विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 July 2021

साडे तीनशे वर्षापूर्वी झाली इचलकरंजी संस्थानची स्थापना …..भाग ८

 साडे तीनशे वर्षापूर्वी झाली इचलकरंजी संस्थानची स्थापना …..

पोस्तसांभार : संजय खूळ

भाग ८
आणि या कारणाने इचलकरंजी संस्थानावर आली होती जप्तीची वेळ
अनुबाईना वृद्धापकाळामुळे दगदग सहन होत नव्हती.कोल्हापूरकराबरोबर समझोता करून त्या इचलकरंजी संस्थांबरोबर लढाया टाळण्याचे प्रयत्न करीत होते. या वयातही त्या नातू व्यंकटराव यांच्यासाठी कारभार पाहत होत्या. परंतु कोल्हापूरकरांनी पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्या मुलाखात लुटालुटी करावी असा आदेश दिला. यामुळे कोल्हापूरकरांचा त्रास इचलकरंजी करांना सुरू झाला. 1774 मध्ये येसाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फौज व तोफा घेऊन इचलकरंजीवर चालून आले. ही लढाई टाळण्यासाठी अनुबाई यांनी प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. इचलकरंजीकरांकडे महादजी विठ्ठल फडणीस हे शूर सेनापती होते. त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकमेकाची गावे लुटणे, खंडण्या घेणे, ठायी काबीज करणे असे प्रकार सुरू झाले. त्यामध्ये करवीरकर पराजित झाले. त्यानंतर अनेक लढाया सुरूच राहिल्या. महादजी विठ्ठल यांनी या लढाईत आळते व चिप्री ही ठिकाणे इचलकरंजी यांच्या ताब्यात घेतली.
इचलकरंजीकरांचा करविरला वेढा..
इचलकरंजीकर हे लढाया होऊ नयेत यासाठी वारंवार प्रयत्न करीत होते. मात्र करवीर घराकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या काळात व्यंकटराव पुण्यात होते ते पुण्यातून परत आल्यानंतर पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी करवीरकरांच्या वर चाल केली. दोन्ही सैन्यामध्ये वडगाव या ठिकाणी मोठे युद्ध झाले. त्यातही करवीरकरांचा पराजय झाला. त्यानंतर या फौजने करविर ला वेढा घातला व तेथील मंगळवार पेठ व गंगावेश मधील मठ ही लुटले. त्यादिवशी लढाई झाली. त्यानंतर करवीरकर यांनी एक लाख रुपये देऊन हा वेढा उठविला. सण 1783 मध्ये अनुबाई चा मृत्यू झाला. त्यावेळी या संस्थानावर सुमारे बारा लाख रुपये कर्ज होते. इचलकरंजी संस्थानावर जप्तीची वेळ आली. त्यावेळी रघुनाथराव कुरुंदवाडकर यांनी मदत केली. इचलकरंजी संस्थांनाला एका प्रकरणात सव्वा लाख रुपये भुर्दंड सरकारकडे भरावा लागला. त्याचबरोबर पाच लाख रुपये करवीरकर यांच्यावर लढाईसाठी खर्च झाले होते. त्यामुळे संस्थांना वर कर्जाचा बोजा वाढला होता.
रुईच्या झाडाचे चिक पिऊन आत्महत्या
एका बाजूला संस्थांना वर कर्जाचा बोजा तर दुसर्या बाजूस व्यंकटराव यांना व्यसन लागले होते .त्यामुळे संस्थानीकातील नागरिकांच्या मध्येही त्यांच्याबाबत खदखद निर्माण झाली होती.कुरुंदवाडकरांच्या देखरेखीखाली इचलकरंजीचा कारभार सुरू असताना वर्षभर व्यंकटरावांनी प्रायचित्त म्हणून टाकळी येथे रहावे असे ठरले. ते त्यांनी मंजूर केले, मात्र हा अपमान त्यांना सहन झाला नाही. पालखीचा एका भोयाकडून त्यांनी पाय दुखत असल्याचे सांगून रुईचा चीक मागवला. तो पिऊन त्यांनी 2 जानेवारी 1795 ला आत्महत्या केली. व्यंकटराव यांच्या पत्नी रमाबाई यांनी दुसरे नारायणराव व्यंकटेश उर्फ बाबासाहेब यांना दत्तक घेतले. खर्ड्याच्या लढाईत त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. नारायणराव व्यंकटेश यांनीही करवीरकरांकडून बराच उपद्रव झाला.1818 नंतर पेशव्यांच्या ठिकाणी इंग्रज सरकार आले. इंग्रजी राज्य सुरू झाल्यानंतर एकमेकात होणाऱ्या लढाया किंवा तंटयाबाबत इंग्रज सरकार हस्तक्षेप करू लागले. तरीही 1819 मध्ये करवीरकर यांनी आजरे प्रांती दंगा करून अनेक खेड्यात लयलूट आणि जाळपोळ केली.1820 मध्ये मराठी सरदारांची इंग्रज सरकारच्या अल्फन्स्टन साहेबांनी पुण्यात भेट आयोजित केली. त्यावेळी त्यांनी नारायणराव व्यंकटेश यांना मेजवानी देऊन हत्ती-घोडे व जवाहीर दिली व त्यांचा मोठा बहुमान केला. त्यानंतर अल्फन्स्टन यांनीही इचलकरंजीत बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. दुसरे नारायणराव व्यंकटेश हे पराक्रमी व धोरणी सरदार होते. आपत्तीच्या स्थितीतही कर्तबगारीची पराकाष्टा करून त्यांनी इचलकरंजी संस्थान वाचवले होते.वयाच्या 50 व्या वर्षी 3 जानेवारी 1827 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे थोरले पुत्र तिसरे व्यंकटराव नारायण गादीवर आले. ( क्रमशा:)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...