शिवकालीन इतिहासातील
राजे लखम सावंत
पोस्तसांभार :एकनाथ वाघ
उदयपूरच्या (उदेपूर) सिसोदिया भोसले घराण्यातील मांग सावंत ( भोसले) हा विजापूरच्या आदिलशाहीत सेवक होता. त्याने आदिलशाहीविरुद्घ बंड करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला आणि कुडाळ परगण्यात होडावडे या गावी स्वतंत्र गादी स्थापन केली (१५५४).आदिलशहा व पोर्तुगीज यांतील लढायांत मांग सावंताच्या वंशजांनी आदिलशहास मदत केली. म्हणून त्यास आदिलशहाने ‘सावंत बहादर’ असा किताब दिला. पुढे मांग सावंताचा नातू खेम सावंत यांनी आदिलशाहीकडून देशमुखी मिळविली (१६२७). तेच सावंतवाडी संस्थानचे राज्यसंस्थापक होते. त्यांना सोम,फोंड व लखम असे तीन मुलगे होते. खेम सावंत यांनी १६४० पर्यंत देशमुखी उपभोगली. त्यानंतर सोम व फोंड यांनी देशमुखी उपभोगली (१६४१–५१). पुढे त्यांचा धाकटा भाऊ लखम सावंत ( १६५१–७५) गादीवर आला. याने छत्रपती शिवाजी महाराजांना कडवी झुंज दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी संस्थानचे राजे लखम सावंत यांच्यात दोनवेळा मोठ्या लढाया झाल्या. यातील एक लढाई महाराज तर दुसरी सावंतवाडी संस्थानने जिंकली. त्या काळात ही दोन स्वतंत्र सत्तास्थाने होती. त्यामुळे या संघर्षाकडे दोन राज्यांमधील तत्कालीन स्थितीनुसार झालेला संघर्ष असेच बघावे लागेल. या लढाया होवूनही त्यांच्यात झालेला तह मराठ्यांचे राज्य स्थापन व्हावे, या मुद्द्यावर झाल्याचे दिसते.
यांच्या कारकीर्दीत सावंतवाडी संस्थान खऱ्या अर्थाने ताकदवान राज्य म्हणून उदयाला येत होते. सावंत-भोसले घराण्याने कुडाळच्या परगण्यावर वर्चस्व मिळवून दक्षिण कोकणात दबदबा निर्माण केला. याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केले होते. कोकण त्यांच्यासाठीही महत्त्वाचे होते. कारण या भागात अनेक दुर्गम आणि जिंकण्यास कठिण असणारे किल्ले होते. शिवाय समुद्र असल्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने कोकण महत्त्वाचे होते. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युध्दकौशल्यात कोकणातील दुर्गम भौगोलिक स्थिती उपयोगी पडणारी होती. महाराजांनी कोकणातील विजापूरच्या बादशहाकडे असलेला भाग जिंकून घेत आपली सत्ता स्थापन करायला सुरूवात केली. लखम सावंत यांनी विजापूरच्या बादशहाला आपण महाराजांकडून कोकण प्रांत सोडवून देतो अशी ग्वाही दिली. बादशहाने त्यांना खवास खान नावाचा एक सरदार दहा हजाराच्या फौजेसह मदतीला पाठवला. मागून बाजी घोरपडे-मुधोळकर हे १५०० स्वारांसह खवास खानाच्या मदतीला येत होते. शिवाजी महाराजांना हे कळल्यामुळे त्यांनी बाजी घोरपडेंना वाटेतच गाठून ठार केले. खवास खानाचाही गनीमीकावा वापरून पराभव केला. यामुळे तो पळून गेला. यानंतर शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात सैन्य घुसवून लखम सावंत यांच्या ताब्यातील ठाणे किल्ले ताब्यात घ्यायला सुरूवात केली.
No comments:
Post a Comment