चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
हे राघोबादादाचे व आनंदीबाईचे धाकटे औरस पुत्र. यांचा जन्म ता. ३० मार्च १७८४ रोजीं कोपरगांवीं झाला. राघोबादादा वारले तेव्हां चिमणाजीआप्पा यांच्या वेळीं आनंदीबाई चार महिन्यांची गरोदर होती. धाकटे बाजीराव व चिमाजीआप्पा दादासाहेबाच्या पश्चात् बरेच दिवस आनंदवल्लीस राहिले होतें. आप्पांची मुंज ८ मार्च १७८९ रोजीं झाली. खर्ड्याच्या स्वारीच्या वेळेस रावबाजी कांहीं खूळ उत्पन्न करतील म्हणून या दोघा भावांनां आनंदवल्लीहून काढून शिवनेरीस नजरकैदेंत ठेविलें होतें. सवाईमाधवराव वारल्यानंतर मुत्सद्यांच्या व मराठामंडळाच्या आग्रहावरून एखादा गोत्रज यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक बसवावा असें नानांनीं ठरविलें, परंतु पुण्यांतील लोकांनां तें पसंत पडलें नाहीं. त्यांचें म्हणणें रावबाजी व धाकटा चिमणाजी जिवंत असतां परक्याला दत्तक कां घ्यावें? इकडे रावबाजीनींहि दौलतराव शिंद्यांस सव्वाकोट रु. देण्याचें अमीष दाखवून आपल्यास गादीवर बसविण्यासाठीं त्याची अनुमति मिळविली. तेव्हां नानांनीं पटवर्धन, रास्ते, वगैरे सरदारांच्या सल्ल्यानें चिमणाजीस दत्तक घेण्याचें ठरवून परशुरामभाऊस चिमराजीस आणण्यासाठीं जुन्नरास पाठविलें. चिमणाजी हा यशोदाबाईचा चुलत सासरा होता व धर्मशास्त्राप्रमाणें सुनेस सासरा दत्तक घेतां येत नसे. यात तोड अशी काढिली की, चिमणाजीनें फक्त सरकारकागदोपत्रीं चिमराजी माधवराव म्हणावें व खासगी व धार्मिक व्यवहारांत चिमणाजी रघुनाथ म्हणावें. पुण्याच्या लोकांच्याहि मनांत चिमणाजीसच दत्तक घ्यावें असें होतें. परंतु रावबाजीनें दौलतरावाच्या हिमायतीवर नानांचा हा बेतच मुळांत खोडून टाकला. आपणच बाजीराव रघुनाथ म्हणून पेशवे व्हावयाचें; आपण किंवा चिमाजी दत्तक जावयाचें नाहीं. असें त्यानीं ठरविलें व त्यास परशुरामभाऊहि अनुकूल झाले व नानांनींहि काळवेळ जाणून त्यास रुकार दिला. त्याप्रमाणें भाऊ या मंडळींस घेऊन पुण्यास आले (मार्च १७९६). यावेळीं चिमणाजीआप्पा घोडी भरधांव सोडून भाले फेकण्यांत तरबेज झाला होता. हा रंगानें फार गोरा, चपल व क्रोधिष्ट असे. रावबाजीनें पुण्यास आल्यावर दौलतराव शिंद्यास सव्वाकोट रु. देण्याचें लांबणीवर टाकलें व पुढें पुढें तर ते निव्वळ दौलतरावाच्या सल्ल्यानेंहि चालेनात. तेव्हां शिंद्यानें व परशुरामभाऊनें मसलत करून पेशवाईंचीं वस्त्रें घेण्याच्या निमित्तानें रावबाजींनां पुण्याच्या बाहेर काढून थेऊर येथें त्यांनां प्रथम कच्या प्रतिबंधांत ठेविलें (८ एप्रिल). पुढें देण्याघेण्याचे खटके मोडण्यासाठीं रावबाजी हे शिंद्याच्या गोटांत ता. ९ मे रोजीं रात्रीं गेले असतां शिंद्यानें त्यांनां कायमची नजरकैद केली व त्याच रात्रीं भाऊनें चिमाजीस बळजबरीनें (तो येत नसतांहि त्यास जबरदस्तीनें) पालखीत घालून पुण्याचा रस्ता पकडला; त्यानंतर मुहूर्त पाहून १२ मे रोजी शनिवारवाड्यांत प्रवेश केला (तोपर्यंत रास्त्यांच्या वाड्यांत राहिले होते). इकडे नाना फडणीस शिंद्यांच्या भयानें (ज्यावेळीं शिंदे पुण्यास आले तेव्हांच) सातार्याकडे निघून गेले होते. तेथून ते मेणवलीस गेल्यानंतर चिमाजीआप्पाचें दत्तविधान झालें (मे २६) व सातारकर महाराजांकडून त्यांनां पेशवाईची वस्त्रेंहि मिळालीं (२ जून); परंतु नानानीं निजाम, इंग्रज, होळकर, भोसले वगैरे मंडळींशीं राजकारण करून चिमाजीआप्पाचें उच्चाटन घडवून आणलें. त्यांनीं आपल्या मुत्सद्देगिरीनें खुद्द दौलतराव शिंद्यांसहि फोडले व त्याच्या तर्फे रावबाजीशीं सूत्र लावून त्यास गादीवर बसविण्याचें (बाजीराव रघुनाथ म्हणून) ठरविलें. या वेळीं रावबाजी जांबगावीं होते. या वर्षी दसर्याचा समारंभ फार थाटाचा झाला. चिमाजीआप्पाची स्वारी मोठ्या समारंभानें निघाली होती. पण हें आपलें वैभव १५-२० दिवसांतच नष्ट होणार हे श्रीमंतांच्या ध्यानांतहि आलें नाहीं. शेवटीं २६ ऑक्टोबरच्या रात्रीं या (चिमाजीस गादीवर बसविण्याच्या) सर्व कारस्थानाचा उत्पादक बाळोबातात्या पागनीस व त्याचे साथीदार यांनां दौलतरावांने कैद केलें. पहाटे होळकर व निजामाची फौज शनिवारवाड्यावर चालून आली. तत्पूर्वी रात्रींच एक चूकी झाल्यानें भाऊ व चिमाजीआप्पा निसटले. परशुरामभाऊस पकडण्याची चिठ्ठी परशुरामवैद्य यास जावयाची असतां, चुकून जासुदानें ती भाऊजवळच नेऊन दिली. तेव्हां भाऊ तात्काळ हजार पांचशें स्वार घेऊन व चिमाजीआप्पास आपल्या घोड्यावर घेऊन जुन्नरकडे पळालें. परंतु हजुरातीनें त्यांनां तेथें पकडून भाऊस मांडवगणच्या किल्ल्यांत व चिमाजीआप्पास शिवनेरीस कैदेंत ठेविलें. नंतर ठरल्याप्रमाणें नाना पुण्यास आले व रावबाजी गादीवर बसले (४ दिसेंबर). हें सर्व कारस्थान नानांचेच होतें. पुढें चिमाजी आप्पास शिवनेरीहून पुण्यास आणलें व ते शनीवारवाड्यांतच राहू लागले. तेव्हा रावबाजीनें पुण्यांतील पंडितांनां विचारून त्यांनी सांगितल्यावरून (अशास्त्रीय दत्तविधान झाल्यामुळें) चिमाजीआप्पास सक्षौर प्रायश्चित देवविलें (१७९७ नोव्हेंबर). शिंद्याच्या गृहकलहानें पुण्यास भानगडी चालू झाल्या, त्या सुमारास रावबाजीनें चिमाजीचें लग्न केले (८ जून १७९८). मुलगी आप्पाजीपंत दामले यांची नात होती; तिचें नांव सीताबाई होतें. दुसरी बायको सत्यभामाबाई नांवाची, मंगळवेढेकर मेहेंदळ्यांचीं मुलगी होती; हिचें लग्न १८१२ सालीं झालें. आप्पांचा राज्यकारभारांत फारसा प्रवेश झाल्याचें आढळून येत नाहीं. फक्त स. १७९७ च्या सुमारास गुजराथचा सुभा पेशव्यांनीं यांच्या नांवचा करून दिला होता व यांची मुतालिकी आवा शेलुकरास सांगितली होती. एवढाच उल्लेख आढळतो. पेशवाई नष्ट झाल्यानंतर यांनां इंग्रजानें पेन्शन देऊन काशीस ठेविलें व ते तेथें ९ जून १८३० रोजीं वारलें. यांची पुढील हकीकत आढळत नाहीं. [खरे-खंड, ७, ९, १०; डफ-पु.३; राजवाडे-खंड,४].
No comments:
Post a Comment