विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 20 July 2021

छत्रपती संभाजी महाराज यांचे मंचकारोहण...!

 २० जुलै इ.स.१६८०.


छत्रपती संभाजी महाराज यांचे मंचकारोहण...!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे क्रियाकर्म साबाजी भोसले यांचे कडून करून घेण्यात आले होते. ही गोष्ट छत्रपती संभाजी राजांचे पासून लपून राहणे शक्य नव्हते. संभाजी राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त करून रायगडाकडे कूच केले. सोयराबाई राणीसरकार अष्टप्रधान यांनी राजकारण करून संभाजी राजांना राज्य देण्याचे नाकारले होते. आपण स्वतः ज्येष्ठ पुत्र जिवंत असताना साबाजी भोसले यांचे कडून क्रियाकर्म केले याचे अतीव दुःख संभाजीराजांच्या मनात होते. राजाराम महाराजांना गादीवर बसवून राज्यकारभार हाती घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्व सैन्य आणि प्रजा संभाजी राजांच्या बाजुने असल्यामुळे, स्वराज्यावरील आपला हक्क मिळवण्यासाठी संभाजी राजांनी हालचाली सुरू केल्या. मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो संभाजीराजांना पकडण्यासाठी निघाले असताना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास संभाजी राजे यांनी सांगितले. राज्यावर माझा अधिकार असून राजारामा सारख्या दुबळ्या व लहान मुलाला गादीवर बसवले तर शत्रुपक्षाला महाराष्ट्र सहज जिंकून घेता येईल असे त्यांनी पत्रात लिहिले होते.
१९ एप्रिल इ.स.१६८० च्या सुमारास संभाजीराजे पन्हाळ्याला असताना असंख्य सैन्य त्यांना जाऊन मिळत होते. संभाजी राजांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्यास सुरुवात केली होती. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईं राणीसाहेब यांचे बंधू होते, तरीही त्यांचे सहकार्य छत्रपती संभाजी राजांना होते. हे स्वराज्यासाठी पर्यायाने संभाजीराजांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
संपूर्ण कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर संभाजी राजांचे राजपद निर्वेध झाले.कटकारस्थानात सहभागी झालेल्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे या प्रमुख मंत्र्यांना संभाजी राजांनी कैदेत टाकले, तर राजाराम महाराजांनाही नजरकैदेत ठेवले गेले. राजाराम महाराजांना नजरकैदेत ठेवले याचा हेतू पुन्हा त्यांना हाताशी धरून मंत्र्यांनी कारस्थाने करू नये हाच होता. अशा परिस्थितीत कोणताही शासनकर्ता जे करील तेच संभाजी राजांनी केले. संभाजीराजे रायगडावर येऊन आठ दिवस झाले नाहीत तोच दिनांक २७ मे इ.स.१६८० या दिवशी त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई राणी साहेब सती गेल्या.
रायगडावरील परिस्थिती आटोक्यात आल्यावर आणि राज्यात स्थिरता प्राप्त झाल्यावर संभाजी राजांनी स्वतःला राजा झाल्याचे जाहीर केले. संभाजी राजांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याप्रमाणेच महाराणी येसूबाई यांचे पिता पिलाजी राजेशिर्के यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे साथ दिली.पिलाजी राजेशिर्के त्यांनी 10 हजार मावळ्यांनिशी संभाजीराजे रायगडावर जाण्याआधीच रायगडाचा बंदोबस्त केला होता.सर्व चौक्या-पहारे उठवून त्यांच्या लोकांच्या मदतीने सर्व ठिकाणांची व्यवस्था केली.संभाजी राजांच्या सुरुवातीच्या काळात पिलाजी राजेशिर्के हयात असेपर्यंत राजेशिर्के घराणे संभाजी राजांच्या भक्कमपणे पाठीशी ऊभे होते. स्वराज्य प्राप्तीसाठी संभाजी महाराजांना पिलाजीराजे शिर्के यांनी पुरेपूर साथ दिली.
कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर २० जुलै इ.स.१६८० ला संभाजीराजांचा मंचकारोहन विधी पार पडला.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...