विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

स्वामीनिष्ठ नरवीर ....बाजी प्रभू देशपांडे !

 १३ जुलै १६६० वीररत्न बाजी प्रभू देशपांडे  यांनी झुंज दिली

  आणि १४ जुलै रोजी वीरमरण आले. त्यावर आधारित लेख!


            महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी  न्यायाचे   हिंदवी स्वराज्य निर्माण  केले.    या स्वराज्यावर अनेक संकटे आली मात्र  प्रत्येक संकटात  अनेक  स्वामीनिष्ठांनी  हसत हसत आपले प्राण अर्पण केले.  अशाच एका स्वराज्याच्या शिलेदारांची माहिती आज आपण मिळवणार आहे. बाजी प्रभू देशपांडे हे पुणे जिल्ह्यातील  भोर तालुक्याचे सिंध गावचे  पिढीजात देशपांडे  होते.  कृष्णाजी बांदल देशमुख यांच्याकडे बाजी प्रभू यांचे वडील पिलाजी दिवाण होते.  वडीलांच्या निधनानंतर हे दिवाण पद बाजी प्रभूंकडे आले. कारण बाजी प्रभू हे शूरवीर तर होते. त्याबरोबर  आर्थिक बाबीचा हिशोब ठेवणे. युध्दाचे नेतृत्व करणे असे अनेक  कौशल्याने ते पारंगत होते.

छत्रपती  शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वरांच्या शिवालयात घेतल्यानंतर स्वराज्याच्या कार्यासाठी सर्व लोकांना  एक करण्याचा वसा त्यांनी  घेतला. गोडीगुलाबीने अनेक देशमुखांना शिवरायांनी स्वराज्याच्या कार्यात सामिल केले. मात्र चांगल्या लोकाबरोबर काही वाईट लोकही असतात. त्या लोकांना शिवरायांचे नेतृत्व  डोळ्यात खूपत होते. त्या स्वकीय लोकांचा  बंदोबस्त  करण्याचे  शिवरायांनी ठरवले. स्वराज्यांच्या कार्यात सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची प्रामाणिक  इच्छा  होती. मात्र काही सरदारांनी स्वराज्याचा विरोध केला. त्यांत कृष्णाजी बांदल  देशमुख होते.  शिवराय आपल्या प्रमाणे जहागिरदाराचे पुत्र आपण त्यांचे नेतृत्व  का स्वीकारावे हा विचार कृष्णाजी बांदल यांचा होता.  शिवरायांनी कृष्णाजी  बांदल देशमुखाना अनेकवेळी समजावले. मात्र कृष्णाजी काही ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी शिवरायांनी कृष्णाजी बांदल त्यांच्यावर आक्रमण  केले.कृष्णाजी बांदल या युध्दात मारले गेले. त्याठिकाणी  बाजी प्रभुंचे शौर्य  पाहून शिवरायांनी  बाजी प्रभूंना स्वराज्यात सामिल होण्याचे निमंत्रण  दिले.  शिवरायांच्या  स्वराज्याच्या ध्येयाने बाजी प्रभू ही भारावून गेले आणि  महाराजांच्या कार्यात सामिल झाले. शिवरायांनी  विजापूर सरदार अफजलखानाचा वध करुन स्वराज्याची घौडदौड सुरु केली. अफजलखानाचा वध  केल्यानंतर शिवराय शांत बसले नाही. तर त्यांनी  विजापूरच्या ताब्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले. पन्हाळगडावर शिवराय जातीनिशी गेले. तर सरसेनापती नेतोजी पालकर यांना थेट विजापूर हल्ला करण्यास पाठवले. विजापूरच्या आदिलशाहची गाळण उठाली. म्हणून  शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी   विजापुरच्या आदिलशाहने सिद्धी जौहर नावाच्या सरदाराला ३५००० फौज देऊन शिवरायांचा बंदोबस्त  करण्यासाठी  महाराष्ट्रात  पाठवले. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते. सिद्धी जौहरने आपल्या मोठ्या  फौजफाटासह पन्हाळगडावर कडक वेढा घातला.    महाराज गडावर अडकून पडले. अनेक दिवस झाले. शिवरायांना वाटले की ,पावसाळ्यात वेढा ढिला होईल मग आपल्याला हा वेढा सोडून बाहेर पडला येईल. मात्र सिद्धी जोहर हा कडक  शिस्तीचा होता. त्याने पावसाळ्यात वेढा अजून कडक केला.डोळ्यात तेल घालून पहारेकरी  लक्ष देत होते.त्यांत  मुघलबादशहा औरंगजेबाचा मामा शायिस्तेखान पाऊण लाखाची फौज घेऊन स्वराज्यात घुसला होता. स्वराज्याची धुळदाण करत होता. हळूहळू गडावरील शिबंदी संपत आलेली होती. अशावेळी  शिवरायांनी वेढ्यातून  बाहेर  पडण्यासाठी एक योजना तयार केली. या योजनेनूसार सिद्धी जौहरशी तह करण्याचे ठरविले. त्यासाठी गडाखाली पांढरे निशाण घेऊन शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ सिद्धी जौहरकडे गेले. शिवराय आता तह करणार म्हटल्यावर सिद्धी जौहराचे पहारे थोडे ढिले पडले. त्यावेळी गडावर शिवा काशीद नावाचा एक मावळा हजर होता. तो दिसायला हुबेहूब  शिवरायांसारखाच होता. शिवा काशीद ला  शिवरायासारखा वेष करण्यात आला. ठरलेल्या योजनेप्रमाणे शिवरायांचा वेष करुन शिवा काशीद काही  मावळ्यासोबत सिद्धीला  तहाची बोलणीत गुंतवणार होता. आणि  दुसऱ्या गुप्त  रस्त्याने शिवराय  आणि    त्यांच्यासोबत ६०० मावळे विशालगडाकडे रवाना होणार होते.

 योजनेचा दिवस ठरला. १३ जुलै १६६० ची ती रात्र   वेळ मध्यरात्रीची  होती. धो-धो पाऊस रात्रीचा काळोखात शिवराय   निवडक मावळ्यासह  सिद्धी जौहरला चकवा देऊन  पालखीतून निघाले. सिद्धी जौहरच्या सैन्यातील अफजलखान पुत्र फाजलखानाने शिवरायांना जवळून पाहिले होते. त्यामुळे हे खरे शिवाजी महाराज नाही असे त्याने सिद्धी जौहरला सांगितले. सिद्धी जौहरने शिवा काशीदला ठार मारले. 

   सिद्धी जौहरने  आपला जावाई  सिद्धी मसूदला ५००० सैन्य देऊन शिवरायांचा पाठलाग  करण्याची जबाबदारी  दिली.    शिवरायांचे स्वामीनिष्ठ मावळे भरपावसात चिखल,तुडवत शिवरायांची पालखी घेऊन विशालगडाच्या दिशेने दौडत होते.    त्यावेळी विशालगडावरही  सुर्यराव सुर्वे व यशवंतराव  दळवी या मुघली सरदारांचा वेढा होता. इकडे आड व तिकडे विहिर असा बाका प्रसंग होता.      त्यावेळी फक्त ३०० बांदल देशमुखांच्या फौजेनिशी बाजी प्रभू देशपांडे गजापुरपाशी  उभे राहिले. शिवरायांना त्यांनी  नम्रतेने सांगितले ," राजे तुम्ही  विशालगडावर सुखरुप पोहचल्यावर तोफेची सलामी द्या; तोपर्यंत  आम्ही शत्रूला पुढे जाऊ  देणार नाही. " शिवरायांची इच्छा नव्हती मात्र बाजी प्रभू म्हणाले "राजे आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा मरता कामा नये ." शिवरायांचे सर्वात जास्त प्रेम आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांवर होते. मात्र प्रसंग बाका होता. त्यामुळे शिवरायांची बाजी प्रभूला  निरोप दिला.५००० विरुद्ध ३०० अशी ही थरारक लढाई होती ठरल्याप्रमाणे मावळे सज्ज झाले. समोरुन सिद्धीच्या सैन्याचे लोंंढे येऊ लागले. 'हर हर महादेव' गर्जना करत मावळ्यांनी जोरदार प्रतिकार केला. एक एक मावळा दहा दहा गनिमाना भारी पडत होता.मावळ्यांनी शत्रूच्या अनेक  फळ्या मोडून काढल्या. मावळे शत्रूचा एक इंच सुद्धा पुढे सरकू देत नव्हते.  

 बाजी प्रभू नेतृत्वाखाली   ३०० बांदल देशमुख मोठ्या शौर्याने लढत होते.  बाजी प्रभूबरोबरच त्यांचा थोरले,बंधू फुलाजी सुध्दा लढत होते. सिद्धी मसूदच्या  ५००० सैन्याला तोंड देताना  बाजी प्रभू व त्यांचे बांदल देशमुखांनी   शौर्याची शर्थ केली.   बाजी प्रभूचे मध्ये तर  वीरश्री संचारला होता. केसांचा तुळतुळीत गोटा त्याला शेंडी साधारणतः  ६ फूट उंच, भारदस्त शरीर,पिळदार मिश्या दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन ते गरागरा फिरवीत शत्रू सैन्यांला गारद करत होते. बाजी प्रभू लढताना एक भक्कम बुरुजासारखे भासत होते. अनेक तास लढाई चालू होते. बाजी प्रभूच्या शरीरातून घामाबरोबर रक्ताच्या धारा वाहत होत्या. एवढ्यात बाजींच्या छातीचा वेध शत्रूच्या  बंदुकीच्या  गोळीने घेतला. बाजी जागेवरच कोसळले. मावळ्यांनी बाजींना सुरक्षित  स्थळी नेले.   मात्र एवढ्या जख्मी अवस्थेतही   बाजींचे सर्व लक्ष विशालगडावरील तोफांच्या इशारांकडे होते.

 अखेर शिवराय विशालगडावरील वेढा फोडून  सुखरुप  गडावर पोहचले. पोहचल्यावर लगेच तोफांचे इशारा दिला. तोफांचा आवाज ऐकून बाजींना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे  वाटले.  आणि   बाजी प्रभूंनी प्राण सोडले . धन्य धन्य ते छत्रपती  शिवराय  ! व  धन्य धन्य ते  शिवा काशीद ! धन्य धन्य  बाजी प्रभू  देशपांडे !

तो दिवस होता. १४ जुलै १६६० चा आज त्यांची स्मृतिदिन त्याबद्दल  विनम्र  अभिवादन!

---- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड  (नाशिक)



संदर्भ -

१. राजा शिवछत्रपती -शिवशाहीर बाबासाहेब  पुरंदरे 

२. छत्रपती  शिवराय -सेतु माधव पगडी 

३. गाथा शिवरायांची -प्र.ना. कुलकर्णी


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...