विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

चिकित्सक इतिहासकार..वा.सी.बेंद्रे!

 

चिकित्सक इतिहासकार..वा.सी.बेंद्रे!

१६ जुलै  इतिहासाचार्य वा,सी.बेंद्रे  यांचा 

स्मृतीदिनानिमित्त लेख !

            



         आधुनिक भारतीय  इतिहास संशोधकांच्या परंपरेतील डॉ.ए.एस.अळतेकर ,डी.डी.

कोसंबी  ,सर जदुनाथ सरकार , महादेव गोविंद रानडे ,वि.का.राजवाडे बरोबरच वा. सी. बेंद्रे  म्हणजेच वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांचे वाचन करणे त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढून त्यांचे तर्कसंगत लेखन करुन इतिहासाची गोडी लावणे तसे फार अवघड गोष्ट होय. मात्र वा.सी. बेंद्रे,यांनी या कामात स्वतःला अक्षरशः  झोकून दिले. 

वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील "पेण" येथे १३ फेब्रुवारी १८९६ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई  येथे झाले. १९१८ मध्ये बेंद्रे पुणे येथे आले. ते सरकारी दप्तरात काम करत असताना भारतीय इतिहास  मंडळात काम करु लागले. त्यांनी  आपला संशोधनाचा विषय "१७ व्या शतकातील  इतिहास " निवडला.   वा.सा.बेंद्रे यांचे  महत्त्वाचे कार्य म्हणजे १९३३ साली त्यांनी शोधलेले आणि प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र होय . १९३३ सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून प्रचलित होते. इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधलेले हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र होते. या चित्रामध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे शिवाजीमहाराजांचा पेहराव दाखविला असून, तो पूर्वी प्रचलित असलेल्या चित्रातील मुस्लिम सरदाराच्या पेहरावाहून भिन्न होता.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चित्र शोधानंतर उल्लेखनीय अशी त्यांची भरीव कामगिरी म्हणजे संभाजी महाराजांचे चरित्र होय. वा. सी. बेंद्रे यांच्या ४० वर्षांच्या अथक संशोधनाने,  बखरकरांनी रंगवलेली  संभाजी महाराजांची नकारात्मक प्रतिमा खोडली.वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण व जुळणी करण्याचे, तसेच कॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. हे खरोखरच उल्लेखनीय काम होते.

सत्तर वर्षांपेक्षाही जास्त कालखंडात त्यांनी इतिहास संशोधनावर आधारित ६०च्यावर पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली पुस्तके ही, इतिहास संशोधन हे कसे शास्त्रीय कसोटीवर आणि वस्तुस्थितीला धरून असणारे असले पाहिजे याची उत्तम उदाहरणे आहेत. लिखाण करत असताना कोणतेही नाट्य तसेच कपोकल्पित वाटणार नाही याबाबत ते सावध असत

वा.सी. बेंद्रे यांचे वास्तव्य  हे पुणे येथे होते. १६ जुलै १९८४ रोजी  वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून दरवर्षी  बेंद्रे यांच्या नावाने सुवर्णपदक दिले जाते.



--- प्रशांत कुलकर्णी  मनमाड (नाशिक )


संदर्भ 

१. इतिहासलेखनशास्त्र - फडके प्रकाशन

२. इतिहासाच्या पाऊलखुणावरील लेख

३. दैनिक लोकसत्तामधील लेखासंग्रह


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...