नानासाहेब पेशवे पहिले बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले पुत्र बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब यांना २५ जून १७४० मध्ये पेशवाईचे वस्त्र मिळाली.नानासाहेब हे एकमेव असे पेशवे होते की,त्यांना २१ वर्ष राज्याची धुरा सांभाळता आली. त्यांच्या काळात मराठा साम्राज्याचा उत्कर्ष चौफेर झाला. मराठा साम्राज्य भारतीय उपखंडात सर्वात बलाढ्य राज्य म्हणून उदयाला आले होते. अर्थात या विस्ताराची सुरुवात पहिले बाजीराव पेशवे व चिमाजी अप्पा यांनी केली. मात्र या दोन्ही शूर -वीराचे अकाली निधन झाले. मात्र त्यांचे साम्राज्यविस्ताराचे कार्य मोठ्या कौशल्याने नानासाहेबांनी पुढे नेले. नानासाहेबांचा जन्म ८ डिसेंबर
१७२० मध्ये झाला. त्यांना २० वर्षी पेशवेपद मिळाले.पेशवेपद मिळाल्यानंतर नानासाहेबांनी १७ जानेवारी १७४१ मध्ये निजामाचा पुत्र नासिंरजग यांचे बंड दक्षिणेतील पूर्णा नदीजवळील एदलाबाद येथे मोडून काढले. त्यानंतर नानासाहेबांनी १७४१ ते १७४८ पर्यत उत्तर भारतात चार मोहिमा काढल्या. मराठ्यांना मिळालेल्या सर्व चौथाई सुभ्यांना भेटी देऊन तेथील व्यवस्था लावली. चौथाई -सरदेशमुखी बदल्यात मुघल बादशहाच्या संरक्षणासाठी ४००० मराठा फौजेची व्यवस्था केली. महाराष्ट्रातील तीर्थस्थान म्हणून ओळखला गेलेला "शिवनेरी " हा किल्ला १६३६ ते १७५७ पर्यत कधीही मराठा साम्राज्यात नव्हता. तो किल्ला जिंकून घेण्याचे महत्त्वाचे कार्य नानासाहेबांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व होते. स्वतः नानासाहेबांचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे हा किल्ला मिळाल्यावर नानासाहेबांना विशेष आनंद झाला. त्यानंतर आधि मुघलांच्या न नंतर निजामाच्या ताब्यातील खानदेश ,जुन्नर ,अहमदनगर ,नाशिक व सोलापूर हे जिल्हे जिंकून घेतले. नाशिक जिल्ह्याचे नाव मुघलांनी गुलशनाबाद केले होते. ते नानासाहेबांनी पुन्हा नाशिक करुन घेतले. तसेच नाशिक जिल्ह्यातील सुंदर नारायण मंदिर व त्र्यंबकेश्वरच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करुन घेतला. अष्टविनायक गणपती हे महत्त्व याच काळात वाढले. मुघलांच्या काळातील येथील मंदिराची धुळधाळ झाली होती. ती ठीकठाक करुन घेण्याचे कार्य नानासाहेबांनी केले. १७४९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू झाला. पुढे त्यांचे पुत्र रामराजे यांना छत्रपती पद मिळाले. मात्र पुढे पुन्हा सातारा व कोल्हापूरमध्ये झालेल्या यादवी युध्द झाले. त्यानंतर "सांगोला करारानूसार " मराठासत्तेची पूर्ण सत्ता नानासाहेबांच्या हाती आली. नानासाहेबांनी पुणे जिल्ह्यातील अनेक वाडे व मंदिरे वसवली. पुणे शहराच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १७५७ मध्ये नानासाहेबांचे कनिष्ठ बंधू रघुनाथरावांनी उत्तरेत दोन मोहिमा काढल्या. व मराठ्यांचे साम्राज्य अटकेपार नेले. अटक म्हणजे आजचे पाकिस्तान व अफगाणिस्तानची सीमा होती. मराठ्यांचे सत्तेचे वारु संपूर्ण भारतात पसरु लागले. हा उत्कर्ष फारत नेत्रदिपक होता.१७६१ मध्ये पानिपतच्या युध्दात मराठ्यांचा अनपेक्षित पराभव हा नानासाहेबांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे खचून २३ जून १७६१ मध्ये नानासाहेबांचे निधन झाले. नानासाहेबांचा २१ वर्षाच्या काळ हा फार धामधुमीचा होता. याकाळात नानासाहेबांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या. व्यापाराला उत्तेजन दिले. अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक ऐतिहासिक वास्तूचे निर्माण केले. मराठा साम्राज्याचा विस्तारक म्हणून नानासाहेबांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment