विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 28 July 2021

शिवकालीन इतिहासातील राजे लखम सावंत भाग २

 

शिवकालीन इतिहासातील
राजे लखम सावंत
पोस्तसांभार :एकनाथ वाघ



भाग २
अखेर लखम सावंत आणि त्यांचे पुतणे खेम सावंत हे गोव्यातील पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले. महाराजांनी पोर्तुगिजांवरही हल्ला करून त्यांचा फोंडा येथील मजबूत गड ताब्यात घेतला. त्यामुळे नरमलेल्या पोर्तुगिजांनी महाराजांशी तह करत त्यांना तोफा नजराणा म्हणून दिल्या. त्यामुळे लखम सावंत यांना आश्रय देणे पोर्तुगिजांसाठी कठिण बनले. शेवटी लखम सावंत यांनी पितांबर शेणवी यांना शिवाजी महाराजांकडे वकील म्हणून पाठवले. मराठी राज्याची स्थापना करण्याचा दोन्ही राजांचा समान हेतू असल्यामुळे शिवाजी महाराजांनी तह करण्याचा निर्णय घेतला. अखेर एप्रिल 1659 मध्ये शिवाजी महाराज आणि लखम सावंत यांच्यात तह झाला. त्यानुसार महाराजांनी कुडाळ प्रांतात घेतलेले किल्ले आणि ठाणी सावंत यांच्या स्वाधिन केली. सावंत यांनी या प्रांताच्या वसुलीतून दरवर्षी सहा हजार होन घेवून तीन हजार इतकी फौज ठेवावी आणि गरज असेल तेव्हा महाराजांना मदत करावी असे ठरले. त्यानुसार लखम सावंत यांना कुडाळची देशमुखी आणि सावंत बहादर हा किताब देण्यात आला. याचवेळी महाराजांनी लखम सावंत यांचे सरदार राम दळवी आणि तान सावंत यांना एक एक हजार स्वारांची मनसबदारी दिली.
आपले तीन सरदार कुडाळ प्रांताच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमले. नंतर मात्र हा तह फार काळ टिकला नाही. लखम सावंत यांनी विजापूरच्या बादशहाशी पुन्हा सलोखा केला. त्याकाळात तळकोकणात विजापूरकरांचा अजीजखान सरनोबत हा सुभेदार होता. सावंत यांनी त्याला मदत करून कुडाळ प्रांतातील शिवाजी महाराजांची सर्व ठाणी उठवली. अजीजखानने विजापुरच्या बादशहाकडे लखम सावंत यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. यामुळे बादशहाने 1664 मध्ये मालवण येथील हक्क लखम सावंत यांना बहाल केले. पुढच्या काळात कुडाळ परगण्याची सुभेदारी (नाडगौडकी) देवून मसुरे, पेंडूर, घावनळे, मळगाव, मठ, होडावडे, आरवली, रेडी व आरोंदा हे भाग लखम सावंत यांना इनाम म्हणून दिले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...