राजे साळुंखे (सोळंके) चाळुक्यांची
ग्रामप्रशासनातून राष्ट्राची उभारणी !
-------------------
-------------------
........................
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
राजे साळुंखे चाळुक्यांच्या राज्यातील ग्रामप्रशासनाला अभ्यासल्यानंतर 'ग्राम' हा प्रशासनाचा अंतिम आणि सर्वात लहान घटक असल्याचे लक्षात येते. चाळुक्यांच्या साम्राज्यातील या ग्राम प्रशासन नावाच्या लहान घटकाचे स्वरूप विस्तारत जाऊन त्यातून शेवटी एका मोठ्या राष्ट्राची उभारणी होत असल्याचे लक्षात येते.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या राजवटीतील प्रशासनात ग्रामाचे दोन प्रकार सांगितलेले दिसतात. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे 'लघुग्राम' आणि दुसरा प्रकार 'बृहद्ग्राम' होय. राजे साळुंखे चाळुक्यांच्या आठशे ते दीड हजार वर्षांपूर्वीच्या राजवटीत ग्राम हा प्रशासनातील अंतिम आणि सर्वात लहान घटक समजला जात होता, आजच्या लोकशाहीमध्ये देखील तीच पद्धती कायम असल्याचे दिसून येते. आजच्या भारतीय लोकशाहीतील प्रशासनाचा अंतिम आणि सर्वात लहान घटक सुद्धा ग्राम हाच होय.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखांना अभ्यासल्यानंतर त्यांच्या काळातील पूर्वापार परंपरेने चालत असलेली ग्राम संस्थेची सर्व यंत्रणा फारसा बदल न होता टिकून राहिलेली दिसून येते. राजे साळुंखे चाळुक्यांच्या काळात स्वतंत्र ग्रामसभेचे अस्तित्व होते. इतिहासकारांच्या मतानुसार केंद्र प्रशासनात कोणताही शासक असला तरी स्थानिक ग्राम प्रशासनावर त्याचा कोणताही परिणाम घडत नसे. ग्रामाचे स्थानिक प्रशासन स्वतंत्र होते. संरक्षण, आक्रमण, कर, वगैरे बाबींशिवाय ग्रामप्रशासनात केंद्र शासनाचा कसलाही हस्तक्षेप होत नसे. थोडक्यात म्हणजे स्थानीय ग्रामसंस्था छोट्या राज्याच्या स्वरूपामध्ये काम करून आपली भूमिका निभावत असत. केंद्राचे ग्रामावर केवळ सामान्य स्वरूपाचे नियंत्रण असल्याचे लक्षात येते. त्याकाळात केंद्र सरकारकडून ग्राम संस्थांना जवळपास सर्व अधिकार दिलेले दिसून येतात.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या कर्नाटकातील एका शिलालेखाच्या आधारे समजणाऱ्या माहितीनुसार अग्रहारातील विद्वानांनी एका बोपय्या नावाच्या ग्रामप्रमुखाची राजाकडे तक्रार केल्यानंतर राजाने दोषी बोपय्याला पदच्युत करून नवीन ग्रामाधिकारी नेमण्याचे आदेश दिले होते. या तात्कालीन घटनेवरून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे जबाबदारीच्या तत्वांची पायमल्ली करणे राजे साळुंखे चाळुक्यांच्या प्रशासन काळात व्यवहार्य नसल्याचे लक्षात येते.
गावातील तंटे, मालमत्ता, फौजदारी गुन्हे वगैरे सगळ्याच बाबींचे आणि त्यावर मार्ग काढण्याचे अधिकार ग्रामांकडेच होते. ग्रामांची सीमा, सरहद्द, भूमिदान इत्यादी संबंधात ग्रामसभेची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे लक्षात येते. ग्रामसभेने दिलेला निर्णय जर अंमलात आला नाही, तर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राजसत्ता घेत असे. यावरून लक्षात येते, की त्याकाळी ग्रामपंचायतीने घेतलेले जवळपास सर्वच औचित्यपूर्ण निर्णय राजाला आणि राजसत्तेला मान्य असत.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या पसरलेल्या महाकाय साम्राज्यात सामंत, महासामंत आणि अंकित राजांची राज्ये देखील सामावलेली होती. अशा प्रांतीय मांडलिक राजसत्तेला सुद्धा साळुंखे चाळुक्य सम्राटांनी बरीच स्वायत्तता दिलेली दिसते. ही अंकित राज्य देखील काही ठराविक अपवाद सोडता राजे साळुंखे चाळुक्यांच्या सार्वभौमत्वाला मानणारे असल्याचे दिसून येतात. साम्राज्यातील अशा सामंत राजांवर नजर राहणे आवश्यक असल्यामुळे साळुंखे चाळुक्य राजांकडून या राज्यांवर सार्वभौम सत्तेचे प्रतिनिधी नेमले जात असत.
साळुंखे राजांनी नेमलेले प्रतिनिधी सामंत राजांवर आणि त्यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवून असत. राजे साळुंखे चाळुक्यांच्या अशा धोरणामुळे त्यांच्या सार्वभौम राज्यातील सर्वच सामंत राज्याच्या राज्यकारभारावर नेमलेल्या प्रशासकांचा वचक राहत असे. त्यामुळे सामंत राज्याच्या यंत्रणेत आपोआपच एकसूत्रीपणा निर्माण होण्यास मदत होत असे.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या केंद्रीय सत्तेचा प्रमुख खुद्द साळुंखे चाळुक्य सम्राट असले तरी राज्यकारभारात सुसूत्रता येण्यासाठी त्यांनी त्याच्या सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले दिसते. या काळात मंडळ, देश, विषय, नाडू, कंपन, अंकवाचक विभाग वगैरे प्रशासकीय विभागात राजे साळुंखे चाळुक्यांच्या सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते. साळुंखे सम्राटांनी साम्राज्याच्या उत्कर्षासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हुशार व कर्तुत्ववान व्यक्तींना मंत्री म्हणून नियुक्त केलेले दिसून येते. यातील कर्तुत्ववान मंत्र्यांचा गौरव करून साळुंखे राजांकडून अशा मंत्र्यांचा मुक्तकंठाने गौरव देखील होत असे. याचे एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, नागवर्मा नावाच्या पराक्रमी सेनापतीच्या योगदानाबद्दल साळुंखे नरेश सोमेश्वर पहिला याने त्याचा विवाह समारंभ घडवून आणला होता. एवढेच नाही तर त्याला आजच्या देगलूर तालुक्यातील तडखेल नावाचे गाव सुद्धा बक्षीस दिले होते.
राजे साळुंखे चाळुक्य काळात राजा, सेनापती, मंत्री, इत्यादींच्या परस्पर संबंधात आदर आणि सहानुभूती दिसून येते. सम्राट साळुंखे चाळुक्यांचे सामंत, महासामंत, अंकित राजे, मंत्री वगैरे देखील त्यांच्या शिलालेखांतून साळुंखे चाळुक्य सम्राटांविषयी निष्ठा व्यक्त करत असत. हे ज्या त्या भागातील सामंत, महासामंतांच्या अनेक शिलालेखांना अभ्यासल्यानंतर लक्षात येते. दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात वाढलेल्या बदामी आणि उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्यांच्या काळात राज्यात स्थैर्य आणि शांतता असल्यामुळे अर्थसंपन्न राष्ट्र म्हणून राजे साळुंखे चाळुक्यांचा लौकिक होता.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर, डॉ. नीरज साळुंखे,
Dr. Neeraj Salunkhe )
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड.,
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment