विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

कोकणचा प्राचीन इतिहास

 




कोकणचा प्राचीन इतिहास

कोंकण— चतु:सीमा- सामान्यतः दमणगंगानदीच्या दक्षिणेकडील व सह्याद्रीच्या पश्चिमेकडील खालील चतु:सीमेचा जो प्रदेश तो कोंकण होय. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस सह्याद्री, उत्तरेस दमण व दक्षिणेस गोव्याच्या सरहद्दीवरील तेरेखोलपर्यंतचा प्रदेश अशी याची चतु:सीमा आहे. डफने तापी नदी ते सदाशिवागड अशी याची उत्तर-दक्षिण सरहद्द दिली असून या भागास त्याने थळ कोंकण असेही म्हटले आहे. कोकणात हल्ली मुंबई शहर, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे जिल्हे, उत्तर कानड्याची पट्टी, जंजिरा व सावंतवाडी ही संस्थानें व गोवे प्रांत इतक्यांचा समावेश होतो.
प्राचीन उल्लेख— कोंकण हा शब्द फार प्राचीन आहे. परंतु वरील भूप्रदेशाला हे नाव का व कसे देण्यात आले याचा समाधानकारक उलगडा अद्याप झालेला नाही. निरनिराळ्या काळी कोंकणच्या मर्यादा बर्याच भिन्न असाव्यात असे उपलब्ध झालेल्या तत्कालीन उल्लेखांवरून दिसते, महाभारतात (भी. प.अ.९) अपरान्त व कोंकण ही दोन्ही नावे आली आहेत. हरिवंश व विष्णुपुराण आणि वराहमिहिर यांनीही कोंकणचा नामनिर्देश केला आहे. अपरातांतील शूर्पारक हे शहर फार जुने असून बौद्ध वाङ्मयांत त्याचा अनेकदा प्रामुख्याने उल्लेख येतो. शूर्पारक म्हणजे हल्लीचे सोपारे (ठाणे जिल्हा, वसईजवळ बी.बी.सी.आय. रेल्वेचे स्टेशन) असून येथे थोड्या वर्षांपूर्वी बुद्धाचा एक स्तूप व अशोकाची धर्मशासनांकीत एक लेखशिला सापडली होती. महाभारतात शांतिपर्वाच्या ४९ व्या अध्यायात या शूर्पारकाचा उल्लेख आहे; तसेच सहदेवाच्या दक्षिण विजयात कोंकण देशाचे नाव आले आहे. बृहतसंहितेत (१४.१२) देखील दक्षिण विभागांतील देशात याची गणना असून एके ठिकाणी तर 'सप्तकोंकण' असाहि याचा उल्लेख आला आहे. दशकुमार चरित्रांत कोंकण असा शब्द आला आहे. ख्रि.पू. तिसर्या शतकात यास अपरांत म्हणत; रघुवंशात अपरांत हेच नाव आहे. संस्कृत वाङ्मयात त्रिंबक ते कन्याकुमारीपर्यंतच्या पश्चिमकिनार्यावरील प्रदेशात कोंकण हे नाव येते. 'अपरान्त' याची व्युत्पत्ती कांही जण पुढीलप्रमाणे देतात :- अपरा म्हणजे पश्चिमदिशा, तिचा जेथे अंत होतो (म्हणजे पुढे समुद्र लागतो) तो प्रदेश. परंतु काहींचे म्हणणे की सोप्पार (सोपारे) प्रांताचा अंत या शब्दावरून 'अपरांत' शब्द झाला असावा. 'महावंशो' या बौद्ध ग्रंथांत सोपार्याच्या दक्षिणेकडील देशास अपरांत म्हटले आहे व अशोकाने तेथें आपले धर्मप्रचारक पाठविल्याचाही निर्देश केला आहे. राजतरंगिणीत व चालुक्याच्या शिलाशासनात वरील सप्तकोंकण हा शब्द आलेला आहे. ख्रि.पू. चौथ्या शतकात कोंकण हे नाव प्रसिद्ध झाले होते. रा. रा. भागवत यांनी या शब्दाची व्युत्पत्ती अशी दिली होती की, चेर देशास काग किंवा कोंग (कोंगु ?) असे म्हणण्याची बरीच जुनी वहिवाट आहे. कांग आणि गंग हे दोन्ही शब्द एकार्थी आहेत व ते एका राजघराण्याचेंही नाव आहे. यावरून कोंगवत हा शब्द तयार झाला असावा व कोंगवत याचा कोंकण शब्द बनला असावा. (वि.ज्ञा. वि.पु. २२ पृ. ९९). कालिदास आणि भारवी यांच्या कोंकणवर्णनांत थोडासा फरक आहे. शके ४२६ मधील पंचसिद्धांतिका या ग्रंथांत कोंकण हा शब्द आला आहे. इ.स. ८० मधील पेरिप्लसच्या कर्त्याने कोंकणाचा व झिनोल (चौल बंदर)चा उल्लेख केला आहे. कदंबराजवंशाच्या लेखावरून ख्रि.श. पूर्वी बौद्धधर्मप्रसारकांचे पाय कोंकणास लागल्याचे स्पष्ट होते. ख्रि.पू. १ ल्या शतकात मलबारावर सत्ता गाजविणार्या पेरमाल राजांची एक मोठी सभा कोंकणांत भरल्याचा उल्लेख आढळतो. रेवदंड्याबद्दल एक दंतकथा अशी सांगतात की, श्रीकृष्णाने (आपली भावजय जी रेवती हिला निर्वाहार्थ रेवतीक्षेत्र म्हणून जी भूमी दिली होती, तेंच हल्लीचे रेवदंडा होय. (वि.ज्ञा.वि.पु. २१ अं. १-२). टॉलेमीने कोंकणाचा निर्देश लारिका (लाटदेश (सं.) = गुजराथ व उत्तर कोंकण) व आरिका (दक्षिण कोंकण) असा केला आहे. (इ.स. १५०). पेरिप्लसमध्ये लारिका वे नाव नसून बरुगझ (भरुकच्छ = भडोच) हे नाव येते व आरिका देशांत चांचे लोकांचा फार उपसर्ग होता असे त्यांत म्हटले आहे, हे चाचे म्हणजे अरब लोक होत. या चांच्यांचा उल्लेख स्ट्रॅबोनेही केला आहे. तत्कालीन कल्लिएन म्हणजे हल्लीचे कल्याण (जी.आय.पी. रेलवेचें स्टेशन) व सेसेक्रिएनी म्हणजे वेंगुर्ला होय असें स्मिथ म्हणतो (स्मिथ. पु. २. ४२२); पैकीं कल्याण हें नांव बरोबर आहे; सेसेक्रिएनी म्हणजे वेंगुर्ला हे संशयित दिसते. या दोन बंदरांच्या दरम्यान टॉलेमी व पेरिप्लस पुढील गांवें देतात :- ओपार (सोपारे), सेमुल्ल (चेऊल ?), मंदगोर, पलपोटम किंवा बलपाटण, मेलिझिगर व तोपरोन. टॉलेमीने ओपार व सेमुल्ल यांच्यांत बिंद ही नदी दिली आहे, प्लेनीचे झिझेरस व टॉलेमीचे मेलिझिगर हे सुवर्णदुर्ग किंवा जयगड असावे असे लासेन व स्मिथ म्हणतात. (झिझरेस या शब्दाचें जंजिरा या शब्दाशी बरेचसे साम्य आहे.) प्लिनीचे बायझँटियम हे विजयदुर्ग व निट्रिअस हे (मालवण व वेंगुर्ले यांच्यामधील) निवती होय असे रेनेल म्हणतो (व्हिन्सेन्ट पु. २). पेरिप्लस व टॉलेमीची तत्कालीन ग्रामनामे हल्ली स्पष्ट ओळखता येत नाहीत; याचे करण ती हल्ली नष्ट झाली असून नवीनच बंदरे पुढे आली आहेत. ख्रि.पू. तिसर्या शतकांत अशोकाने आपले प्रेषित बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अपरांतात पाठविल्याचा उल्लेख, त्याच्या गिरनार खालशी व शहाबाज गढी येथील शिलालेखात आढळतो. यावरून ख्रि.पू. दुसर्या व तिसर्या शतकात अपरांत मौर्यांच्या ताब्यात होते व त्या काळी शूर्पारक ही त्यांची राजधानी होती असे ठरते. बायबलातील ऑफीर हेंच सोपारा होय, असे काहींचे म्हणणे आहे. अलबेरूणीने समुद्राजवळील कोंकण असा कोंकणाचा निर्देश केला आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...