला. ब्रिटिशांच्या फौजेचे व सामानाचे अपरिमित नुकसान झाले.
पुढे 'अडपल्ली' व 'घोट' भागाचा जमीनदार व्यंकटराव हा बाबुरावला सामील झाला. या दोघांनी ब्रिटीशांविरूद्ध उघडपणे युद्ध जाहीर केले आणि १,२०० हून अधिक रोहिला व गोंड सैन्याची जमवाजमव केली. दोघांच्या संयुक्त सैन्याने उत्तरेकडे गढी सुर्लाच्या दिशेने धडक मारली व हा सगळा मुलुख आपल्या ताब्याखाली आणला. जेव्हा क्रिश्चटनला हे वृत्त समजले तेव्हा संतापून त्याने दुसरी एक तुकडी त्या टेकडीला घेरण्यासाठी पाठवली. परंतु बाबुरावच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ करीत ब्रिटिश फौजेवर टेकडीवरून दगड-गोट्यांच्या मारा सुरु केला. त्यात ब्रिटिश सैन्य विखुरले जाऊन त्यांना पळता भुई कमी पडू लागली.
त्यानंतर क्रिश्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागवून घेतली. नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज १९ एप्रिल १८५८ रोजी सगणपूर येथे व २७ एप्रिल १८५८ रोजी बामनपेट येथे बाबुरावच्या सैन्याशी भिडली. दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली. परंतु ह्या खेपेससुद्धा बाबुरावच्या सैन्याने कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले. या यशाने अत्याधिक आनंदित झालेल्या बाबुरावने २९ एप्रिल १८५८ रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी जमीनदारीमधील चिंचगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलीग्राफ कॅम्पवर हल्ला केला. ब्रिटिश फौजेने बाबुरावच्या सैन्याचा पाठलाग केला, परंतु १० मे १८५८ रोजी सलग तिसऱ्यांदा ब्रिटिश सैन्याला पराभवाच्या नामुष्कीचा सामोरे जावे लागले.
त्यानंतर क्रिश्टनने युक्तीचा वापर करून बाबुरावला शह देण्याची योजना आखली. अहेरी येथील जमीनदार लक्ष्मीबाईंला चिथावणीवजा पत्र लिहून बंडखोरांना आश्रय दिल्यास व त्यांना मदत केल्यास तिच्यावर खटला चालवून तिची जमीनदारी जप्त करण्याची धमकी दिली. त्यासोबतच बाबुरावला पकडून देण्यात ब्रिटिशांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचा हुकूम केला. या धमकीचा इच्छित परिणाम झाला आणि लक्ष्मीबाईंने ब्रिटिशांना तत्परतेने मदत करण्याची हमी दिली. जुलै १८५८ मध्ये लक्ष्मीबाईच्या सैन्याने बाबुरावला भोपाळपट्टणम येथे पकडण्यात यश मिळवले. परंतु त्याला अहेरी येथे नेले जात असतांना आपल्या रोहिला अंगरक्षकांच्या मदतीने तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर बाबुरावने ब्रिटीशांच्या ताब्यातील प्रदेशांची लूट करण्याचे सत्र चालू ठेवून ब्रिटिश सत्तेस खुले आव्हान दिले. अखेरीस १८ सप्टेंबर १८५८ रोजी लक्ष्मीबाईच्या सैन्याला बाबुरावला पकडण्यात यश आले. लक्ष्मीबाईने त्यास क्रिश्टनच्या स्वाधीन केले.
बाबुरावला अटक करून चांदा येथे आणण्यात आले व गंभीर आरोप लावून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी सायंकाळी साडेचार वाजता बाबुरावला चंद्रपूर तुरूंगात फाशी दिली गेली. त्याच्या साथीदारांवरही कोर्टाने खटले चालवून काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली, तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. स्थानिक वदंतेनुसार बाबुरावकडे अलौकिक शक्ती होती, त्यामुळे फाशी देताना त्याचा दोर चार वेळेस तुटला. अखेरीस त्यास चुन्यात बुडवून मारण्यात आले. काहींचे असेही म्हणणे आहे की चंद्रपूर कारागृहाच्या बाहेरील मोकळ्या पटांगणातील पिंपळाच्या झाडाला लटकवून त्याला फासावर देण्यात आले.
दरम्यान, बाबुरावचा सहकारी जमीनदार व्यंकटरावने पलायन करून बस्तरच्या राज्यात आश्रय शोधला. तेथे त्याने ब्रिटिशांविरूद्ध फौज जमवण्याचा प्रयत्न केला. परंतु बस्तरच्या राजाने त्याला पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. १८६० मध्ये चंद्रपूर येथे त्याच्यावर खटला चालविला गेला आणि सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. त्याची आई नागाबाई हिच्या मध्यस्थीमुळे त्याला फाशी न मिळता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अखेरीस या प्रदेशातील बंडाचा शेवट झाला. अहेरीची जमीनदार लक्ष्मीबाई हिला तिने केलेल्या मदतीबद्दल ब्रिटिश सरकारकडून 'कम्पॅनियन ऑफ बाथ' हा सम्मान मिळाला व व्यंकटरावची 'अडपल्ली' व 'घोट' येथील ६७ गावांची जमीनदारी बक्षीस म्हणून देण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चंद्रपूरमध्ये कारागृहाच्या प्रांगणात बाबुराव सेडमाकेचे छोटेखानी स्मारक उभारण्यात आले. गोंडवन भागात ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या या क्रांतिवीरास त्याच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
(संकलन व लेखन - अमित भगत)
No comments:
Post a Comment