विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

बुध्दीप्रामाण्यवादी समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर

 

बुध्दीप्रामाण्यवादी समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर 

महाराष्ट्राच्या भूमीला  संत व  समाज सुधारकांची खूप मोठी परंपरा  लाभली. अशा समाजसुधारकांमध्ये बुद्धिप्रामाण्यवादी  समाजसुधारक म्हणून  गोपाळ गणेश आगरकर यांचे स्थान महत्त्वाचे होते. वास्तविक पाहता  आगरकरांना फक्त ३९ वर्षांचे आयुष्य लाभले.मात्र   आगरकरांचा समग्र अभ्यास  केल्यावर त्यांचे विचार किती प्रग्लभ होते  हे  समजते. आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६   महाराष्ट्रातील मध्ये कराड येथे झाला. त्यांच्या घरची आर्थिक  परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या शालेय शिक्षणात खंड पडत असे. मात्र शिक्षणाची प्रचंड ओढ  त्यांना   स्वस्थ  बसू देईना.  आगरकरांची अंगयष्टी उंच , सडपातळ व काटक , डोळे पाणीदार होते.भाषण ठसक्याचे बुद्धी चपल व ग्राहक होती. तर्कशास्त्र ,तत्त्वज्ञान  आणि इतिहास त्यांचे आवडीचे विषय होते. मिल आणि  स्पेन्सर हे त्यांचे आवडते लेखक होते.बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून आगरकरांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. टिळक व आगरकरांची पहिली भेट डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात झाली.तेव्हापासून वेगवेगळ्या  विषयाच्या त्यांच्यात चर्चा होत असे. कधी प्रचंड मतभेद होत असे. वैचारिक  कलहाला काही सीमा नव्हती.   टिळकांना   राजकीय  स्वातंत्र्य प्रथम हवे होते. तर आगरकरांना सामाजिक  स्वातंत्र्य  प्रथम हवे होते. त्यासंदर्भात त्यांचे विचार  ते फारच सुंदर  शब्दांत मांडत असे. टिळक म्हणत असे , " आपल्या शरीराला जखम झाली. रक्त भळाभळा वाहत आहे. अशावेळी विचारी मनुष्य  ते रक्त थांबवून जखम आधि बरी करतो. राजकीय  पारतंत्र हे भारतीय शरीरातील जखम आहे. तर सामाजिक  पारतंत्र ही आपल्या शरीरातील आतिल जखम आहे. तर आगरकर म्हणत असे, शरीराच्या आतिल जखम म्हणजे   या सामाजिक  जखमेवर फार काळापासून  दुर्लक्ष  झाले आहे. शरीराच्या आतिल हृदयच बंद पडले तर बाहेरील जखम बरी करुन काय उपयोग ? त्यामुळे सामाजिक  जखम आधि बरी होणे गरजेची आहे. विरोध सामाजिक  व राजकीय स्वातंत्र्याला   दोघांचा नव्हता .तर प्राधान्यक्रम आधि कोणत्या गोष्टीला द्यावा हा विचारकलहाचे मूळ होते उच्चशिक्षण पूर्ण झाल्यावर आगरकरांना लठ्ठ पगारांची सरकारी नोकरी सहज मिळत असताना ही ती  न करता आपले संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी  त्यांनी अर्पण केले. लोकमान्य टिळक व आगरकर बालमित्र होते.  त्यांनी सामाजिक  बांधिलकीचे विचार पेरण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलची  शाळेची स्थापना केली. शिक्षण  व वृत्तपत्रे  यामार्फत लोकप्रबोधन करण्याचा ध्यास आगरकरांचा  होता. आगरकर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक मग  नंतर  फर्गसन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक  व १८९२मध्ये फर्गसन कॉलेजचे प्राचार्य झाले. 

आगरकरांनी प्रथम केसरी वृत्तपत्राची संपादन केली पुढे राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक स्वातंत्र्य याबाबत टिळकांची मतभेद विकोपाला गेल्यावर" सुधारक" नावाचे वृत्तपत्र आगरकरांनी  सुरू केले.

"सत्य तेच सांगणार  इष्ट  तेच करणार" हे सुधारक वृत्तपत्राचे ब्रीद होते.

 समाजातील चुकीच्या रूढी परंपरांवर आगरकरांनी घणाघाती आघात केले.   स्त्री -पुरुष समानतेचे आगरकर भोक्ते होते. परमेश्वरी अवकृपा  आणि स्वर्ग व नरक यांची प्राप्ती  या अशा हास्यापद कल्पनांचा डोलारा कोसळल्याशिवाय विवेकाचे अधिराज्य निर्माण होणार नाही असे आगरकरांचे स्पष्ट  मत होते.नीतिमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असले पाहिजे असे नाही.आगरकरांचे धार्मिकबाबतीत एकूण विचार पाहून व मानवतेबाबत कणव पाहून "देव न मानणारा देवमाणूस " असे सार्थ वर्णन करायशी वाटते.  त्याकाळात मुलां-मुलींचे लग्न कमी होत असे. कमी वयात मुलींची लग्न झाल्यामुळे त्यांना  अनेक समस्यांना सामोरे जावे लागत  असे.  त्यामुळे मुलांच्या

विवाहाची वयोमर्यादा वाढवण्यासाठी कायदा करावा म्हणून श्री. मलबारी शेटजी यांनी  न आंदोलन केले त्यात आगरकरांनी हिरहिरीने भाग घेतला. तसेच आगरकरांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. केशवपन, सती प्रथा, मृत्यूनंतर  केले जाणारे संस्कार किती अविवेकी व बुद्धीला न पटणारा आहे; हे आगरकरांनी  हिरहिरीने मानले. आगरकरांच्या स्पष्ट  व निर्भिड विचारामुळे सनातनी  लोकांच्या रोषाला त्यांना  सामोरे जावे लागले . सनातन्यांची आगरकरांच्या विचाराचा निषेध म्हणून  त्यांची जिवंतपणे प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. समाजातून कितीही त्रास झाला तरी आगरकरांनी आपले कार्य चालू ठेवले.  आगरकर हे अज्ञेयवादी होती. पूर्वजन्म ,पूनर्जन्म या कल्पनांवर  त्यांचा विश्वास   नव्हता . वर्णव्यवस्था , जातीव्यवस्था व अस्पृश्यता हा गोष्टी   त्यांना कधीही पटल्या नाही. अज्ञेयवादी   म्हणजे  विज्ञानानूसार सृष्टीचे कोडे अजून पूर्णपणे  उलगडलेले नाही. त्यामुळे जे रहस्य  उलगडले नाही. त्याबाबत मनुष्य  अजूनही अज्ञानी आहे. त्यामुळे अगदी आस्तिक किंवा निरिश्वरवादी अशी भूमिका  न घेता त्यांचा सुवर्णमध्य म्हणून  अज्ञेयवादाचा आगरकरांनी स्वीकार  केला. अर्थात चमत्कार  करणारा देव त्यांना कधीही  मान्य नव्हता.  तत्व सांगणे सोपे असते. ते आचरणे अवघड असते. आगरकर तत्वे आचरणारे विचारवंत होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी कोणतेही क्षौरविधी केला नाही. आपल्या पत्नीला त्यांनी निक्षून   सांगितले होते की ,माझ्या पश्चात कर्मठांच्या दडपणामुळे सोवळे पाळू नकोस .जीवन जगताना  कितीही अडचण आली तरी आगरकरांनी आपला 

 बुद्धीप्रामाण्यवाद कधीही सोडला नाही.  १७ जून १८९५ रोजी आगरकरांचा मृत्यू  झाला.  त्यांना दम्याचा त्रास होता आयुष्यभर वैचारिक मतभेद असलेल्या लोकमान्य टिळकांनी  आगरकरांच्या मृत्यूनंतर    त्यांच्या उज्ज्वल चरित्र्यांचा गौरव करणारा लेख केसरीमध्ये लिहिला.  या संदर्भात साहित्यसम्राट न.चि.केळकर म्हणतात " हा मृत्यूलेख लिहिताना टिळक घळाघळा रडत होते. या उमाळ्यांच्या अडथळ्यामुळे दोन स्तंभांचा  लेख पुरा करावयास त्यांना चार तास लागले.



संदर्भ -

१. आधुनिक भारताचा इतिहास -व.तु,देशपांडे.

२.महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास -पी,बी.पाटील

३.दीपस्तंभ -प्रा. शिवाजीराव भोसले.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...