विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 July 2021

भिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी

 


भिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी

बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लम ने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.
भिल्लमाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा किल्ला घेऊन. आणि तदनंतर प्रत्यंडगड (प्रचंडगड किंवा तोरणा) वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.
स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खन चा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.
याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा.
अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.
तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खनविजया करिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग,गुट्टी,बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.
ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.
भिल्लमाचा असा दारूण अंत झालेला असला तरी एक त्याला पराभूत राजा म्हणविता येणार नाही. कारण एक योद्धा म्हणून भिल्लमाने स्वतःचे असे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःच्या हिमतीवर उभे केले होते. उत्तरेत त्याने थेट मारवाड पर्यंत छापेमारी करून दाखवली होती. आणि एका चाणाक्ष बुद्धिमत्तेने योग्यवेळी चालून जाऊन त्याने होयसळ राजांची दख्खन ताब्यात घेण्याची योजना धुळीस मिळवली होती. त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...