विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

माधवराव पेशवे !

 

माधवराव पेशवे !

माधवराव पेशवे -एक अजोड व्यक्तीमत्व.........


आज १६ फेब्रुवारी  माधवरावांचा जयंतीनिमित्त त्याबाबत त्यांच्या कार्याची ओळख असलेला लेख-- 


माधवरावांच्या कार्याविषयी एका ब्रिटिश  अधिका-यांचे सार्थ मत " श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट यांचा मुत्सद्दीपणा ,श्रीमंत बाजीराव पेशवे यांची धडाडी ,आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे कुशल राजकारण या तिघांचे मिश्रण श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यात उपजत होते." त्यांच्या महान कर्तृत्वाला सलाम 🙏🙏🙏


पानिपतच्या  पराभव नानासाहेब  पेशव्यांना अपेक्षित  नव्हता त्यामुळे या धक्काने ते सावरु शकले नाही. २३ जून १७६१ मध्ये त्यांचे  निधन झाले. नानासाहेब पेशव्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र माधवराव यांना पेशवाईची  वस्त्रे २० जुलै १७६१ मध्ये देण्यात आली.  वयाच्या १६ व्यावर्षी ही मोठी जबाबदारी  पार पाडणे सोपे नव्हते.  कारण पानिपतच्या  -३ मध्ये मराठ्यांची एक पिढी गारद झाली. मराठी सत्तेचा दबदबा पुन्हा  निर्माण  करण्यासाठी  माधवरावरावांनी अपार कष्ट  घेतले. माधवरावांचे मनोधैर्य मोठे होते.केवळ ११ वर्षाच्या छोट्या  कारकीर्दीत  माधवरावांनी पानिपतच्या  युद्धामुळे झालेली हानी तर भरुन काढलीच पण त्याचबरोबर निजाम , हैदरअली यासारख्या  शत्रूंचा निःपात करुन मराठी सत्तेची प्रतिष्ठा वाढविली. उत्तरेत मराठ्यांचा पुन्हा  दबदबा निर्माण  करण्यात माधवरावांना" महादजी शिंदे"यांची खूप मदत झाली.माधवरावांना अकरा वर्षाच्या  कारकीर्दीत  अनंत अडचणी  आल्यात  ; मात्र त्या  अडचणीवर मात करत माधवरावांनी मराठी सत्तेला बळकटी निर्माण  केली. माधवरावांचे प्रशासन कसे होते ? या संदर्भात  अनेक  दाखले देता येतील. एकदा माधवराव  अन्य मोहिमेवर गेले असताना  निजामाने पुणे लुटले. माधवराव पुण्यास आल्यावर  झाल्या प्रकाराची चौकशी   त्यांनी सुरु केली. त्यावेळी  माधवरावांचे सख्खे मामा मल्हारराव रास्ते यांनी निजामाला पुण्यातील  श्रीमंत  लोकांची  घरे दाखवल्याचे समजले. मामा मोठ्या  ऐटीत होता. मला काय शासन होणार ? मात्र माधवरावांनी  मल्हारराव रास्तेची सर्व मालमत्ता  जप्त करुन ज्याचे नुकसान  झाले ते भरुन  देण्याचा आदेश दिला. त्यावेळी मातोश्री गोपिकाबाईनी हट्ट धरला जर  रास्तेना शासन झाले तर मी शनिवारवाडा सोडून जाईल. माधवराव न्यायनिष्ठूर होते. त्यांनी आपला निर्णय  कायम ठेवला. अखेर  गोपिकाबाईंनी शनिवारवाडा सोडला व ते नाशिक येथील गंगापूर भागात निघून गेल्या.माधवरावांनी अशाप्रकारे  आले प्रशासन काटेकोर व निःपक्षपाती बनविले.


राक्षसभुवनाची  लढाई  -


पानिपतच्या  पराभवानंतर मराठ्यांचे छोटे -छोटे शत्रूही स्वतःला शेर समजायला  लागले होते. त्यांपैकीच एक म्हणजे  उदगीरच्या लढाईत सदाशिवभाऊकडून दारुण पराभव झालेला निजामअली होय. नागपूरचे जानोजी भोसल्यांना आपल्या जाळ्यात ओढून निजामाने एप्रिल  १७६३ मध्ये  पुण्यावर स्वारी केली. त्यावेळी रघुनाथरावांनी माधवरावांना मदत करण्याचे ठरवले.  पूर्वी  थोरले बाजीराव पेशव्यांनी  निजामा विरोधात जे डावपेजांचा वापर केला तोच वापर करण्याचा  माधवरावांनी ठरवली. रघुनाथरावांनी निजामाच्या प्रदेशात घुसून औरंगाबाद  शहरावर हल्ला केला. या घटनेने चिडून जाऊन निजामाने पुण्यात जाळपोळ  व लूटालूट करण्यास सुरूवात  केली. गोपिकाबाईंंनी सिंहगडावर आश्रय घेतला. याच सुमारास माधवरावांनी  जानोजी भोसल्यांच्या प्रदेशावर हल्ले सुरु केले. थेट मलकापूरपर्यत मजल मारुन जानोजीला बाजूला सारुन मुधोजी भोसल्याची सत्ता  व-हाडवर प्रस्थापित  करण्याचे ठरवले.  माधवरावांबरोबर मल्हारराव होळकर  होते. तसेच महादजी शिंदेनाही उत्तरेकडून तातडीने बोलवण्यात आले. माधवरावांच्या डावपेजांचा जानोजी भोसल्यांना  सुगावा लागला. निजामाला सहकार्य  देणे महागात पडेल हे समजल्यावर  जानोजी भोसल्यांनी निजामाचा पाठिंबा काढून घेतला.   माधवरावांनी अजून एक युक्ती  केली. निजामाचा भाऊ सलाबतजंग  याला ही आपल्या  बाजूने ओढण्याचा प्रयत्न  केला. आपल्या  प्रदेशातील पडजड पाहून निजामाने पुणे सोडून हैद्राबादकडे जाण्याचा निर्णय  घेतला.याच सुमारास निजामाच्या गोटात असलेले जानोजी भोसल्यांशी माधवरावांनी संधान बांधले. त्यामुळे निजामाच्या गुप्त लष्करी  हालचाली माधवरावांना समजू लागल्या. हैद्राबादकडे त्वरेने निघालेल्या  निजामाला जानोजी भोसल्यांच्या इशा-यानूसार माधवरावांनी गोदावरी नदी ओलांडण्यापूर्वी "राक्षसभुवन" येथे गाठले. १० अॉगस्ट १७६३ रोजी राक्षसभुवन येथे लढाईत निजामाचा दारुण पराभव केला. पेशवाईतील  गाजलेल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणा "विठ्ठल सुंदर" हा निजामाचा दिवाण या लढाईत मारला गेला. माधवरावांनी या युद्धात  अतुल पराक्रम  गाजवून आपली "शिपाईगिरी सिध्द केली ". निजामाने २५ सप्टेंबर  १७६३ रोजी  औरंगाबाद  येथे  तह करुन  ८२ लाख उत्पन्नाचा प्रदेश देण्याचे मान्य केले. या पराभवाचा निजामावर एवढा परिणाम झाला की, त्यानंतर त्याने मराठ्यांशी शत्रुत्व न ठेवता स्नेह जोडणेच पसंद केले. या लढाईतील डावपेज व शिपाईगिरीमुळे माधवरावांचा दबदबा सर्वत्र निर्माण  झाला.


हैदरअली  व साडेतीन शहाण्यापैकी तीन शहाण्यांचा बंदोबस्त --- 


 पानिपतच्या  युद्धानंतर अनेक  छोटे- छोटे शत्रू  स्वतःला शेर समजायला लागले  होते. याच सुमारास  म्हैसूरच्या राजकारणात  हैदरअलीचा उदय झाला. म्हैसूरचे राज्य बळकावून हैदरने मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले सुरु केले. त्यावेळी माधवराव निजामाच्या राक्षसभुवनच्या लढाईत गुंतले असल्याने त्यांना  हैदरकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. त्यानंतर १७६४ मध्ये मधवरावांनी हैदर विरोधात पाहिली मोहिम काढली.धारवाडच्या जंगलमय प्रदेशात हैदरने गनिमी काव्याचा उपयोग  करुन पेशव्यांच्या  सैन्याची  कोंडी करण्याचा प्रयत्न  केला. मात्र गनिमी काव्यात मराठे जास्त तरबेज असल्याने त्यांनी  हैदरवर कुरघोडी केली. मुरारराव घोरपडे यांनी  विलक्षण  पराक्रम  गाजवून हैदरला चांगलेच  चकवले. हैदरची अवस्था  बिकट झाली होती. मात्र पुण्यातील अंतर्गत  कटकटीमुळे हैदरचा पूर्ण बिमोड न करता माधवरावांना पुण्याला परतावे लागले . अनंतपूरच्या तहाने या युद्धाची सांगता झाली. मात्र हैदरअली हा  माधवराव पुण्याला गेल्यावर  पुन्हा  सापासारखा उलटला. माधवरावांनी डिसेंबर  १७६६ मध्ये पुन्हा  हैदर विरोधात दुसरी मोहिम काढली. गोपाळराव पटवर्धनानी हैदरच्या सैन्याला चांगले  जेरीस आणले.फेब्रुवारी  १७६७ मध्ये शिरा येथील किल्ला जिंकून माधवरावांनी हैदरला धक्का दिला. शि-याचा नवाब व हैदरचा अधिकारी मीर रेझा माधवरावांना येऊन मिळाला. निजामाने माधवरावांशी युती केली, हैदरची चांगलीच कोंडी झाली.  हैदरचा पूर्ण बंदोबस्त  करायचा हेतू यावेळी माधवरावांचा होता. पण पुन्हा  पुण्यातील अंतर्गत  कटकटीने हैदरशी तह करुन ३३ लाख रुपये युद्ध खर्च  घेऊन माधवरावांनी ही मोहिम मिटवावी लागली . माधवरावांच्या आक्रमण प्रसंगी  नमते घेणे आणि  त्यांची  पाठ वळताच पुन्हा  हल्ले करणे हे हैदरचे दुटप्पी वागणे होते.  तिसऱ्या  मोहिमे आधि माधवरावांनी सर्व अंतर्गत  कटकटी मिटवून हैदरवर जोरदार हल्ला केला. माधवरावांनी आपल्या  प्रकृतीची तमा न करता हैदरचा पूर्ण बिमोड करण्याचा विडा उचलला. त्रिंबकराव पेठ्यांची नेमणूक  करुन हैदरचा पूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत  युद्ध  चालू ठेवण्याचा हूकूम माधवरावांनी दिला.  शेवटी ५ मार्च १७७१रोजी श्रीरंगपट्टणजवळ हैदरचा पूर्ण  पराभव झाला. ही लढाई मोती तलावाची लढाई म्हणून  प्रसिद्ध  आहे. मराठ्यांचे बळकावलेले सर्व प्रदेश व ५० लाख युद्ध  खर्च देऊन हैदरने पूर्णपणे  शरणागती  पत्करली . अशाप्रकारे  निजामाप्रमाणे हैदरअलीचा माधवरावांनी पूर्णपणे  बंदोबस्त  केला. त्यानंतर पुण्यातील अंतर्गत  कटकटी पूर्ण मिटवण्याचा ध्यास माधवरावांनी घेतला होता. त्यांत इतिहासातील प्रसिद्ध  साडेतीन शहाण्यापैकी तीन शहाण्यांचा माधवरावांनी निकाल लावला. त्यापैकी  पहिला निजामाचा दिवाण "विठ्ठल सुंदर" हा राक्षसभुवनांच्या लढाईत  मारला गेला. दुसरा नागपूरचे जानोजी भोसल्यांचा कारभारी" देवाजीपंत" हा एक होता. जानोजी भोसले हा  निजामाला साह्य करणे. तसेच रघुनाथरावाला मदत करणे असे कृत्य  करुन माधवरावांच्या कार्यात अडचणी निर्माण  करत असे.  त्यामुळे माधवरावांनी जानेवारी  १७६६ मध्ये अमरावतीजवळ दर्यापूर व कनकपूर येथे १७६९ मध्ये  या दोन युध्दात   जानोजीचा निर्णायक  पराभव केला . त्यानंतर  रघुनाथराव  म्हणजे  माधवरावांचे सख्खे काका यांना पेशवेपदाचा लोभ असल्याने  ते नेहमी माधवरावांच्या कार्यात अडथळे निर्माण  करत असे. या कामात रघुनाथरावांना त्यांचे कारभारी साडेतीन शहाण्यापैकी एक सखारामबापू बोकील मदत करत असे. वयाने मोठे व नात्याने काका असल्याने  अनेक वेळा माधवरावांनी रघुनाथरावांना समजावून सांगितले , मात्र ते सुधारत नाही हे पाहिल्यावर जून १७६८ मध्ये धोडपच्या लढाईत  रघुनाथरावांचा पूर्ण  पराभव त्यांना  कैद केले.  त्यानंतर  माधवरावांच्या मृत्यू होईपर्यत  रघुनाथरावांनी पुन्हा  डोके वर काढले नाही. साडेतीन शहाण्यापैकी तीन शहाण्यांचा माधवरावांनी निकाल लावला. अर्धा  शहाणा "नाना फडवणीस" हे मात्र नेहमी माधवरावांना उपयोगी  पडले. दक्षिणेतील  सर्व शत्रूंना व अंतर्गत  कटकटी मिटवण्याची माधवरावांची शिस्त धडाडी व कामाचा उरक पाहिला तर खरोखरच  आश्चर्य  वाटते.एवढ्या लहान वयात व कमी कालावधीत माधवरावांनी केलेले कार्य खूप मोठे होते यात कोणतीही  शंका नाही.


 माधवरावांचा मृत्यू  पानिपतपेक्षा

 मोठे नुकसान-----


 दक्षिणेकडील कटकटीमुळे स्वतः  माधवरावांची इच्छा  असूनही  उत्तरेकडे मोहिम काढता आली नाही. मात्र  उत्तरेतील घडी बसवून पुन्हा  मराठ्यांचा दबदबा निर्माण  करण्याची इच्छा  माधवरावांनी उराशी बाळगली होती. त्यामुळे उत्तरेची जबाबदारी  माधवरावांनी मल्हारराव होळकर , रघुनाथराव  व शेवटी महादजी शिंदेवर टाकली.  यात मल्हारराव होळकरांचा मृत्यू  २० मे १७६६ मध्ये झाला. त्यामुळे उत्तरेची सर्वच जबाबदारी  रघुनाथरावावर येऊन पडली. वास्तविक  शौर्याची कमी नसलेल्या रघुनाथरावाला  उत्तरेत मराठ्यांचा दरारा निर्माण  करणे शक्य होते. मात्र रघुनाथरावाने आक्रमक  धोरण न स्वीकारता तह करण्याचे राजकारण सुरु केले.  त्यामुळे रघुनाथरावाला विशेष चमक दाखवता आली नाही. माधवरावांनी रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनावाले यांच्या  नेतृत्वाखाली  २०'००० फौज देऊन त्या दोघांना उत्तरेत पाठवले.  त्यांना  महादजी शिंदे व तुकोजी होळकर  येऊन मिळाले. एप्रिल  १७७० मध्ये गोवर्धनच्या लढाईत नवलसिंग जाटाचा पराभव करुन आग्रा व मथुरा येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व  निर्माण  केले. झबेतखान रोहिल्याचा पराभव केल्यानंतर  महादजी शिंदेनी दिल्लीवर आक्रमण केले. रोहिल्यांचा प्रतिकार मोडून  मराठ्यांनी दिल्ली जिंकली. अशाप्रकारे  पानिपतच्या  पराभवाने मराठ्यांची  गेलेली प्रतिष्ठा केवळ ११ वर्षात पुन्हा  मिळवली. ६ जानेवारी १७७२ रोजी दिल्लीच्या सिंहासनावर शहाआलम या मुघल वंशजाला महादजी शिंदेनी बसवले. दिल्लीच्या  किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकवला. माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीतील हा शेवटचा सुवर्णक्षण होता. दक्षिणेतील सर्वठिकाणी मराठ्यांचे वर्चस्व निर्माण  झाले होते. उत्तरेतही मराठ्यांचा दबदबा निर्माण  झाला होता. त्यांत अंतर्गत  कटकटीमध्ये तोतया प्रकरणाने तोंड वर काढले होते.पानिपतच्या  युद्धातील सदाशिवभाऊ पेशवे , जनकोजी शिंदे व यशवंतराव  पवार यांचे तोतये पुण्यात हजर झाले होते. त्यांची ओळख पटवून ख-या खोट्याची शहनिशा करणे हा नाजुक प्रश्न होता. सदाशिवभाऊचा तोतया तर एवढा हुबेहूब होता की, पार्वताबाईचा ही विश्वास  बसला होता.  इंग्रजासारखे धूर्त शत्रू तोतया प्रश्नाच्या राजकारणाकडे लक्ष देत होता. थॉमस मॉस्टिन हा वकील त्यासाठी खास नेमला होता. माधवरावांनी सर्व तोतयांची  शहनिशा  करुन त्यांचे खोटेपणा समोर आणला. सर्व तोतयांना कडक शासन केले. पार्वताबाई व इतर सर्व संबंधातांची समजूत घातली.  माधवरावांनी अविश्रांत परिश्रमामुळे डोंगराएवढे प्रश्न अगदी कमी कालावधीत सोडवले. इंग्रजांची  शिस्त त्यांची आधुनिक  शस्त्रे यांचे महत्त्व  माधवरावांनी जाणले होते. म्हणूनच तोफांचे कारखाने काढण्यावर माधवरावांनी विशेष  भर दिला.पुण्यात अद्यायावत प्रकारच्या  तोफा निर्माण  करण्यासाठी  कारखाना उघडण्यात आला. माधवरावांना प्रजेच्या  हिताविषयी अत्यंत कळकळ होती. दुष्काळ  , प्रंचड वादळे , रोगराई इत्यादी  नैसर्गिक  आपत्तीमुळे पीडलेल्या रयतेला माधवरावांनी आधार दिला. पानिपतच्या  युद्धात  कर्तबगार  मराठे सरदारांची एक पिढी लयास गेली होती. माधवरावांनी तरुण आणि  उमद्या सरदारांचा नवा वर्ग निर्माण  केला. त्रिंबकराव पेठे , हरिपंत  फडके ,गोपाळराव  पटवर्धन  , बिनीवाले , कानडे , आनंदराव धुळूप , महादजी शिंदे ,तुकोजी होळकर  , नाना फडवणीस अशा मुत्सद्दी पिढी निर्माण   झाली. माधवरावांनी केवळ एक दशकात असामान्य  कामगिरी बजावली. मात्र १८ नोव्हेंबर  १७७२ रोजी अगदी वयाच्या २८ व्या वर्षी माधवरावांचा मृत्यू  झाला. हा मराठेशाहीला पानिपतच्या  पराभवापेक्षा मोठा धक्का  होता. मराठ्यांचा आग्लं इतिहासकार ग्रँट डफ लिहितो ,"The plains of panipat were not more  fatal to the Mahratta empire  than the  early  end of this  excellent prince ".

 यावरुन माधवरावाच्या योग्यता लक्षात येते. माधवरावांना अजून फक्त दहा वर्षाचे आयुष्य  लाभले असते तर कदाचित  ब्रिटिशांना भारतात सत्ता निर्माण  करणे शक्यच झाले नसते. कारण अलीकडील  सापडलेल्या ऐतिहासिक  कागदापत्रानूसार माधवरावांनी थेट फ्रान्स सरकारशी संपर्क  साधून ब्रिटिशांचा भारतातून  समूळ नाश करण्याची योजना बनवली होती. मात्र माधवरावांच्या अकाली मृत्यूमुळे ते काम तडीन नेता आले नाही. थोरले बाजीराव , नानासाहेब  व माधवराव यांना कमी आयुष्य  लाभले . त्यामुळेच भारतात परकीय सत्ता स्थिरावली .अन्यथा इतिहास बदलला असता.


___ प्रशांत कुलकर्णी  मनमाड


संदर्भ - मराठ्यांचा इतिहास  खंड -२

   स्वामी -रणजित देसाई


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...