विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 July 2021

देवगिरीचा यादव वंश

 


देवगिरीचा यादव वंश
---------------------------
@
यादवांनी राजे साळुंखे चाळुक्य सत्तेचा अस्त झाल्यानंतर देवगिरीवर राजधानी हलवून स्वतंत्र राज्याची घोषणा केली. म्हणून पुढील काळात हे यादव देवगिरीचे यादव म्हणून प्रसिद्धीस आले. देवगिरीच्या यादवांनी इ.सन ११८९ ते १२९४ अशा १०५ वर्षाच्या काळात देवगिरीवर आपले स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. त्यापूर्वी यादव हे उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांचे जवळपास दोनशे वर्षाहून अधिक काळ महासामंत अर्थात मांडलिक होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर देवगिरीचे यादव खिलजीचे मांडलिक बनले.
अल्लाउद्दीन खिलजी व मुस्लिम सत्तेच्या मांडलिकत्वात देवगिरी यादवांनी इ.सन १२९४ ते १३१३ अशा काळात कसेबसे राज्य केले. शंकरदेव यादव हा देवगिरीचा शेवटचा यादव राजा. पुढे हरपालदेव चाळुक्य या रामचंद्रदेव यादवाच्या जावयाने इ.सन १३१३ मध्ये देवगिरीची मोठ्या संघर्षातून मुस्लीम जोखडातून मुक्तता केली आणि पुन्हा एकदा देवगिरीवर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केली. मात्र हे स्वातंत्र्य अल्पकालीन ठरले, इ.सन १३१८ मध्ये हरपालदेव साळुंखे चाळुक्याच्या वधानंतर देवगिरीचे हे राज्य कायमस्वरूपी पारतंत्र्यात गेले.
हरपालदेव साळुंखे चाळुक्यांने धर्मांतराला नकार दिल्याने त्याची कातडी सोलून त्याचा क्रूर पद्धतीने वध करण्यात आला. मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार करताना त्याच्या चितेवर त्याच्या असंख्य सोबत्यांनी अग्निप्रवेश करून स्वतःचा अंत करविला. आपल्या राजाचा असा एकट्याने अंत व्हावा अशी त्याच्या सोबत लढलेल्या सोबत्यांची इच्छा नसल्याने त्यांनी अग्निप्रवेश करून हरपाळदेव चाळुक्य याची साथ अंतिम क्षणापर्यंत दिली. हरपाळदेवाचा राघव नावाचा एक अधिकारी होता, त्याने ही मुबारक खिलजीचा सेनापती खुसरू खान याच्याशी तेव्हा लढा दिल्याची माहिती मिळते.
देवगिरी यादवांचा इतिहास
---------------------------------
देवगिरीचे यादव स्वतःला द्वारकेच्या यदुकुळाचे वंशज समजत. पौराणिक राजकुमार सुबाहु याला दक्षिण दिशेचे राज्य प्राप्त झाले अशी नोंद आहे. हा शेवटचा पौराणिक राजा. तर दृढप्रहार हा पहिला या घराण्यातील ऐतिहासिक पुरुष ठरतो. राष्ट्रकूटांना परमार संघर्षातील प्रभुत्वासाठी एखाद्या सामंताची आवश्यकता होती, ती दृढप्रहाराच्या वंशजांनी भरून काढली. दृढप्रहाराचा मुलगा सेऊनचंद्र याने चांदुर येथील राजधानी सिन्नर येथे हलविली.
यानंतर धाडीयप्पा, भिल्लन, श्रीराज, वड्डीग त्याचा पुत्र श्रीराज यांची नावे येतात. श्रीराज याचे राष्ट्रकूट राजकन्या होडीयव्हाशी लग्न झाले होते. जेव्हा राष्ट्रकूट सत्तेला उतरती कळा लागली आणि उत्तरेकडून गुर्जर प्रतीहार माळव्यात परमार ही घराणी पुढे येत होती, अशावेळी कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाने आपले दक्षिणेतील नव्याने स्वातंत्र्य घोषित करून दख्खनात वर्चस्व प्रस्थापित केले. अशावेळी वड्डीगपुत्र भिल्लम द्वितीय याने राष्ट्रकूटांचे वर्चस्व झुगारून तैलप साळुंखे चाळुक्याच्या बाजूने परमार विरुद्धच्या युद्धात भाग घेऊन चाळुक्याचे मांडलिकत्व स्वीकारले. यानंतर वेसुगी, अर्जुन, भिल्लम तृतीय, सेवूनचंद्र द्वितीय, ऐरम्मदेव, सेऊनचंद्र तृतीय, मल्लूगी, अमरगांगेय, अमरमल्लुगी, गोंदीराय, कालीगबल्लाळ, कर्ण, भिल्लम पाचवा या राजांनी शासन केल्याची नोंद दिसते. यादव वंशातील वरील राजांचे एक दुसर्याशी असलेले नाते स्पष्ट करणे बरेच कठीण असले तरी इतिहासकार आ. जी. भांडारकर यांनी वरील क्रम स्वीकारला आहे.
‌भिल्लम पाचवा याने त्याच्या अखेरच्या काळात चाळुक्यांचे मांडलिकत्व झुगारून यादवांची राजधानी देवगिरी येथे हलवली. तेव्हापासून या यादवांची इतिहासातील ओळख देवगिरीचे यादव अशी झालेली दिसते. भिल्लम पाचवा नंतर देवगिरीवर जैतुगी अर्थात जैत्रपाल, सिंघनदेव द्वितीय, कृष्णदेव, महादेव, अमणदेव, रामचंद्रदेव असा सत्तेचा क्रम लागतो. रामचंद्रदेव यादवांच्या काळात देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण झाले. या आक्रमणाने यादव सत्तेला खिलजीचे मांडलिकत्व पत्करावे लागले. पुढील काळातील दिल्लीतील राजकीय अस्थिरता आणि तेथील अंतर्गत बंडाळीत खिलजीला कैदेत टाकून मलिक कपूर सुलतान झाला. रामचंद्रदेवानंतर देवगिरीवर त्याचा मुलगा शंकरदेव याने स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. यावेळी मलिक कपूरने दक्षिणेवर स्वारी करून त्याचे मनसुबे उधळून लावले. शंकरदेव यादवाने इ.सन १३१३ पर्यंत देवगिरीवर राज्य केले. शंकरदेव यादवानंतर देवगिरीची यादव सत्ता संपुष्टात आली.
मलिक कपूरचा खून करून मुबारकशहा सुलतान पदावर आला. मुबारकशहाने हरपालदेव चालुक्य याच्या खुश्रूखानला देवगिरीवर पाठविले. कारण शंकरदेव मारला गेल्यानंतर रामचंद्रदेव यादवाचा जावई असलेल्या हरपालदेव चाळुक्याने स्वतंत्र होऊन देवगिरीवर राज्य प्रस्थापित केले होते. हरपाळदेव चाळुक्य याने बंड करून एकेक किल्ल्यावर विजय मिळवत इस्लामी आक्रमकांना हरवण्याचे पराक्रम केले. तेथील इस्लामी राज्यकर्ते हाकलून लावत दक्खन मुक्त करून इ.सन १३१३ ते १३१८ अशा काळात दक्खन पुन्हा स्वतंत्र केली. हरपालदेव चाळुक्यावर हल्ला करणारे मुस्लिम तुर्क इत्यादी असंख्य झुंडीने येत होते. हरपाळदेव चाळुक्याने तीन लढाया दिल्यावर त्याची मात्रा या लाटांप्रमाणे येणाऱ्या झुंडीपुढे शेवटी निभाव लागला नाही.
‌‌ खुश्रूखान याने हरपालदेव यास राजे साळुंखे चाळुक्यांची राजधानी असलेल्या संगमेश्वर येथून जेरबंद केले. हरपाल देवास पकडून त्याचा क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. हरपाल देव आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येची तुलना करण्याचा येथे कसलाही उद्देश नसताना या दोघांच्याही हत्या करण्यात मात्र बरेच साम्य वाटते. विशेष म्हणजे हरपालदेव चाळुक्य आणि संभाजी राजे या दोघांचीही कैद संगमेश्वर येथून झालेली आहे, हा सुद्धा निव्वळ योगायोग समजावा! हरपालदेवाच्या मृत्यूनंतर देवगिरीच्या यादवांची हरपालदेवाच्या रुपाने असलेली उरलीसुरली सत्ता देखील कायमची संपुष्टात आली. पुढे महंमद तुघलकाने देवगिरी येथे आपली राजधानी हलविली आणि देवगिरी यादवांचे या प्रकाराने भारतीय इतिहासातील एक पर्व संपले.
हरपालदेव चाळुक्यास राजे साळुंखे चाळुक्यांच्या संगमेश्वर राजवंशातील वंशज म्हटले जाते. तो कामदेवरस चाळुक्य याचा पुत्र होता. त्यामुळे हरपाल हा राजे साळुंखे चाळुक्यांच्या संगमेश्वर शाखेतील वंशज होता. हरपालदेव चाळुक्याचे पिता कामदेवरस चाळुक्य हे यादव सम्राट रामचंद्रदेव याचे महामंडळेश्वर या महत्त्वाच्या पदावरील एक प्रमुख सामंत होते. शिवाय महानुभव साहित्यातही हरपालदेव चाळुक्यास गुजरातच्या सोळंकी राज्यातील सरदाराचा पुत्र असे संबोधन झालेले दिसते. राजे साळुंखे चाळुक्यांच्या संगमेश्वर येथील शाखेचा एक महत्त्वाचा इतिहास समजतो व या शाखेची राजधानी असलेल्या संगमेश्वर येथील मंदिरे जीच्यावर वराहलांच्छन कोरलेली का आहेत याचाही उलगडा चाळुक्यकुळ चिन्हामुळे होतो.
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड.
सतीशकुमार सोळंके देशमुख,
९४२२२४१३३९,
९९२२२४१३३९.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...