विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

मराठेशाहीतील झुंझार मराठा वीर चिमणाजीआप्पा

 


मराठेशाहीतील झुंझार मराठा वीर चिमणाजीआप्पा

चिमणाजीआप्पा — हा बाळाची विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा पुत्र. याच्या जन्माचे १६९० (राजवाडे), १६९७ (अ. कोशकार) व १७०८ (सरदेसाई) असे निरनिराळे सन आढळतात. दमाजी थोराताच्या कैदेंत बापाबरोबर चिमणाजी कांहीं दिवस होता (१७१३). पेशवाई मिळाल्यानंतर थोरल्या बाजीरावानें मोगलांच्या विरुद्ध जें चढाईचें धोरण स्वीकारलें, त्यांत माळवा प्रांतीं मुलुखगिरी करण्याच्या कामावर पेशव्यांनीं चिमणाजी आप्पास नेमिलें. तेव्हांपासून आप्पा स्वार्यांमोहिमांवर जातीनिशी जाऊं लागले. सारंगपूर येथें राजा गिरधर, माळव्याचा सुभेदार याच्यावर स्वारी करून आप्पानीं त्यास ठार मारिलें (१७२४). तसेंच आप्पांनीं त्याच्या नंतरच्या माळव्याचा सुभा दयाबहादुर याच्यावरहि १७३०/३१ त दोन स्वार्या करून त्याला तिरलच्या लढाईंत ठार केलें व माळवा हस्तगत केला (आक्टो. १७३१). परंतु शाहूच्या आज्त्रेनें आप्पा माळव्यांतून निघून शिद्दीवर कोंकणांत गेले. सरबुलंदखानापासून त्यांनीं १७३० त गुजराथेंत चौथाईचा अंमल बसविला. त्रिंबकरावदाभाडे यांच्या पारिपत्याच्या प्रकर्णी बाजीराव व आप्पा यांचें ऐकमत्य होतें (१७३१), पुढें (१७३३) शिद्दीवरील स्वारींत प्रतिनिधीच्या मदतीस आप्पा यास जाण्याबद्दल शाहूनें आज्त्रा केली; परंतु शिद्दीच्या तर्फे निजामानें कारस्थान चालविल्यामुळें, निजामावर दाब ठेवण्यासाठीं आप्पा शिद्दीवर गेल्यानें व सेखोजी आंग्रे मरण पावल्यानें आप्पा हे शिद्दीच्या विरुद्ध आक्टोबरांत कोंकणांत चढाई करून गेले (१७३३). मराठ्यांचें निजामाशीं युद्ध चालूं असतां तापी नदीच्या आसपास निजामाला पायबंद म्हणून आप्पा फौजबंद होऊन राहिले होते (१७३८). यापुढें वसईच्या मोठ्या मोहिमेंत आप्पा प्रमुख होते. ही मोहीम दोन वर्षे चालू होती. प्रथम ठाणें व साष्टी काबीज केली (१७३७ जून). यावेळीं आप्पानीं बेलापूर, मांडवी, टकमक, कामणदुर्ग, मनोर वगैरे पुष्कळ ठाणीं फिरंग्यांपासून घेतलीं. फिरंग्यांच्या धार्मिक जुलुमानें कंटाळलेली अंताजी रघुनाथ व अणजूरकर नाईक वगैरे प्रांतस्थ प्रमुख मंडळी मराठ्यांस अनुकूल झाली होती. फिरंग्यांचें आरमार व सैन्य सुसज्जित असतांहि मराठ्यांनीं चिकाटीनें व शौयानें वसईसह त्यांचा वरील सर्व प्रदेश काबीज केला. पुढें (१७३८) फिरंग्यांनीं त्या प्रांतीं असलेल्या शंकराजी केशव, रामचंद्र हरि वगैरे सरदारांवर जय्यत तयारीनिशी मोहिम केली. परंतु या सुमारास मराठे भोपाळच्या मोहिमेंत गुंतल्यानें वसईभागांत त्यांनां फारशी हालचाल करतां आली नाहीं. त्यानंतर १७३८ च्या नोव्हेंबरांत आप्पा वसईच्या स्वारीवर निघाले. सहा महिने या स्वारीचा हंगाम चालू होता. दमण ते दीवपर्यंतचा सर्व किनारा त्यांनीं हस्तगत केला. या भागांत सर्वत्र चकमकी सुरू होत्या व आप्पा या सर्व किनार्यावर एकसारखे लढत होते. त्यांनीं प्रथम माहीम सर केले (डिसेंबर). येथें शंभर गलबतें भरून इंग्रज व हबशी यांची मदत फिरंग्यास झाली असतांहि मराठ्यांनीं माहीम काबीज केलें. नंतर केळवें, शिरगांव, डहाणू, अशेरी वगैरे ठाणीं घेतलीं. (जानेवारी १८३९). या सर्वांत तारापूरचें ठाणें मजबूत असल्यानें तेथें शिताफीचा रणसंग्राम झाला. पण अखेर तारापुरचा किल्ला मराठ्यांनीं घेतला. मात्र येथें बाजी भिवराव हा नामांकित सरदार ठार झाला (जाने.). नंतर आप्पानीं वसईवर हल्ला केला. हा वेढा तीन महिने चालू होता. मराठ्यांनी अत्यंत चिकाटीनें युद्ध चालवून हा किल्ला अखेर १३ मे रोजीं फिरंग्यांपासून काबीज केला (वसई पहा). दुसरीकडे वांदरा, वेसावे, धारावी वगैरे ठाणीं आप्पांच्या सरदारांनीं काबीज केलींच होतीं (फेब्रु). वसईच्या मोहिमेचीं खास अप्पानीं ब्रम्हेंद्रस्वामीस लिहिलेलीं पत्रें वाचण्यालायक आहेत. (राजवाडे खं. ३ ले. २७; काव्येतिहास सं. पत्रें यादी ले. ४३९). सारांश या मोहिमेंत फिरंग्यांचा सुमारें पाऊणशें मैल लांबीचा (३४० गावें असलेला) प्रदेश आप्पानीं काबीज केला. त्याशिवाय ८ शहरें, २० किल्ले, २५ लाख किंमतीचा दारूगोळा व जहाजें, तोफा इतकें सामान आप्पानीं हस्तगत केलें. यावेळीं आप्पानें अगर पेशव्यानें वसईस मराठी आरमाराचा एक सुभा स्थापून इंग्रजास पायबंद घालावयास पाहिजे होता, परंतु हें त्या दोघांच्याहि लक्ष्यांत आलें नाहीं. पुढें पेशव्यांचें निजामाशीं युद्ध झालें त्यांत आप्पाहि सामील होतें (१७४०). त्यावेळी मुंगीपैठणचा तह होऊन आप्पा परतले. इतक्यांत आंग्र्यांच्या घरांत कलह माजला व मानाजीनें मदतीस बोलाविल्यावरून आप्पा कोंकणांत गेले व त्यांनीं तेथें संभाजी आंग्र्यांचा पराभव करून त्याला सुवर्णदुर्गास परतविलें (१७४०). इतक्यांत थोरले बाजीराव वारल्यानें आप्पा बरोबर नानासाहेबांस घेऊन, पुण्यास व तेथून सातार्यास गेले व त्यांनीं नानासाहेबास पेशवाईचीं वस्त्रें मिळवून दिलीं. (आगष्ट १७४०). बाजीरावाचें व आप्पाचें शेवटी शेवटीं बिनसलें असावें. ''श्रीमंत (मस्तानीमुळें) विषयलंपट झाले, यामुळें आप्पाशीं अंतर पडून नर्मदातीरीं गेले.'' आप्पानीं १७४० च्या जानेवारींत फिरंग्याचें रेवदंडा नांवाचें (गोवें व दमण या मधील) राहिलेलें एकच ठाणें काबीज केलें. येथून परत आल्यावर आप्पांची प्रकृति वाख्यानें ढासळली. आप्पांची पहिली बायको रखमाबाई, ही त्रिंबकरावमामा पेठेची बहीण होती. हिचाच पुत्र सदाशिवराव भाऊ. भाऊचा जन्म झाल्यानंतर २८ दिवसांनींच ही वारली (३१-८-१७३०) त्यानंतर आप्पानीं अन्नपूर्णाबाई नांवाची दुसरी स्त्री केली (डिसें. १७३१). हिला बयाबाई नांवाची एक मुलगी झाली (नोव्हें. १७४०). आप्पांची प्रकृति एकदां बिघडली ती न सुधारतां अखेर पुणें येथें त्यांचें देहावसान झालें (डिसें. १७४०) त्यावेळीं अन्नपूर्णाबाई ही सती गेली. या और्ध्वदेहिकास ११७५ रु. खर्च झाला. बयाबाई ही गंगाधर नाईक यास दिली (१४ एप्रिल १७४५); ती पुढें १७५९ त वारली. आप्पा हे थोरल्या बाजीरावापेक्षां कांहीं बाबतींत श्रेष्ठ होतें. त्यानीं बाजीरावास त्याच्या दोषांवर पांघरूण घालून शेवटपर्यंत पाठपुरावा केला. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हांच आप्पांस त्यांची मुतालिकी मिळाली होती. आप्पा विचारी, धोरणी, मनमिळाऊ, शूर व नीतिमान होते. वसईच्या किल्ल्यांत सांपडलेल्या फिरंगी सरदाराच्या सुस्वरूप मुलीस त्यांनी सन्मानानें परत पाठविलें ही गोष्ट प्रख्यातच आहे. शाहू व इतर सरदार मंडळी बाजीरावाकडील काम आप्पांच्या मध्यस्तींनें उरकून घेत. बाजीरावाचीं मुलें बहुधा आप्पाजवळच असत. त्यांनां शिक्षणहि आप्पांनींच दिलें होतें. कौटुंबिक व्यवस्थाहि तेच पहात असत. बाजीरावानें उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल आप्पाच लावीत. नानासाहेबांच्या अंगी जो अष्टपैलु मुत्सद्दीपणा आला होता त्यांचे श्रेय आप्पांसच होतें. आप्पानां गुजराथी लोक चिमणराजा म्हणत असत. डफ म्हणतो कीं पोर्तुगीजांवर मिळविलेल्या अनेक विजयांमुळें आप्पांची कीर्ति महाराष्ट्रांत अजरामर झाली. पाश्चात्य राष्ट्रांशीं लढण्याचे वारंवार प्रसंग आल्यानें त्यांचें असें ठाम मत झालें होतें की तोफखाना व कवायती पायदळाशिवाय पाश्चात्यांबरोबर टिकाऊ जय मिळणें नाहीं. [डप. पु.१, २; मराठी रिसायत, मध्यविभाग; नानासाहेब रोजनिशी; पत्रें यादी वगैरें; ब्रह्मेंद्र स्वामीचरित्र: राजवाडे खं. २, ३; शाहू म. ची बखर; पंतप्रधान शकावली, पृ.७].

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...