विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

अठराव्या शतकातील चाणक्य!

 


अठराव्या शतकातील चाणक्य!

उत्तर पेशवाईतील चाणक्य म्हणून  प्रसिद्ध असलेले नाना  फडणीस  यांनी  तब्बल २५ वर्ष दौलतीचा कारभार चोख सांभाळला. "जब तक नाना तब तक पुणा" म्हणजे  नाना फडणीस जोपर्यंत आहेत. तोपर्यंत  मराठा साम्राज्य नष्ट करणे अवघड आहे हे जणु ब्रिटिशांना  सांगायचे होते.   नाना फडणीसांचे पूर्वज श्रीवर्धन निवासी बाळाजी विश्वनाथांबरोबर राजाराम महाराजांच्या काळात कोकणातून देशावर आले. बाळाजी विश्वनाथ  ज्यावेळी दिल्ली येथे मुघल बादशहाकडे स्वराज्याच्या सनदा ,चौथाई व सरदेशमुखी घेण्यास गेले होते. त्यावेळी छत्रपती  शाहू महाराजांचा संपूर्ण परिवार मुघलांकडे होता. यांनाही  स्वराज्यात  आणायचे होते. त्यावेळेस बाळाजीपंत (नाना फडवणीसांचे आजोबा ) त्यांच्या बरोबर होते.त्यावेळेस चकमकीत बाळाजी विश्वनाथ समजून  बाळाजीपंत मारले गेले. बाळाजी विश्वनाथ व शाहू महाराजांचा संपूर्ण परिवार सहीसलामत स्वराज्यात येऊ शकला.  त्यावेळी बाळाजीपंताचे   पुत्र जनार्दन भानू लहान होते. त्यांना बाळाजी विश्वनाथांनी आपल्या  कारभारात सामावून घेतले. जनार्दनपंत बल्लाळ व रखमाबाई  यांच्या पोटी सातारा येथे १२ फेब्रुवारी १७४२ मध्ये नानांचा जन्म झाला. नाना फडणीस यांचे बालपण नानासाहेब पेशव्यांबरोबर गेले.पानिपतच्या पराभवानंतर   नाना फडणीस परत महाराष्ट्रात आले.   माधवरावांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ  बंधू नारायणराव पेशवे पदावर आरुढ झाले. मात्र रघुनाथरावांच्या  सत्ता लोभापायी नारायणरावांचा खून केला.  रघुनाथरावांचे सत्तेसाठी केलेल्या या हीन कृत्यांचा विरोध दरबारातील अनेक  मुत्सद्यांनी केला त्यांतील प्रमुख  म्हणजे  "नाना फडणीस "होय. रघुनाथरावांना  पेशवे पदापासून दूर करुन  १२ मातब्बर  सरदारांचे मंडळ तयार करण्यात आले. या नव्या योजने अंतर्गत  रघुनाथरावांना पेशवे पदापासून दूर ठेवणे, तसेच नारायणरावांची विधवा पत्नी  गंगाबाई ही गरोदर होती तिला सुरक्षित  ठेवून तिच्या वंशजाच्या नावाने या बारा लोकांनी  कारभार सांभाळणे.  तसेच जर गंगाबाईंना कन्या जन्माला आली तर समशेरबद्दादर  [थोरले बाजीराव पुत्र]  यांचे पुत्र अलीबद्दाहर यांना पेशवेपदावर बसवायचे ठरले. या योजनेचे प्रमुख  नाना फडवणीसच होते. त्यांच्या बरोबर सखारामबापू बोकील , महादजी शिंदे , तुकोजी होळकर , हरिपंत फडके ,त्रिंबकराव पेठे ,बाबूजी नाईक , भवानराव प्रतिनिधी , मोरोबा फडवणीस  , मालोजी घोरपडे ,मल्हारराव रास्ते आणि  पटवर्धन  असे एकूण बारा मुत्सद्दांची योजना असून त्याला बारभाईचे कारस्थान  म्हणून  इतिहासात  रुढ झाले. नाना फडणीसांनी मराठेशाहीसाठी केलेली कामगिरी  इतिहासात  संस्मरणीय ठरलेली आहे. नारायणरावांच्या मृत्यूनंतर  मराठेशाहीत कमालीची अस्थिरता निर्माण  झालेली होती. ती सावरणे रघुनाथरावांच्या  कारवा-यांना तोंड देणे संधिसाधू इंग्रजांशी झालेल्या पाहिल्या युध्दात बारा मुत्सद्यांना एकत्र करुन तोंड देणे.  इंग्रजावर मात करणे. इंग्रजांचे डावपेच  ओळखून  निजाम व हैदर यांच्याशी संधान बांधणे हे राजकारणाच्या पटलावरील अवघड खेळी होत्या. मुधोजी भोसल्यांनी नानांचा गौरव करताना  "दोन दशके मराठा मंडळाचा कारभार यशस्वीपणे  सांभाळणारा कर्तबगार  कारभारी" असे म्हटलेले आढळते. नारायणरावांची पत्नीला पुत्ररत्न होऊन त्यांचे नाव "सवाई माधवराव " असे ठेवण्यात आले. त्यांना वयाच्या ४० व्या दिवशी पेशवाई वस्त्रे देऊन सर्व कारभार नाना फडवणीस पाहू लागले. त्या दरम्यान सर्व  मराठा मंडळाला एकसूत्रात बांधणे, निजाम ,हैदर व पुढे टिपूच्या कारवा-यावर लक्ष ठेवणे. ब्रिटिशांच्या डावपेच ओळखून राजकारण करणे त्यामुळे मराठेशाही  दोन तपे सुरक्षित   राहिली.  २७ अॉक्टोबर १७९५ मध्ये सवाई माधवरावांचे अकाली निधन झाले.त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ होते. त्यांना  अपत्य नसल्यामुळे पेशवेपद कोणाला द्यावे हे नाना फडणीसासमोर यक्षप्रश्न होता. त्याकाळात रघुनाथरावांचे तीन पुत्र स्पर्धेत  होते.  नाना फडणीस  यांनी ज्येष्ठ पुत्र दुसऱ्या बाजीरावाला पेशवे पद दिले. .बाजीराव -२ ला पेशवेपद दिल्यावर तो आपल्या  तंत्रानूसार वागेल या नानांचा विचार होता मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. नानांच्या लेखणीपेक्षा दौलतराव शिंदेच्या तलवारीचा धाक बाजीराव -२ ला जास्त होता.त्यामुळे तो दौलतरावच्या तंत्राप्रमाणे वागू लागला. ३१ डिसेंबर  १७९७ रोजी दौलतराव शिंदेनी अचानकपणे नाना फडणीसांना अटक केली. नानांच्या कैदेसंबंधी एका समकालीन पत्रात उल्लेख  आढळतो

 " श्रीमंत राजश्री नाना फडणीस यांस शुक्रवारी रात्री  चंद्रोदय जाहल्यानंतर दोन घटिकांनी अमदानगरास कैदेस नेले...... " नानांना अटक झाल्यानंतर  मराठेशाहीवर नियंत्रण  राहिले नाही. परिस्थिती अवघड होऊ लागली . दौलतराव चांगलाच पेचात पडला. अशाप्रसंगी नाना फडणीस यांचा शहाणपणाचा सल्ला गरजेचा होता. त्यामुळे दौलतरावांनी नाना फडणीस यांची मुक्तता केली. जुलै १७९८ मध्ये नानांची मुक्तता करण्यात आली. त्याकाळात छोटे-मोठे पेचप्रसंग  नानांनी सोडवले . अखेर १३ मार्च १८०० रोजी नाना फडणीसांचा मृत्यू  झाला. १४ मार्च १८०० रोजी कर्नल पामरने लॉर्ड  वेलस्लीला पत्र लिहून कळविले की ," काल रात्री  नाना फडणीस मृत्यू  पावले .मला वाटते त्याच्या मृत्यूबरोबरच शहाणपणा व मुत्सद्दीपणा यांनीही पुणे दरबाराचा निरोप घेतला." मराठेशाहीच्या उत्कर्षासाठी अविश्रांतपणे कार्यरत राहणारा थोर पुरुष म्हणून  नानाला इतिहासात  महत्त्वाचे  स्थान प्राप्त झालेले आहे. ग्रँट डफ लिहितो "Nana doubtless shines out  as the  last genius  produced by the  Maratha National " नाना फडणीसाच्या निधनामुळे मराठेशाहीचे किती नुकसान  झाले हे स्पष्ट  करताना सर रिचर्ड टेंपल लिहितो " Maratha administration  lost  all vestige of honesty  and  effciency by the deat of great  Minister"  खरोखरच  नाना फडणीस यांच्यामुळे मराठेशाहीत ब्रिटिशांचा   अनेक प्रयत्न  करुन शिरकाव होऊ शकला नाही. "जब तक नाना तब तक पुणा " हे ब्रिटिशांचे वाक्य सार्थ होते. कारण नंतर अवघ्या तीन वर्षात म्हणजे  १८०३ मध्ये दुसऱ्या  बाजीरावाने ब्रिटिशांचे तैनाती फौजेचा स्वीकार केला. विजय तेंडूलकर लिखित "घाशीराम कोतवाल "नाटकांमुळे  नाना फडणीसांबाबत कुप्रचार करण्यात आला. तसेच त्या  कुप्रचाराला कोणाताही ऐतिहासिक  आधार उपलब्ध नाही.   मुळात नाटक , सिनेमा व मालिका यातून सत्य इतिहास कधीच बाहेर येत नाही आहे. "नाना फडणीस , घाशीराम किंवा पेशवे यांच्या नीतिमत्तेबद्दल किंवा तिच्या अभावावर ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भाष्य करत नाही,’ असं नाटककार विजय तेंडुलकर यांनी या नाटकावर बंदी घातली गेली होती तेव्हा नमूद केलं होत.नाना फडणीस  यांनी  "भाऊसाहेबी कृपा पुत्रवत केली" हे आत्मचरित्र लिहिले. त्यांत आपल्या चुका सुध्दा लिहिण्याचा प्रामाणिकपणा दाखवला. अठराव्या शतकातील भारताचे चाणक्य म्हणून  नाना फडणीस यांची गणना केली जाते. उत्तर पेशवाईतील संपूर्ण  भारताचे नाना फडणीस चाणक्यच होते हे यांचा सखोल अभ्यास केला तर जाणवते. आज त्यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


--- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड 


संदर्भ  - मराठ्यांचा इतिहास  भाग -२

        पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक

        पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे

        दैनिक लोकसत्तामधील लोकरंग

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...