विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 July 2021

मराठेशाहीतील सरखेल कान्होजी आंग्रे

 



मराठेशाहीतील सरखेल कान्होजी आंग्रे -

यांचे मूळचे आडनांव सकपाळ. हे अस्सल क्षत्रिय असून यांचे मूळ ठिकाण हर्णेंजवळील आंगरवाडी होय. यांच्या आजीचें नांव सेखोजी व बापाचें तुकोजी आंग्रे. तुकोजीला शिवाजीच्या आरमारांत २५ असामींची सरदारी होती. तेथें त्यानें नांवलौकिकहि मिळविला होता. इ.स. १६९० च्या सुमारास कान्होजी आंग्रे हा सिधोजी (भिवजा) गुजर याच्या हाताखालीं सुवर्णदुर्गाचा सरनोबत म्हणून मराठ्यांच्या आरमारांत काम करीत होता. संभाजीच्या कारकीर्दीत याच्या कर्तृत्वास प्रारंभ झाला; त्यावेळीं हा फिरतें आरमार घेऊन कोंकणकिनार्याचा बंदोबस्त करीत होता, असा उल्लेख बखरीत सापडतो. म्हणजे, इ.स. १६८० पासून १६८९ पर्यंतच्या कालांत कान्होजी हा उदयास येत चालला होता. इ.स.१६८० च्या पूर्वी कान्होजी शिवाजीच्या आरमारांत असला पाहिजे हें उघड आहे. संभाजीच्या वेळी माणकोजी मराठे, उदाजी पडवळ, सुभानजी खराटे व भिवजी गुजर हे खांदेरी, सागरगड, राजकोट व कुलाबा ह्या चार बंदरी किल्ल्यांवर अंमलदार होते. कान्होजी आंग्रयाकडे ह्यावेळी कोणता बंदरी किल्ला होता तें समजत नाही. इ.स. १६८९ नंतर माणकोजी मराठे, उदाजी पडवळ व सुभानजी खराटे आपले अंमल सोडून प्रबळगडास गेले व त्यांच्या जागीं भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे हे दोघे राहिले. मुख्य सत्ता उध्वस्त झाली असतां, स्वतःच्या कर्तबगारीनें शत्रूला तोंड देण्यार्या अनेक मराठा सरदारांपैकीं कान्होजी असल्यामुळें, त्याला उदयास येण्यास ही वेळ उत्तमोत्तम मिळाली. मोगल व मराठे यांच्यांत इ.स. १६८९ त लढाई होऊन इ.स. १६९१ त ह्या दोनही सत्ताधार्यांमध्ये तह होऊन कोकणात दुतर्फा अंमल कायम झाला. पुढें सन १६९८ त कान्होजी आंग्रयाचें व सिद्दीचें मोठें कडाक्याचें युद्ध झालें.
संभाजीच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या झगड्यांचा बराच भाग कोंकणांत घडल्यामुळें लढाईचें बहुतेक ओझें आंग्रयांवर होतें. त्यांच्या ताब्यांतील बहुतेक प्रदेश व किल्ले मोगलांनी जिंकिले; शेवटी तह होऊन मराठे सरदार व मोगल यांनी तिकडचा वसूल निम्मेनिम वाटून घेतला. तेव्हां भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे हे कुलाबा व खांदेरी येथें येऊन राहिले. त्यांत गुजर हा मुख्य असून कान्होजी हा त्याच्या हाताखालीं होता. पुढे राजाराम जिंजीकडे जाऊन मोंगलांस शह देत असतां कान्होजीनेंहि समुद्रकिनार्यावर आपली सत्ता वाढवून मोंगलांस हांकून लावण्याचा क्रम चालविला. कोंकणचा सुभा व आरमारचा अधिकार संभाजीनें भिवजी उर्फ सिधोजी गुजर याजकडे दिला होता. त्याच्या हाताखाली कान्होजी आंग्रे हा होता. 'शहाणे ! शूर, मर्द जाणोन राजारामानें आंगरे यास सुवर्णदुर्गी ठेविलें. त्यांनी तेथें राहून बहुत खबरदारीनें सर्व जंजिरे व प्रांत राखिला; कांही किल्ले व ठाणीं पातशाहींत गेली ती जवामर्दीनें घेतलीं. झाडींतून हिंडणें, स्वार्या करणें, खराब केलेले व मोडलेले किल्ले नीट करून स्वारी-शिकारी करणे, असे बहुत कर्ते त्याजवरून महाराज (राजाराम) चंदीहून आल्यावर, त्यांनी सर्फराजी करून, कान्होजीस 'सरखेल हा किताब दिला.' सारांश, मराठेशाहीवरील भयंकर आपत्तीत कान्होजी आंग्रयानें पश्चिम किनार्यावरील मराठ्यांच्या सत्तेचें उत्तमप्रकारें सरंक्षण केलें होतें. सर्व राष्ट्रांच्या गलबतांवर तो हल्ले करी. त्रावणकोरपासून मुंबईपावेतो एकंदर किनार्यावर कान्होजीची छाप बसली नाहीं असें एकहि ठिकाण नव्हतें. या किनार्यावरचे सर्व किल्ले त्यानें मराठ्यांच्या ताब्यांत ठेविले. सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथें आरमारासंबंधींच्या सर्व साहित्याची कोठारें असून कुलाबा हें आरमाराचें मुख्य ठाणें होतें. खांदेरी व उंदेरी येथेंहि ठाणीं होतीं.
इ.स. १६९७-९८ च्या सुमारास भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे यांचा आपसांत कांही तंटा लागला व आंग्रयानें गुजर यास अटकेंत ठेविलें. पुढें गुजर लवकरच वारला व आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा अधिपति झाला. तेव्हांपासून त्याचा प्रतिकार करण्याकरितां इंग्रज, फिरंगी व मुसुलमान हे त्रिवर्ग एकत्र जमून आंग्रयांशी युद्ध करूं लागले. त्यांत मुसुलमानांनी थोडक्याच दिवसांत आंग्रयाशी तह करून युद्धांतून आपलें अंग काढून घेतलें. इंग्रज व आंग्रे यांचा हा झगडा पुढें विशेष जोराने चालला, त्यावरूनच आंग्रयांची खरी योग्यता दिसून येते.
राजारामाच्या पुढची कान्होजीची कच्ची हकीकत उपलब्ध नाहीं. इतकें मात्र समजतें कीं, ताराबाईला या शूर पुरुषाचा फार उपयोग झाला व किनार्यावरची बाजू, सिद्दी वगैरे परशत्रूंशीं अव्याहत झगडून त्यानें उत्तम प्रकारें संभाळिली. शाहु छत्रपति राज्याधिष्ठित झाल्यावर ताराबाईनें जे कित्येक सरदार आपणाकडे वळविले, त्यांपैकी कान्होजी हाहि एक होय. तो बरेच दिवसपर्यंत ताराबाईच्या पक्षानें लढत होता.
बाळाजी विश्वनाथास शाहूनें कृष्णराव खटावकरावर पाठविलें, त्यावेळेस कान्होजी आंग्रयानें कोंकणांत ताराबाईच्या तर्फेनें बराच उच्छेंद मांडिला होता. सांवतवाडीपासून मुंबईपर्यंतची कोंकणपट्टी त्याच्या ताब्यांत असून शिवाय अलीकडे मुंबईच्या उत्तरेकडील पेशव्यांच्या ताब्यांतील कल्याण प्रांत काबीज करून, राजमाची, लोहगड वगैरे घाटमाथ्यावरचे किल्लेहि त्यानें हस्तगत केले होते. त्यांच्या बंदोबस्ताकरितां शाहूनें बहिरोपंत पिंगळे (पेशवा) यास फौज देऊन पाठविलें (सुमारें सन १७१३). आंग्रयानें त्याचा पराभव करून त्यास लोहगडावर कैदेंत ठेविलें. इतक्यांत बाळाजी खटावकराच्या मोहिमेहून परत आल्याबरोबर त्यास शाहूनें बरीच मोठी फौज देऊन आंग्रयावर पाठविलें. त्यावेळीं लोहगडाखालीं लोणावळ्याजवळचें वलवण म्हणजे ओलवण येथें कान्होजी आंग्रे लोहगडावरून येऊन बाळाजीस भेटला आणि पुढें तह होऊन लोहगड पेशव्यास मिळाला. बाळाजीनें बहिरोपंताची सुटका केली व शाहूच्या पक्षास कान्होजीस वळवून घेतलें.
पेशवाईच्या बखरींत ह्या प्रकरणासंबंधानें असें म्हटलें आहे कीं, ''बाळाजी विश्वनाथाचा व आंग्रे यांचा कागदोपत्री घरोबा असल्यामुळें लोहगडाखालीं आल्यावर बाळाजीपंत नानांनीं आंग्रे यास पत्र लिहून पाठविलें व दरमजल करीत कुलाब्यास गेले. 'सरखेल' पुढें सामोरे येऊन भेटीचा समारंभ झाला. पेशव्यांनीं त्यांस सांगितलें कीं, 'तुमचा आमचा भाऊपणा. पेशवाई तुमच्या घरांत. आयते किल्ले देत असाल तरी तसेंच सांगावें. सरखेलीचें पद ताराबाईकडून आहेच; इकडूनहि करार करून देववितोंच. महाराजांचे चाकर होऊन कृपा संपादून घ्यावी. त्याजवरून त्यांनीं मान्य करून राजमाची मात्र ठेवून, लोहगड व धनगड व तुंगतिकोना या किल्ल्याच्या चिठ्या देऊन किल्ले देवविले. जंजिरेकर हबशाचा व आंगरे यांचा कलह लागला होता तो तह करून दिला.
पेशव्यांनी महाराजांकडून कान्होजी आंगरे यांस सरखेलीचें पद करार करून वस्त्रें व शिक्केकटार पाठविली. तह झाला त्याची कलमें :- (१) खांदेरी, कुलाबा, वगैरे दहा मोठे किल्ले व बहिरवगड, कोटला वगैरे सोळा लहान ठिकाणें व गढ्या, त्याखालील प्रदेशांसह इतकी कान्होजीला दिलीं. (२) आरमाराचा अधिकार व सरखेल पदवी कान्होजीकडे कायम केली. (३) वरील कलमांत सांगितलेल्या मुलखाशिवाय बाकी सर्व नवीन जिंकलेला प्रदेश व ठाणीं कान्होजीनें सोडून दिलीं. (४) त्यानें संभाजीचा पक्ष सोडिला व कायमपणें शाहूच्या पक्षांत राहिला. राजमाची किल्ला तेवढा आंगरे यांजकडेच ठेविला. या तहान्वयें मुंबईपासून खारेपाटणपर्यंत सर्व मुलूख शाहूकडून आंग्रयास मिळाला. वरील तहानें जंजिरेकर सिद्दीशीं त्याचा कांहीं प्रांत आंग्रयाकडे आल्यानें आंग्रयाचा तंटा लागला. तेव्हां कान्होजीनें बाळाजीच्या मदतीनें लवकरच त्याला वठणीवर आणिलें (१७१३). गेल्या दहाबारा वर्षांत हबशानें कोंकणांत बरेच प्रांत हस्तगत केले होते ते परत घेण्यास बाळाजीनें आंग्रयास मदत दिली, तेव्हां थोडा बहुत झगडा होऊन सिद्दी व आंगरे यांचाहि तह ठरला (सन १७१५, जानेवारी). आठ महाल सिद्दीच्या ताब्यांत होते, त्यांचा निम्मा वसूल शाहूच्या कमावीसदारांनीं घ्यावा असें ठरलें.
कान्होजी व शाहुछत्रपति या उभयतांची भेट इ.स. १७१८ त जेजुरीस मोठ्या समारंभानें झाली. महाराजांनीं आंगर्याचा सन्मान केला. बादली चादर घातली; आंगर्यानीं नजर केली. बंदरी जिन्नस उत्तम पदार्थ बहुत आणिले, ते सर्व व खजिना महाराजांस नजर केला. जेजूरीस शिमगी पौर्णिमा झाली. प्रतिपदेस कूच होऊन निघाले. तेव्हां आंगरे यांनी पांच रंगांचा गुलाल व रंगीत सामान बहुत आणिलेलें, दरकूच हत्तीवर रंग व गुलाल भरून खेळत सातारा येऊन पावले. जेजुरीपासून सातार्यापर्यंत रस्ता गुलालांनीं भरला. महाराजास डेर्यास नेऊन पंचमीस समारंभ करून वस्त्रें, जवाहीर, हत्ती, घोडे ऐसें देऊन अष्टप्रधान सरदार दरखदार सुद्धां वस्त्रें देऊन मेजवानी केली. सुभ्याच्या सनदा व महाराजांनी बहुमान दिला तो घेऊन आंगरें परत गेले. (स.१७१८).
या सुमारास कान्होजीनें इंग्रजांस त्रास देण्यास सुरूवात केली. कोंकण किनार्यावर आलेल्या सर्व जहाजापासून (मग ती कोणत्याहि राष्ट्राचीं असोत) तो ''चौथ'' वसूल करी व त्यांचा झाडा घेई. नंतर त्यास आपला कौल (परवाना) देई हें इंग्रजांस खपेना. त्यांच्या त्या वेळच्या हकीकती व आंग्रयावर दांत-ओंठ खाऊन त्यांनी पाखडलेलीं आग या गोष्टी वाचल्या म्हणजे कान्होजीच्या कामगिरीची कल्पना होते. त्याचा एक मासला पुढें दिला आहे :-
''दर्यावर लूट करणार्या ह्या सरदाराची हांव विजयदुर्ग हस्तगत करूनच थांबली नाही. पोर्तुगीज व इतर व्यापार्यांस घालवून देऊन पश्चिम किनार्यावर बंदरें व किल्ले बांधून तो एक स्वतंत्र राजाच बनला (अलिबागचा व माणिकगडचा किल्ला कान्होजीनेंच बांधला). एकदां सुंदर आरबी घोड्यांनीं भरलेलें एक जहाज सहजगत्या त्याच्या हस्तगत झालें. तेणेंकरून नवीन घोडेस्वरांची फौज त्यानें तयार केली. हिंदु, मुसुलमान, डच, पोर्तुगीझ, फ्रेंच इत्यादि अठरापगड जातींचे लोक रक्तानें डागळलेल्या या चोराच्या निशाणाला मान देत. अर्थात असे लोक म्हणजे निष्ठुर व बेपर्वा असावयाचें. त्यांस बर्यावाइटाची चाड थोडीच असणार.'' एकंदरींत मराठी राज्याच्या तर्फेनें आंग्रे हा पश्चिम किनार्याची रखवाली करीत असतां, त्याजकडून पाश्चात्यांच्या मनमुराद संचाराला अडथळा होई म्हणून हे लोक त्याच्या नांवानें असे खडे फोडीत.
'पश्चिम किनार्यावर आमच्या अनिरुद्ध संचारास अडथळा करील त्याची मी खोडकीच जिरवणार', असा बून नांवाच्या इंग्रज गव्हर्नरानें आपला निश्चय प्रगट करून दोन वर्षांच्या आंत नऊ उत्कृष्ट लढाऊ जहाजें मुंबईच्या बंदरांत नवीन तयार केलीं. या सर्वांवर मिळून १४८ तोफा व साडेबाराशें लढाऊ खलाशी होते. यांशिवाय जमिनीवरून लढण्यास अडीच हजार यूरोपियन व दीड हजार एतद्देशीय फौज मुद्दाम विजयदुर्ग वगैरे आंग्रयाचे किल्ले पाडाव करण्यासाठी तयार केली. या सुमारास कान्होजीनें इंग्रजांचें एक प्रचंड लढाऊ जहाज (ससेक्स) धरून नेलें (१७१७). त्यामुळें बून इंग्रज फार चिडला व त्यानें ता. १७ एप्रिल स. १७१७ रोजी वरील जंगी आरमार विजयदुर्ग किल्ल्यावर आणलें. तेथें किल्ला हस्तगत करण्याचा त्यानें कसून प्रयत्न केला. परंतु कान्होजी आंग्रयाच्या मारापुढें नामोहरम होऊन मुठींत नाक घेऊन त्याला आरमारासह मुंबईत परत यावें लागलें. इंग्रजांचे दोनशें लोक मेले व तीनशें जखमी झाले. पुढें आणखी दोन नवीन जहाजें बांधून पुनः दीड वर्षांनें बूनने खांदेरीवर आरमार पाठविलें. पण तेथेंहि चांगला मार खाऊन आरमार परत मुंबईस आलें. वरील दोन प्रसंगांनी आंग्रयाचा जोर जास्तच वाढला व या दोन पराभवांची बातमी विलायतेस जाऊन तेथील अधिकार्यांस ज्यास्तच चेव आला. त्यांनी राजाची मनधरणी करून मुंबईस जास्त मदत पाठविली. अॅडमिरल मॅथ्यूझच्या हाताखालीं हें आरमार सप्टेबर १७२१त मुंबईस आलें. पोर्तुगीझ लोकांचीहि या प्रसंगीं त्यांनी मदत मिळविली. जय्यत तयारी करून त्यांनी या वेळीं अलीबागचा किल्ला व कुलाबा यांजवर जलमार्गानें व खुष्कीनें हल्ला केला (इ.सन १७२२). परंतु पूर्वीप्रमाणेंच त्यास ह्या प्रसंगीहि हार खावी लागली. सन १७२४ मध्यें डच लोकांनी कान्होजीपासून विजयदुर्ग घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचाहि हल्ला निष्फळ झाला. कान्होजीचा व सिद्दीचा तह झाल्यापासून दहा वर्षेपर्यंत त्या दोघांची गोडी होती. तत्पूर्वी सिद्दी रसूल याकूबखान याचा व कान्होजीचा कैक वर्षे झगडा चालला होता. सन १७२५-२६ च्या सुमारास निजामानें सिद्दीची उठावणी केल्यामुळें त्याचा बंदोबस्त करण्याविषयीं बाजीरावास व कान्होजीस शाहूची आज्ञा झाली. परंतु कान्होजीनें तें काम एकदम अंगावर घेतलें नाही. त्यानें शाहूस असें कळविलें की, 'हुजुरून साहित्य गनिमास नतीजा पाठवावयाचे होत नाही; स्वामींनी आपले स्थळास दुसरा पाठवून आपणास मामल्यापासून मुक्त करावें (१७२६).' याच सालच्या दसर्याच्या दिवशी कान्होजी सातार्यास जाऊन शाहूस भेटला. यावेळी कान्होजीनें इंग्रजांची अनेक जहाजें धरली होतीं. सन १७२७ मध्यें त्यानें डर्बी नांवाचे एक ईस्ट इंडिया कंपनीचें मालानें भरलेलें जहाज पकडून नेलें. कान्होजी आंगर्याचें समुद्रकिनार्यावरील सर्व किल्ले त्याकाळी अजिंक्य समजले जात होते. कान्होजी आंग्रे जिवंत असेपर्यंत पाश्चात्यांचा शिरकाव पश्चिम किनार्यावर झाला नाही.
कान्होजी हा इ.स.१७२९ त मरण पावला. तो अंगाने स्थूल, वर्णानें काळा व बांध्यानें मजबूत होता. त्याचा चेहरा उग्र व डोळे पाणीदार होते. त्याचे हुकूम कडक असून ते मोडणारास जबरदस्त शिक्षा होत असे. एरवी हाताखालच्या लोकांशीं तो फार उदारबुद्धीनें, ममतेनें व बरोबरीचा नात्यानें वागे.
कान्होजी आंग्रे हा बंदुका, दारूगोळा व इतर लष्करी सामुग्री यांच्या रूपानें पेशव्यांनां मदत करी आणि यूरोप व चीनमध्यें तयार झालेल्या मालांचे नजराणेहि वारंवार त्यांच्याकडे आणि छत्रपतीकडे पाठवा.
इंग्रजांनीं कान्होजीस चांचा म्हणजें आहे. पण त्यावेळीं पोर्तुगीज, डच व खास इंग्रज हेहि चांचेगिरी करीत. डग्लस म्हणतो कीं, ''मराठे चांचे दुष्ट तर खरेंच, पण इंग्रज चांचे त्यांच्याहिपेक्षां जास्त दुष्ट होते. कारण इंग्रजांचे ज्ञान मराठ्यांपेक्षां जास्त असून त्यांची भूकहि जास्त होती. इंग्रजांचा तो (चांचेगिरीचा) पिढिजात धंदा होता. मराठे तर नवशिके होते. किड, एव्हरी व ग्रीन हे इंग्रज गृहस्थ तर अट्टल चांचे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा दरारा खुद्द इंग्रजांसहि होता.'' कान्होजीचा दरारा इंग्रजांस इतका बसला होता की, आरबी समुद्रांतून येणारीं इंग्रजांची जहाजें किनार्यावर सुखरूप आणण्याबद्दल आंग्रयांचे वाटाड्यांस ५ हजार रु. बक्षिस देण्याचा कंपनीचा रिवाज पुढें पुष्कळ दिवस चालू होता. त्याच्या वाटेस कोणी जात नसे. त्याच्या अनियंत्रित दर्यासत्तेस जो कोणी अडथळाकरी त्यास तो पोत्यांत घालून सारगरगडच्या बुरूजावरून खालीं दर्यांत फेकून देई. कान्होजीस सेखोजी, संभाजी, येसाजी, मानाजी, तुळाजी, धोंडजी असे सहा पुत्र होते. यांपैकी येसाजी व धोडजी हे लेकवळे होते. त्याच्या मरणानंतर या भावांत तंटे लागून आंग्रे घराण्याची वाताहात झाली. (डफ; म.रि.म.वि; शाहूमहाराज ब.,रा.खं. ४, डग्लसची मुंबई, व्हिक्टर सरीझचें हिंदुस्थान, इ.ऐव्हिती अंक २६, २७ कैफी).

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...